ढिंग टांग : देणाराचे हात हजार...!

British Nandi writes about shiv sena uddhav thackeray aditya thackeray politics
British Nandi writes about shiv sena uddhav thackeray aditya thackeray politicssakal

स्थळ : मातोश्री हाइट्स, वांद्रे. वेळ : टेन्शनची!

विक्रमादित्य : (तावातावाने खोलीत शिरत) बॅब्स, मी आत्ता बाहेर जाऊन आलो!

उधोजीसाहेब : (तिरकसपणाने) थँक्यू!

विक्रमादित्य : (सात्त्विक संतापाने) मला दार निराळ्याच कुणीतरी उघडलं! कोण आलंय आपल्याकडे?

उधोजीसाहेब : (गालातल्या गालात हसत) आहेत एक पाहुणे! तुझे काका आहेत ते!!

विक्रमादित्य : (चिडून) ‘बूट काढून नीट ठेव, आणि मोजे इकडे तिकडे फेकू नको,’ अशा सूचना दिल्या त्यांनी मला…माझ्याच घरात!! ही हिंमत?

उधोजीसाहेब : (चपापून) पण खरंच तू मोजे नीट काढत जा!

विक्रमादित्य : (आश्चर्यचकित होत) मी बूट काढेपर्यंत हे तुमचे काका कोचावर बसलेसुद्धा! पाय समोर टीपॉयवर टाकलेले, आणि मला म्हणतात कसे? की, ‘‘बेटा, चहा आण बरं जरा, खारी बिस्किटंही आण सोबत! जा, पळ! ’’ च्यामारी!!

उधोजीसाहेब : अरे, ते माझे काका नाहीत, तुझे काका आहेत!

विक्रमादित्य : (अविश्वासाने) मला फक्त शिवाजी पार्कवाले काका माहीत आहेत! हे कुठले नवे काका?

उधोजीसाहेब : (गूढ हसत) त्यांनाही बाळासाहेबच म्हणतात बरं! आणि ते नवे काका नाहीत काही…जुनेच आहेत! (हळू आवाजात ) जाम श्रीमंत आहेत म्हणे! परदेशात होते…लोक त्यांना जाम वचकून असतात!

विक्रमादित्य : तरीच! बंगल्याबाहेर शुकशुकाट होता!!

उधोजीसाहेब : काही लोकांना त्यांचं येणं आवडलेलं नाही! हे नवे काका आपल्याला गंडा घालून कधी पळून जातील, नेम नाही, असं लोक म्हणतात! पण मला आतला आवाज सांगतोय की, यह फेविकॉल का जोड है! नही टूटेगा!!

विक्रमादित्य : (निरागसपणाने) बॅब्स, हे नवे काका खरंच श्रीमंत आहेत का? आफ्रिकेत सोन्याच्या खाणी असलेले श्रीमंत काका परत येतात, आणि घराचं कर्जबिर्ज फेडतातटाइप? उधोजीसाहेब : (स्वप्नाळूपणाने) ते म्हणतायत, तर असतीलही त्यांच्या आफ्रिकेत सोन्याच्या खाणी! हू नोज?...हुहुहु!!

विक्रमादित्य : मला तर ही सगळी नाटकाची स्टोरी वाटतेय…

उधोजीसाहेब : (सावध होत) बाळ कोल्हटकरांचं असं एक नाटक होतं खरं! -

विक्रमादित्य : (दुप्पट निरागसपणाने) आपल्याकडे किती दिवस राहणार आहेत ते?

उधोजीसाहेब : (खांदे उडवत) कुणास ठाऊक ! जितके दिवस राहतील, तितके आपले!! त्यांचा जीव एका ठिकाणी फार रमत नाही असं तेच म्हणतात!

विक्रमादित्य : (कुतूहलानं) …पण शेजाऱ्यापाजाऱ्यांना काही कळलंय का यातलं? की बुवा, आपल्याकडे एक नवे काका आले असून, तेच यापुढे सगळं बघणार आहेत, वगैरे?

उधोजीसाहेब : (खांदे पाडून) काय सांगू तुला? या काकांनी आल्या आल्या भांडणं उकरुन काढलीन! शेजाऱ्यांनी तर दारंच लावून घेतली आहेत! सिल्वर ओकवाल्या काकांना - म्हंजे माझ्या काकांना, तुझ्या नव्हे - म्हणाले, दुपारी एक ते चार फोन करु नका!! आता काय बोलणार?

विक्रमादित्य : (चिंतेनं ) …बॅब्स, उद्या सकाळी ते नक्की तुम्हाला डबल आमलेट करायची ऑर्डर देणार!

उधोजीसाहेब : (चेवात येऊन) या उधोजीला ऑर्डरी देणारा मर्द अजून जन्माला यायचाय!

विक्रमादित्य : (विचारात पडत) हुंऽऽ…थोडक्यात, हे सगळं नवं ‘काका प्रकरण’ आपल्या एकट्याला निस्तरावं लागणार आहे तर...!

उधोजीसाहेब : (उसनं अवसान आणून) त्यांच्या खरंच सोन्याच्या खाणी असतील तर? देणाराचे हात हजार!!

विक्रमादित्य : …आणि नसतील तर? विचार करा!!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com