esakal | अग्रलेख : विनर विनर चिकन डिनर!
sakal

बोलून बातमी शोधा

PubG

लडाख भागात सरहद्दीवर चिनी सैन्याने सुरु केलेल्या आगळीकीला पायबंद घालण्यासाठी भारत सरकारने दुहेरी उपाययोजना अंमलात आणलेली दिसते. गलवानच्या खोऱ्यातील मोक्‍याच्या जागांवर भारतीय लष्कराने चिरेबंदी मोर्चेबांधणी केल्याची वृत्ते येत आहेत. त्याचबरोबरीने हे युद्ध बाजारपेठेत लढण्याची तयारीदेखील भारताने सुरू केली आहे, असे दिसू लागले आहे.

अग्रलेख : विनर विनर चिकन डिनर!

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

लडाख भागात सरहद्दीवर चिनी सैन्याने सुरु केलेल्या आगळीकीला पायबंद घालण्यासाठी भारत सरकारने दुहेरी उपाययोजना अंमलात आणलेली दिसते. गलवानच्या खोऱ्यातील मोक्‍याच्या जागांवर भारतीय लष्कराने चिरेबंदी मोर्चेबांधणी केल्याची वृत्ते येत आहेत. त्याचबरोबरीने हे युद्ध बाजारपेठेत लढण्याची तयारीदेखील भारताने सुरू केली आहे, असे दिसू लागले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चिनी सैन्याने कुरापत काढल्यानंतर आपल्या देशात चिनी उत्पादनांवर बहिष्कार टाकण्याची आवाहने केली गेली. युद्धजन्य स्थितीत राष्ट्रीय अस्मितेचे असे आविष्कार घडून येणे, एकप्रकारे स्वाभाविक मानायला हवे. लडाखच्या भूमीत राहून विद्यादानाचे काम करणारे प्रसिद्ध अभियंते सोनम वांगचुक यांनी चिनी बुलेटला भारतीय वॉलेट (पैशाचे पाकिट) ने उत्तर द्या, असे आवाहन केले होते. त्यानंतर गेल्या महिन्यात केंद्र सरकारने भारतीय बाजारात वापरात असलेल्या सव्वाशेहून अधिक चिनी ॲप्सवर बंदी लादली, त्यात लोकप्रिय अशा ‘टिकटॉक’चाही समावेश होता. बुधवारी केंद्र सरकारने आणखी ११८ चिनी ॲप्सवर बंदी आणली, त्यात तरुणांमध्ये प्रचंड क्रेझ असलेल्या ‘पबजी’ या युद्धखेळाच्या अपचा समावेश आहे. जगभरात हा खेळ आपापल्या मोबाइल फोनवर अपरंपार आणि अहर्निश खेळला जातो. खेळणाऱ्यांची संख्या काही कोटींमध्ये आहे. त्यापैकी २४ टक्के खेळगडी भारतात आहेत. आपल्या देशात दररोज सुमारे पंधरा लाख मोबाइल फोनद्वारे हा खेळ खेळला जातो.

‘पबजी’, ‘टिकटॉक’ सारखी चिनी ॲप्स भारताच्या सार्वभौमत्वाला नख लावू शकतात, असे कारण केंद्राच्या माहिती तंत्रज्ञान खात्याने बंदी घालताना दिले आहे. परंतु, ‘पबजी’वर बंदी आणून भारताने नेमके काय साधले? हा खेळ खरोखर चिनी बनावटीचा आहे का? हे जाणून घेणे येथे सयुक्तिक ठरावे.

‘पबजी’ या खेळाचे संपूर्ण नाव ‘प्लेअर अननोन्स बॅटलग्राऊण्ड’. नावाप्रमाणे हा युद्धखेळ आहे. शंभरेक खेळाडूंना या मोबाइल युद्धात ऑनलाइन सहभागी होता येते. समोर येईल त्याला गोळ्या घालत किंवा अन्य अस्त्रे वापरत मारत सुटायचे, आणि शेवटी उरेल तो विजेता. ‘विनर विनर चिकन डिनर’ हे पबजीचे लाडके घोषवाक्‍य. म्हणजे जिंकणाऱ्याला मुर्गीचे जेवण! अर्थात ते चिनी कंपनी काही विजेत्याला देत नाही. ते आपले आपणच पकवायचे, आणि जेवायचे! या खेळाच्या ऑनलाइन स्पर्धा होतात. त्यात बक्षीसे मात्र खरीखुरी व रोख असतात. अशा ऑनलाइन लढती जिंकून भारतातील डझनभर कोवळ्या महाभागांनी वर्षभरात लाखो रुपये जिंकल्याचे दाखले आहेत.

सारांश एवढाच, की हा खेळ काही जणांना पैकाही मिळवून देतो. या खेळाचा जनक ब्रेंडन ग्रीन नावाचा एक आयर्लंडचा तरुण डिझायनर आहे. एका कोरियन कंपनीसाठी त्याने हा खेळ तयार केला. २०१७मध्ये या खेळावर खुद्द चीनने बंदी लादली होती. पण ‘टेन्सेंट’ या चिनी कंपनीने कोरियन कंपनीत भरभक्कम गुंतवणूक करुन खेळाचे हक्क हस्तगत केले, आणि त्याची मोबाइल फोनवर खेळण्याजोगी आवृत्ती बाजारात आणली. आज या खेळातून मिळणारा ५३ टक्के नफा चिनी टेन्सेंट कंपनीकडे जातो. उरलेले पैसे कोरियन मूळ कंपनी आणि अमेरिकेतील एका भागीदार कंपनीकडे जातो. एवढी माहिती अशासाठी दिली की या बंदी आणलेल्या पबजी खेळाची मालकी नेमकी कोणाकडे आहे, हे लक्षात यावे.

दोन वर्षांपूर्वी एका विद्यार्थ्यांच्या मेळ्यात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एका विद्यार्थ्यासंबंधी बोलताना ‘तो पबजीवाला आहे का?’ अशी विचारणा केली होती. हा खेळ पौगंडवयातील मुले-मुली हिरीरीने खेळतात, हे त्यांनाही ठाऊक होते. मोबाइल फोनवर तासंतास खेळत बसणे हा एक मनोरोग आहे, याचीही चर्चा आपल्याकडे अधूनमधून होत असते. पबजी किंवा त्याआधी ‘पोकेमॉन गो’ अशा खेळांमुळे अनेक मुलांनी आत्मघात करुन घेतल्याच्या घटनाही आपल्याकडे घडल्या आहेत. पबजीसारख्या ॲपआधारित खेळांवर बंदी आणल्याने आपण चिनी अर्थव्यवस्थेचे कंबरडे मोडू, अशा भ्रमात कोणी राहू नये. परंतु, भारताने लादलेली बंदी हा एक प्रतीकात्मक इशारा आहे. संघर्ष केवळ सरहद्दीपुरता सीमित न राहता तो अन्य अनेक आघाड्यांवर लढला जाईल, असा संकेत त्यात दडलेला आहे. शिवाय अशा प्रकारचे खेळ बंद करुन देशी खेळांना उत्तेजन दिले तर त्यातून नव्या संधी निर्माण होतील, असा एक दीर्घ पल्ल्याचा महत्त्वाकांक्षी विचार यामागे आहेच.

देशी खेळांची, देशातील परिसर, पर्यावरण व संस्कृती यांना अनुरूप अशी ॲप बनवणे हे खरे आपल्यापुढचे आव्हान आहे. खरे म्हणजे त्यासाठीच्या कल्पकतेचा आपल्याकडे अभाव आहे, असे अजिबात नाही. पण ही कल्पकता उद्योजकतेत परावर्तीत होत नाही, ही अडचण आहे. पंतप्रधानांनी ‘मन की बात’मध्ये आवाहन केले ते या संदर्भातही होते. सायबरांगणातील या बाजारपेठीय युद्धात विजयाचे ‘चिकन डिनर’ कोणाला मिळणार? हे येणारा नजीकचा काळ ठरवेल.

Edited By - Prashant Patil

loading image