esakal | ढिंग टांग : आषाढाच्या पहिल्या दिवशी…!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing Tang

ढिंग टांग : आषाढाच्या पहिल्या दिवशी…!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

आषाढाच्या पहिल्या दिवशी

नभात मेघांचा कोलाहल

भिजून ओल्या कौलारांवर

रेघ धुराची, धूसर सावळ

आषाढाच्या पहिल्या दिवशी

कुंद नभाची उत्सुक गाणी

ज्येष्ठाच्या धाकात वावरे

सृष्टी सांगते मौन कहाणी

आषाढाच्या पहिल्या दिवशी

सृष्टी उघडते दार कवाड

उंबरठ्यावर उभा रांगडा

हसतो आणिक दुष्ट लबाड

हेही वाचा: राज्यातील शेतकरी मुंबईच्या सीमा रोखणार ?

आषाढाच्या पहिल्या दिवशी

धसमुसळ्याची अधीर बात

युध्दभूमिचा कुणी शिपाई

जणू परतला लई दिसात

आषाढाच्या पहिल्या दिवशी

जलमेघांची वरती वर्दळ

आणि भूमिवर इथे खालती

आतुरतेचा मादक दर्वळ

आषाढाच्या पहिल्या दिवशी

मृद्गंधाची तिसरी लाट

सुगंध लेवुनी सृष्टी सजते

पैठणीचा अन हिरवा थाट

हेही वाचा: मुंबई: व्यापारी संघटनांचा राग अनावर; ठाकरे सरकारला दिला इशारा

आषाढाच्या पहिल्या दिवशी

वीज घनातच साकळते

आणि अनावर धुंदीमध्ये

वृक्षफांदीवर कोसळते

आषाढाच्या पहिल्या दिवशी

वाऱ्यावरती डुलतो माड

दिवसाढवळ्या दिवे लावुनी

अरे साजणा, उजेड पाड

आषाढाच्या पहिल्या दिवशी

चिखल जाहला हिरवागार

पशापशाने बीज मागते

रुजण्यासाठी शेतशिवार

हेही वाचा: "लग्नाचं आमिष दाखवून हिंदू मुलानं हिंदू मुलीला फसवणंही 'जिहाद'"

आषाढाच्या पहिल्या दिवशी

सरीवर सर, सरीवर सर

काम सोडुनि उगाच बसले

खोळंब्याचे एक शहर

आषाढाच्या पहिल्या दिवशी

भल्या पहाटे मुरते ओल

आणि वीजेच्या तारांवरती

पाऊसपक्ष्याचे हिंदोल

आषाढाच्या पहिल्या दिवशी

घोंघवणारी आखाडमाशी

चहात बुडुनि घोळ घालते

स्वत: जातसे जिवानिशी

हेही वाचा: भास्कर जाधव विधानसभेचे अध्यक्ष? शरद पवारांनी केलं स्पष्ट

आषाढाच्या पहिल्या दिवशी

खिडकीमध्ये कोळिष्टक

साळुंक्यांची नुसती कलकल

आणि सदाचे खडाष्टक

आषाढाच्या पहिल्या दिवशी

घननीळाचे स्मित हल्लक

निळेसावळे हसून म्हणतो :

‘‘अजून आहे श्रीशिल्लक!’’

आषाढाच्या पहिल्या दिवशी

निळ्या धरेला निळीच बाधा

मल्हाराच्या सुरावटीवर

वसुंधरेची होते राधा

loading image