esakal | ढिंग टांग : ईडीबाईचे प्रेमपत्र...!
sakal

बोलून बातमी शोधा

pune

ढिंग टांग : ईडीबाईचे प्रेमपत्र...!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

प्रिय माननीय ना. परबसाहेब यांसी, ईडीबाईचा शतप्रतिशत प्रणाम. गेले कितीतरी दिवस तुम्हाला भेटायचं म्हणत्ये आहे, पण मेला योगच जमून येत नै. गेल्या सा म्हैन्यात तुम्हाला मी शंभर वेळा मिस कॉल दिला, पण तुम्ही कॉल रिटर्न करतच नै. बघावं तेव्हा ‘कृपया प्रतीक्षा करें’! इतकं कुणाशी बोलत असता? तुम्हाला धडकणारं हृदय आणि गुलाबाच्या फुलाची इमोजी पाठवून बघितली. पण तुम्ही रिप्लायच करत नै. माझ्यासार्खी इतकी सुस्वरुप, सेंसिटिव व्यक्ती, तुम्हाला गुलाबाची फुलं पाठवत्ये, याला काही अर्थ नाही का?

तुमच्या घरावरुन कितीवेळा चकरा मारल्या. दाराची बेल वाजवून लपल्ये! पण कुण्णीही दार उघडायला आलं नै. अखेर (तुमच्या) शेजारी चवकशी केली की, ‘‘साएब कधी भेटतील?’’ तर त्यांनी विचारलं, ‘‘कोण साहेब?’’ मी तुमचं नाव सांगितलं! तर ते म्हणाले, ‘‘येडी आहेस का? ते कुठे राहतात इथं? इथं राऊतसाहेब राहतात!’’ मग काय करणार? राऊतसाहेबांनाच प्रेमपत्र दिले पाठवून! हल्ली ते सांगायला लागले आहेत की ‘‘ईडीबाईची कितीही लवलेटरं येऊद्यात, काही बिघडत नाही!‘‘ माणूस खरंच शूर हं!

गेले कित्येक दिवस मी तुम्हाला काँटॅक करणेचा प्रयत्न करत आहे. महत्प्रयासाने तुमचा फोन नंबर मिळवला होता. महत्प्रयास म्हंजे, के. सोमय्या नावाचे एक सामाजिक कार्यकर्ते आहेत, त्यांनी तुमचा फोननंबर आणि आड्रेस स्वत:हून आणून दिला. आता तुम्ही विचाराल, यात महत्प्रयास कुठे आला? तर के. सोमय्या आले की तीन-चार तास स्वत:बद्दलच बोलत बसतात, जाता जात नाहीत! (एक दिवस त्यांनाच लेटर लिहावं असं वाटू लागलंय!) के. सोमय्यासाहेबांनी दिलेला फोन नंबरसुध्दा राँग निघाला. तो कुण्या सरनाईकसाहेबांचा होता. मग काय करणार? त्यांनाच प्रेमपत्र पाठवून दिलं. म्हटलं, राँग नंबर तर राँग नंबर! आपल्याला काय, रेकॉर्डला प्रेमपत्राची नोंद असल्याशी मतलब! के. सोमय्यासाहेब खूप सज्जन आणि चांगले आहेत. त्यांनी मला खूप होतकरुंचे नंबर आणि आड्रेस दिले. त्यांच्या हातात एक पिशवीच असते, त्या पिशवीत फायली असतात. फायलींमध्ये कोणाकोणाला मी प्रेमपत्र पाठवावं, याची टिकमार्क केलेली यादीच असते. मी त्याबरहुकूम प्रेमपत्र पाठवत्ये. एकदा त्यांना मी म्हटले, ‘‘साहेब, तुम्ही माझ्यासाठी इतकी स्थळं आणता! थँक्यू. तुम्ही

एखादं वधूवरसूचक मंडळ का काढत नै?’’ तर ते नुसते हसले, आणि म्हणाले, ‘‘आणखी अर्धा डझन होतकरुंची यादी लौकरच देत आहे! सगळ्यांना बेडीत अडकवणार! अपने को जो नड्या, समझो काम से गय्या,- कह रहा है ये के. सोमय्या!’’ जाऊ दे. असतो एकेकाचा स्वभाव!

साहेब, तुम्ही उद्या सकाळी अकरा वाजता मला भेटायला हपिसात यालका? आमचं हपिस अतिशय थंडगार आणि छान आहे. आपण एकत्र लंच घेऊ!! सध्या श्रावण चालू असल्यानं तूर्त शिवराकच बरं! गप्पा मारु, आयुष्यावर बोलू काही! काही तास एकत्र घालवून सायंकाळी आपापल्या घरी जाऊ. तुम्ही कोणालाही विचारा, ‘ईडीबाईसोबतचा लंच कसा होता?’ ते सांगतील!! कृपया माझ्या निमंत्रणाचा अनमान करु नका. नक्की या! तुमचे ते देशमुखसाहेब होते, त्यांना इतकी पत्रे पाठवूनही काही उपयोग झाला नाही. ते भेटायला आलेच नाहीत! किती हा लाजाळू स्वभाव. तुम्ही तसे करु नका. मी वाट पाहात्ये आहे.

तुमचीच. ईडीबाई.

loading image
go to top