अग्रलेख : एकजुटीचे दर्शन

विरोधी ऐक्याच्या चिरफळ्या उडत आल्याचे चित्र सातत्याने दिसत होते. परंतु दिल्लीतील सभेच्या निमित्ताने विरोधी ऐक्य टिकून असल्याचे दिसले.
india aghadi
india aghadiSakal

विरोधी ऐक्याच्या चिरफळ्या उडत आल्याचे चित्र सातत्याने दिसत होते. परंतु दिल्लीतील सभेच्या निमित्ताने विरोधी ऐक्य टिकून असल्याचे दिसले.

केंद्रातील नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारच्या विरोधात उभारलेल्या विरोधी पक्षांच्या ‘इंडिया’ आघाडीने एकत्रित प्रचाराचे रणशिंग फुंकायचे म्हटले असते, तर त्यात काही नेत्यांचे अहंकार आडवे आले असते आणि अनेकांनी संयुक्त प्रचारसभेला दांडी मारून लक्ष वेधून घेतले असते. विरोधी ऐक्याची देशातील जी परंपरा आहे, त्याला साजेसेच घडले असते.

परंतु दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या समर्थनार्थ राजधानी दिल्लीत आयोजित केलेल्या विरोधकांच्या सभेच्या निमित्ताने सगळे विरोधक एकत्र आले आणि विरोधकांच्या ऐक्याची वज्रमूठ देशवासीयांना पाहावयास मिळाली. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो न्याय यात्रे’च्या समारोपाच्या निमित्ताने मुंबईत शिवाजी पार्कवर झालेल्या मेळाव्याच्या निमित्ताने अशा एकजुटीचे प्रदर्शन घडवण्याचा काँग्रेसचा प्रयत्न होता.

परंतु तृणमूल काँग्रेससह डाव्या पक्षांनी त्यावर बहिष्कार घातल्यामुळे अपेक्षित एकजुटीचे प्रदर्शन घडणे दूर, उलट विरोधकांमधील मतभेदच प्रकर्षाने समोर आले होते. दिल्लीत रामलीला मैदानावर झालेली सभा त्यादृष्टीने वैशिष्ट्यपूर्ण ठरली. केजरीवाल यांच्या अटकेच्या निषेधार्थ आम आदमी पक्षाच्यावतीने सभेचे आयोजन करण्यात आले होते; परंतु त्याला झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन यांच्या अटकेचीही जोड देण्यात आली आणि एकूणच केंद्रीय यंत्रणांच्या गैरवापराचा विषय जोरकसपणे ऐरणीवर आणला गेला.

एवढ्या मोठ्या सभेचे श्रेय एकट्या आम आदमी पक्षाला मिळू नये, असे प्रयत्न झाले असले तरी त्या पक्षाचे आयोजनातील श्रेय नाकारता येत नाही. केजरीवाल यांच्यावर आलेल्या संकटाचे `इंडिया’ आघाडीने संधीत रुपांतर करून त्या सभेला विरोधी ऐक्याचा मंच बनवला, हे लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विरोधकांचे मोठे यश मानावे लागेल.

सोनिया गांधी, मल्लिकार्जुन खर्गे, राहुल गांधी, प्रियांका गांधी अशा काँग्रेसच्या सर्व शीर्षस्थ नेत्यांनी सभेला हजेरी लावून दिल्लीला काँग्रेसच्या अस्तित्वाची ठळकपणे जाणीव करून दिली. त्याचबरोबर ज्या आम आदमी पक्षाने दहा वर्षांपूर्वी काँग्रेसविरोधात प्रचाराची राळ उडवून दिली होती, त्या आम आदमी पक्षासोबत अडचणीच्या काळात उभे राहून भारतीय राजकारणातील उदारमतवादी परंपरेचेही दर्शन घडवले.

मोठ्या लढाईत किरकोळ मतभेद उकरून न काढता ते दुर्लक्षित करून पुढे जायचे असते, याचा धडाच यानिमित्ताने बुजुर्ग काँग्रेसने आम आदमी पक्षासह अन्य छोट्या पक्षांच्या उत्साही नेत्यांना दिला. मात्र ही लवचिकता सर्वच पक्षांकडून केवळ सभेपुरती न दिसता प्रत्यक्ष जागावाटपाच्या वाटाघाटीतही दिसली पाहिजे.

हे सांगणे आवश्यक आहे, याचे कारण ‘इंडिया’ आघाडी उभारण्यासाठी पाटणा, बंगळूर, मुंबई येथील बैठकांनंतर प्रत्यक्ष निवडणुकीच्या मैदानात फाटाफूटच पाहायला मिळाली. ‘इंडिया’ आघाडीचे पुरस्कर्ते नितीश कुमारच ‘एनडीए’च्या गोटात गेले. आजोबांच्या ‘भारतरत्न’च्या ओझ्याखाली राष्ट्रीय लोकदलाच्या जयंत चौधरी यांनीही एनडीएचा रस्ता धरला. पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जी यांनी काँग्रेसला बेदखल करून आपले उमेदवार जाहीर केले.

केरळमध्ये काँग्रेस आणि डावे आमने-सामने आहेत, तर पंजाबमध्येही काँग्रेस आणि आम आदमी पक्षातच लढत होत आहे. विरोधी ऐक्याच्या चिरफळ्या उडत आल्याचे आजवरचे भारतीय राजकारणातील चित्र होते, परंतु दिल्लीतील सभेच्या निमित्ताने वेगळे चित्र समोर आले. विरोधी ऐक्य टिकून असल्याचे दिसून आले.

ममता बॅनर्जी ‘इंडिया’ आघाडीचे नावच घेत नव्हत्या, त्यांच्या प्रतिनिधी नवनियुक्त खासदार सागरिका घोष यांनी ‘तृणमूल’ इंडिया आघाडीतच असल्याची घोषणा करून आघाडीला मोठा दिलासा दिला. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार व शिवसेना (उद्धव ठाकरे) पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना मिळालेला प्रतिसाद महाराष्ट्राचे ‘इंडिया’ आघाडीतील अस्तित्व ठळक बनवणारा होता.

व्यासपीठावर अनेक पक्षांचे बडे नेते असले तरी सर्वात मोठे नेते राहुल गांधी असल्याचे जाणवत आहे. दोन यात्रांच्या माध्यमातून कमावलेला आत्मविश्वास त्याच्या भाषणांतून जाणवतो आहे. परिवर्तनाचा प्रारंभबिंदू ठरणारे केंद्र म्हणून दिल्लीचे ‘रामलीला मैदान’ ओळखले जाते. तिथून फुंकलेले रणशिंग विरोधकांचा आत्मविश्वास उंचावणारे ठरू शकेल.

अर्थात दिल्लीतून परत गेल्यावर पश्चिम बंगालमध्ये काँग्रेस- तृणमूल कॉँग्रेस यांच्यात कलगीतुरा रंगेल, तृणमूल कॉँग्रेस-डावे यांच्यात संघर्ष सुरू होईल. केरळमध्ये काँग्रेस आणि डाव्यांमध्ये सुरू असलेली लढाई अधिक अटीतटीची बनेल आणि पंजाबमध्येही तीव्र चुरस पाहायला मिळेल. असे सगळे विरोधाभास असले तरी वर्तमान राजकारणाची गरज म्हणून आघाडीअंतर्गत हा संघर्ष मान्य करण्यात आला आहे. त्यापलीकडे जाऊन ऐक्याचा संदेश देणे गरजेचे होते, तो या सभेत दिला गेला, हे मात्र नक्की.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com