ढिंग टांग : शपथविधी! (एक अप्रकाशित वृत्तांत)

ब्रिटिश नंदी
बुधवार, 27 नोव्हेंबर 2019

बंटीसाहेब आणि मा. राऊतसाहेब यांनी शपथविधी शोचे निमंत्रण धडाधडा पाठवून कामास सुरुवात केली. असा दिमाखदार शो करून आपल्या महनीय नेत्यांना स्फूर्ती द्यावी, हा हेतू त्यामागे होता. ‘आम्ही १६२’ असे झकास टायटल मारून शपथविधीची निमंत्रणे गेली.

मुंबईतील ग्रॅंड हयात या पंचतारांकित हॉटेलाच्या बॉल रूममध्ये संविधान दिवसाच्या पूर्वसंध्येला झालेला शपथविधी शो इतका ग्रॅंड होता, की आम्ही आमच्या उभ्या हयातीत असा शो बघितला नाही आणि बघणारही नाही. बघणाऱ्याचे डोळे दिपले आणि न बघणाऱ्याचे नशीब फुटले, असेच आम्ही म्हणू! कां की, अशाप्रकारचा शपथविधी शो उभ्या भारतवर्षात कधीही झाला नाही.

'सकाळ'चे मोबाईल ऍप डाऊनलोड करा

या शोचे आयोजन आमचे राष्ट्रवादी मित्र मा. बंटीसाहेब आणि शिवसेनेचे सरसंपादक मा. राऊतसाहेब यांनी अप्रतिम असे केले होते. या शोमुळे चोरून शपथ घेणाऱ्याचे डोळे पांढरे झाल्याची आम्हाला बालंबाल खात्री आहे. मध्यरात्रीच्या काळोखात चोरून शपथ घेण्याऐवजी अशी पंचतारांकित शपथ घेणे केव्हाही भारी असते. ब्रेबर्न स्टेडियम किंवा शिवतीर्थावर शपथ घेण्यापेक्षाही हे जबरदस्त असे प्रकरण आहे. 

बंटीसाहेब आणि मा. राऊतसाहेब यांनी शपथविधी शोचे निमंत्रण धडाधडा पाठवून कामास सुरुवात केली. असा दिमाखदार शो करून आपल्या महनीय नेत्यांना स्फूर्ती द्यावी, हा हेतू त्यामागे होता. ‘आम्ही १६२’ असे झकास टायटल मारून शपथविधीची निमंत्रणे गेली. या शोमध्ये सहभागी होणारे कलावंत विविध हाटेलांमध्ये मुक्‍कामी होतेच. त्यांना बसमधून आणून रंगारंग सोहळा घडवावा, असे ठरले होते. फुलांच्या माळा लावण्यासाठी व खुर्च्यांना कव्हरे घालण्यासाठी आमची नियुक्‍ती झाली होती. पाण्याच्या बाटल्यांचे खोके आणून ठेवण्याचे कामदेखील आमच्याकडेच होते. साहजिकच, आम्हाला तेथे खूप काम पडले. तेथील आँखो देखा हाल वाचकांना सांगणे, आम्हाला भाग आहे.

शपथविधी शोसाठी बॉल रूममध्ये रंगीबिरंगी फुगे लावण्याची आयडिया आम्ही सुचवली होती. पण, एवढे फुगे फुगवणार कोण, असा प्रश्‍न पडला. पार्श्‍वभूमीवरील भिंतीवर १६२ फुगे (फुगवलेले) लावावेत व नंतर ते हवेत सोडून द्यावेत, अशी कल्पना होती. आघाडीतील हरेक आमदाराला आल्या आल्या एक फुगा फुगवण्यासाठी दिल्यास काम फत्ते होईल, अशीही एक कल्पना पुढे आली. ती मान्यदेखील झाली. परंतु, फुगे आणण्यासाठी हॉटेलबाहेर कोण जाणार, हे न ठरल्याने फुगे आणलेच गेले नाहीत. अखेर विचार सोडून देण्यात आला.

‘‘इथे चेंडूंची सजावट केली तर?’’ आम्ही चाचरत सुचवले. बॉल रूममध्ये चेंडू सयुक्‍तिक ठरतील, एवढेच आमचे म्हणणे होते. परंतु, मा. बंटीसाहेबांनी जळजळीत नजरेने आम्हाला गप्प केले.

‘‘बॉल रूममध्ये नृत्य करतात, चेंडू कसले लावताय?’’ ते म्हणाले.

‘‘मग डीजे आणावा काय?’’ आम्हीसुद्धा कधी कधी अगदीच ‘हे’ प्रश्‍न विचारतो. त्यावर मा. बंटीसाहेबांनी मा. राऊतसाहेबांशी नजरानजर करून एक सुस्कारा सोडला. मग अचानक आमच्यावर झडप घालून आमची गच्ची धरली. दोन्ही हातापायांची गठडी वळत ते कडाडले, ‘‘कोणी पाठवलं रे तुला? गुप्त पोलिसगिरी करतोस?’’

...अचानक धावाधाव झाली. अनेक लोक धावत आले. 

‘‘आईच्यान, मी गुप्त पोलिस नाय हो? मी आपला साधासुधा कार्यकर्ता आहे...’’ आम्ही म्हणालो.

‘‘ कशावरून?’’ डोळे गरागरा फिरवत मा. बंटीसाहेबांनी विचारले. आता कार्यकर्ता असल्याचा कुठला पुरावा असतो? आम्ही हतबल होत्साते गप्प बसलो. मा. बंटीसाहेब आणखीनच खवळले. दात-ओठ खात म्हणाले, ‘‘लेका, तुला आता एकनिष्ठेची शपथ घ्यावी लागेल! घे शपथ... म्हण... मी संविधानाची शपथ घेतो की...’’

...बाकी शपथविधी शो उत्तम प्रकारे पार पडला, ते आपण टीव्हीवर पाहिलेच.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: dhing Tang article we are 162

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: