esakal | अग्रलेख : झाकोळले मैत्र जीवांचे
sakal

बोलून बातमी शोधा

Environment

ही धरती प्रत्येकाची गरज पूर्ण करेल; पण प्रत्येकाची हाव नाही पुरवू शकणार, असे महात्मा गांधींनी म्हटले आहे. ऋषींनी, संतांनी पृथ्वी आणि पर्यावरणाचे कितीतरी गुणगान केले आणि ते आपल्या ओठावर असले, तरी कृती त्याच्या नेमकी विपरीत आहे. ‘लिव्हिंग प्लॅनेट’च्या अहवालात माणसाच्या या वृत्तीवर, त्याच्या हावरटपणावर बोट ठेवत जगातील जैवविविधेचा अतिसंहारक विनाशच गेल्या ५० वर्षांत झपाट्याने केल्याचे नमूद केले आहे.

अग्रलेख : झाकोळले मैत्र जीवांचे

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

ही धरती प्रत्येकाची गरज पूर्ण करेल; पण प्रत्येकाची हाव नाही पुरवू शकणार, असे महात्मा गांधींनी म्हटले आहे. ऋषींनी, संतांनी पृथ्वी आणि पर्यावरणाचे कितीतरी गुणगान केले आणि ते आपल्या ओठावर असले, तरी कृती त्याच्या नेमकी विपरीत आहे. ‘लिव्हिंग प्लॅनेट’च्या अहवालात माणसाच्या या वृत्तीवर, त्याच्या हावरटपणावर बोट ठेवत जगातील जैवविविधेचा अतिसंहारक विनाशच गेल्या ५० वर्षांत झपाट्याने केल्याचे नमूद केले आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

प्राण्यांच्या नैसर्गिक अधिवासांवर  बेमुर्वतपणे होत असलेली आक्रमणे, बेकायदा शिकारी, प्रदूषण अशी अनेक कारणे यामागे आहेत. औद्योगिक क्रांती आणि त्यानंतर एकरेषीय विकासाची गतिमान झालेली प्रक्रिया यांच्या सृष्टीवरील परिणामांचे चटके जाणवू लागले आहेत. एकीकडे अनेक राष्ट्रे आपापल्या कोशात जाण्याच्या मागे असताना या पृथ्वीपुढील समस्यांच्या निराकरणासाठी ती मनापासून एकत्र येतील का, असा मुख्य प्रश्‍न आहे. काळजी आहे ती हीच.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

अहवालातील निरीक्षणे ओझरती जरी डोळ्यांखालून घातली तरी डोळ्यांत झणझणीत अंजन घातले जाईल, अशी स्थिती आहे. आशियातली जैवविविधता ४५, तर लॅटिन अमेरिका, कॅरेबियन भागातील ९४ टक्‍क्‍यांनी घटली आहे. पाच दशकांत जगाची जैवविविधता सुमारे ७० टक्‍क्‍यांनी घटली आहे. जगातले प्राणी, पक्षी, गोड्या पाण्यातील जलचर दोन तृतीयांशने घटले, वाढत्या लोकसंख्येची गरज भागवणाऱ्या वारेमाप शेतीमुळे ७५ टक्के जमिनीचे आरोग्य खालावले. सागराच्या ४० टक्के भागाची प्रदूषणाने हानी झाली, १२ टक्के सस्तन प्राण्यांना धोक्‍यात आणले. पृष्ठवंशीय प्राण्यांच्या ४००० प्रजातींचा वेध घेता, त्यातील ६८ टक्‍क्‍यांचा पाच दशकांत (१९७०-२०१६) ऱ्हास झाला.

‘ॲमेझॉन’चे पर्जन्याच्छादित जंगल २० टक्‍क्‍यांनी घटले. १९६० मध्ये पाच टक्के समुद्रपक्ष्यांच्या पोटात प्लास्टिक होते, आज हेच प्रमाण ९० टक्‍क्‍यांवर पोहोचले. गेल्या काही वर्षांत पृथ्वीचे तापमान वाढले, पावसाचा लहरीपणाही अंदाजापलीकडे गेला आणि वादळेदेखील. ऑस्ट्रेलिया, ब्राझीलमधील ॲमेझॉनचे जंगल, अमेरिकेतील कॅलिफोर्निया, वॉशिंग्टन, ओरेगॉनच्या आगींकडे, मॉरिशस आणि इतरत्र सागराचे प्रदूषण यांच्याकडे बोट दाखवून आपण फक्त त्यांनाच जबाबदार धरू शकत नाही. जैवविविधतेच्या ऱ्हासात भारतदेखील आघाडीवर आहे. देशातील वन्यप्राण्यांत १२, तर पक्ष्यांत तीन टक्‍क्‍यांनी घट झाली आणि १९ टक्के उभयचर प्राण्यांचे अस्तित्व धोक्‍यात आले आहे. एकीकडे जंगल वाढत असल्याचा डिंडिमा वाजवत असलो, तरी समुद्रकिनाऱ्यावरील जंगलझुडपे घटत आहेत. घनदाट जंगले संपत आहेत. त्यांच्यात झालेली वाढ केवळ समाधानापुरती आहे, असे तज्ज्ञ सांगत आहेत.

केरळसह पश्‍चिम घाट परिसरात कोसळणाऱ्या दरडी, झपाट्याने वितळणाऱ्या हिमनद्या, जंगलसंपत्तीचा ऱ्हास पाहूनही आपण पर्यावरणाची हानी सुरूच ठेवली आहे. करंटेपणाने, निर्लज्जपणे कोरडी चर्चा मात्र करतो. उक्ती आणि कृतीतील फरक, झपाटल्यासारखे औद्योगीकरण करताना पर्यावरणाची वारेमाप हानी याची किंमत आपण मोजत आहोत.

पर्यावरणसंवधर्नाचे संकेत पायदळी तुडवणे, त्याच्यासाठीच्या कायद्यातील कठोरता सरकार बदलेल तसे कमी-अधिक होते आहे. त्यातून पर्यावरणावर बसणाऱ्या प्रत्येक घावाची किंमत आपल्या प्रत्येकाला मोजावी लागत आहे.

एकशिंगी गेंडे, गिधाडे यांच्यासह अनेक वन्यजीवांची हाताच्या बोटांवर मोजता येणारी संख्या त्यांच्या अस्तित्वाचे धोके अधोरेखित करत आहे. काही वर्षांपासून वाढणारा वाघ, हत्ती, गवे, हरणांसह वन्यप्राणी आणि मानव यांच्यातील संघर्ष पाहता आपला नाकर्तेपणा आणि पर्यावरणाविषयीची उदासीनता स्पष्ट करत आहे. सध्या कोरोनाशी आपण जीवनसंघर्ष करत आहोत. पण भविष्यात वन्यजीवांशी आपला संपर्क वाढत जाईल, तितकेच कोरोनासारखे जागतिक साथीचे आजार फैलावू शकतात, हे तज्ज्ञ सांगत आहेत, त्याकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. 

हवामानातील बदलातून वाढणारे उष्णतामान माणसाला पाणी पाणी करायला लावत आहे. दुसरीकडे सातत्याने पडणारे दुष्काळ घशाची कोरड वाढवत आहेत, अन्नान्नदशा करत आहेत. माॅन्सूनचा लहरीपणा, बदलते पाऊसमान पीक पद्धतीचे गणितदेखील बिघडवत आहे. महापूर आणि दुष्काळ यांची एकाचवेळी अनुभूती वेगवेगळ्या भागात येते आहे. ‘जगा आणि जगू द्या’, ही संतवचने उद्‌धृत करत जैवविविधतेवर कुऱ्हाड चालवण्याचा करंटेपणा करतो आहोत, याची जाणीव आता व्हावी. उत्क्रांती हा सृष्टीचा नियम. नव्याने काही प्राणी, पक्षी, जीवजंतू यांच्या प्रजाती जन्मालाही येतील. पण जैवसाखळीतले तुटलेपणाचे काय? खरे तर प्रत्येक छोट्यामोठ्या क्षेत्रात त्याची स्वतःची जैवसाखळी असते. त्याच्यात बिघाड झाला की तिथले सगळे सूत्र बिघडते.

अस्तित्वाचा संघर्ष सुरू होतो. ग्रेटा थंगबर्गसारखी शाळकरी मुलगी जगातल्या प्रत्येकाला विचारते आहे, ‘आमच्या भवितव्याचे काय?’ आम्हाला उद्याची पहाट कशी पाहावी लागणार आहे. त्यातील बिघाडाचे दायित्व कोण घेणार आहे? ग्रेटा ही तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरात आहे. कधीतरी त्यांच्या जीवनात काय वाढून ठेवतोय, याचा विचार केला तर... तसा तो केला आणि योग्य कृती केली तरच उज्ज्वल भविष्यकाळ पुढच्या पिढीला देऊ शकू. 

Edited By - Prashant Patil

loading image