hunger index
hunger index

अग्रलेखः वितभर खळगी, गाडाभर अन्न

भाकरीच्या चंद्राच्या शोधानेच माणसाला स्थलांतराची प्रेरणा दिली. चोचीच्या दाण्याच्या शोधासाठी त्याची आयुष्यभर भटकंती सुरू असते. जागतिकीकरणाने सुबत्तेची वाट दाखवली तरी माणसाचे दैन्य संपलेले नाही, याचे प्रत्यंतर कोरोनाच्या महासाथीत झालेल्या स्थलांतराने साऱ्या जगाला आले. व्यापक स्थलांतर भारतानेही पाहिले. रेशनसाठीच्या आणि अन्न नावाच्या पूर्णब्रह्माच्या दर्शनासाठी लागलेल्या रांगाही पाहिल्या. अन्नदातेही जागोजागी दिसले. हे चित्र एका बाजूला असतानाच समारंभांमध्ये, कार्यक्रमांत, लग्नसोहोळ्यांत आणि अन्य प्रसंगांमध्ये मोठ्या प्रमाणावर अन्न वाया घालविले जाते. या समस्येचे हे चित्र संयुक्त राष्ट्रसंघाच्या पर्यावरणविषयक ताज्या अहवालाने पुन्हा एकदा समोर आणले आहे. आफ्रिकी आणि दक्षिण आशियाई देशांतील अन्न वाया जाण्याचे प्रमाण मोठे आहे. अर्थातच भारतही अपवाद नाही.

ज्या देशात भुकेने व्याकूळ लोक रस्त्यावर रांगा लावतात, मिळेल ते गुमान खातात, त्याच देशातल्या पंचतारांकित, दिमाखदार विवाह सोहळ्यात, समारंभात पक्वानांची रेलचेल विरोधभासाचे चित्र गडद करते. आपल्याकडे किती वैविध्यपूर्ण पदार्थांच्या पंक्ती उठवल्या, किती प्रमाणात पदार्थ खाऊ घातले, किती खर्च केला, किती जिभेचे चोचले पुरवले यावर प्रतिष्ठा ठरते, असे मानणारे बरेच जण आहेत. काही ठिकाणी तर पानात थोडं का होईना, अन्न राखणे हीच फॅशन झाली आहे. विशेषतः पंचतारांकित हॉटेलमध्ये ते सर्रास दिसते. जिथे बुफे असते, तिथे पेलवणार नाही एवढे अन्न थाळीत घेतले जाते, चाखल्यानंतर जे आवडते ते फस्त होते, उरलेले थेट कचऱ्याच्या डब्यात जाते. ही संतापजनक बाब आहे.

सरकारतर्फे शाळांमधली गळती रोखण्यासाठी पोषण आहाराचे आमिषाद्वारे उपस्थिती वाढवणे आणि गरजूंच्या पोटाची खळगी भरण्यासाठी उपाययोजना केल्या जातात. अन्नसुरक्षा कायदा करून त्याद्वारे सगळ्यांना त्याची उपलब्धता करून देण्याचे प्रयत्न सरकार करत असते. अशा परिस्थितीत वाया जाणारे अन्न वाचविण्याची चळवळ हाती घ्यायला हवी. १९७२च्या दुष्काळात अनेकांनी मिळेल ते शिजवून त्यावर मीठ, तिखट घालून पोटं भरली आहेत. काहींनी "भुकेला कोंडा आणि निजायला धोंडा' ही बोलायला सोपी पण जगायला किती अवघड म्हण असते, हे अनुभवले आहे. पोटभर खायला न मिळाल्याने ग्रामीण महाराष्ट्राने मिलोच्या लालभडक भाकरी खाववत नव्हत्या, तरी पाण्याच्या घोटाबरोबर घशाखाली सरकवल्या आहेत. स्वयंपूर्णता आल्यानंतर आपल्याला अन्न नासाडीचा मुजोरपण सुचणे निश्‍चितच घातक असल्याचे हा अहवाल सांगतो आहे. जगात निर्माण होणाऱ्या अन्नाच्या १७ टक्के म्हणजे सुमारे ९३१कोटी टन अन्न आपण वाया घालवतो, दुसरीकडे ६९ कोटी लोक भुकेचा आगडोंब सहन करत तोंडचं पाणी गिळत झोपी जातात. तीन अब्ज लोकांना पुरेसे पोषक, सकस अन्न न मिळाल्याने ते कुपोषणाचे बळी ठरत आहेत. आपल्या भारतीयांच्या घरातून वर्षाला दरडोई ५० किलो अन्नाची नासाडी होत आहे. हे वागणे मुजोरपणाचेच आहे. आपल्याकडे म्हण आहे ‘खाऊन माजावे, पण टाकून माजू नये’. पण सुबत्तेने सूज आल्यामुळे आपण या नासाडीकडे गांभीर्याने पाहात नाही. काही मंडळी जेव्हा हॉटेलमधील आपल्या प्लेटमधील शिल्लक अन्न घरी नेतात, तेव्हा त्यांचे खरे तर कौतुक केले पाहिजे.

जागतिक भूक निर्देशांकात १०७ देशांमध्ये भारताचा क्रमांक ९४वा लागतो. नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेशसारखे शेजारीही आपल्यापुढे आहेत. म्हणजे कितीही घोषणा केली तरी गरिबी हटलेली नाही, म्हणूनच अन्नसुरक्षा कायदा करावा लागला. तरीही पोटभर खायला मिळत नाही, हे कटू सत्य आहे. भूक आणि माणसाचं जगणं, त्याची आर्थिक स्थिती, त्याची कमाई, घरातले शिकलेपण यावर पोषण किंवा कुपोषण अवलंबून असते. आजही हातापायाची काडे आणि नगाऱ्यासारखी फुगलेली पोटं पाहिली की कुपोषणाने भारतीयांना किती घेरलंय आणि पोटाचे घेर का वाढताहेत हे लक्षात येते. आजच्या घडीला देशात ३८टक्के मुलं कुपोषणामुळं उंची खुरटलेली आहेत. विविध उपायांची मालिका लावून ते रोखले गेलेले नाही. त्यामुळेच संयुक्त राष्ट्रसंघाने २०१६-२०२५ हे पोषणासाठीचे दशक जाहीर केले आहे. त्यामुळे "उतू नको, मातू नकोस, घेतला वसा टाकू नकोस...' हे परंपरागत कहाण्यातून बिंबवले जाणारे जगण्याचे मूल्य आपल्या प्रत्येकाच्या घराघरातून रुजले पाहिजे. कारण जगातल्या १२१किलोच्या अन्नाच्या नासाडीत घराघरातून होणाऱ्या नासाडीचेच प्रमाण ७४ किलो, अन्नसेवेतून ३२ आणि रिटेलमधून १५ किलो आहे. याबाबतीत तर आपण कोणत्याही सरकारला, त्याच्या यंत्रणेला किंवा समाजाला दोष निश्चितच देऊ शकत नाही, हे धुतल्या तांदळाइतके स्पष्ट आहे. ही मुजोरी प्रत्येकाच्या नसानसात भिनलेली आहे. आधुनिक जीवनशैली स्वीकारताना शिल्लक राहिलेल्या अन्नाचे विविध लज्जतदार, चटकदार आणि पौष्टिक पदार्थ तयार होतात, हेच विसरलो आहे. खरे तर "एक वितीच्या भुकेस पुरते तळहाताची थाळी...' हे जगण्याचं गणित आहे. जगण्यातली ही मजाच आपण गमावतो आहोत. काही वर्षांपूर्वी आफ्रिकेतील भूकबळींच्या विदारकतेची छायाचित्रे पाहिली की द्रवणारे आपले मन आता का निबर होवू लागलं आहे, हा प्रश्नच आले. उधळमाधळ ही कोणत्याच व्यवस्थेला, समाजाला न परवडणारी असते. ती रस्त्यावर आणते, म्हणूनच माणसा जागा हो नाहीतर "अपुरेपण हे नलगे नलगे पस्तावाची पाळी...' असे म्हणण्याची वेळ येईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com