esakal | अग्रलेख : क्रिकेटच्या आभाळातले ‘इंद्रवज्र’
sakal

बोलून बातमी शोधा

MS_Dhoni

अत्यंत भरवशाचा फलंदाज, निष्णात यष्टिरक्षक, धूर्त चाली रचणारा कर्णधार, गरजेपुरता चतुर गोलंदाज, स्वत:च्या उदाहरणासह सहकाऱ्यांना प्रेरित करणारा ज्येष्ठ बिरादर आणि कठीण प्रसंगीदेखील धीरोदात्तपणे लढत जिंकणारा ‘फिनिशर’ अशा कितीतरी भूमिकांमध्ये धोनी वावरला.

अग्रलेख : क्रिकेटच्या आभाळातले ‘इंद्रवज्र’

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

स्वातंत्र्यदिनाच्या सायंकाळी अचानक महेंद्रसिंग धोनी नावाच्या महानायकाने ‘आज संध्याकाळी सात वाजून २९ मिनिटांनी मी निवृत्त झालो आहे, असे समजा’ अशा आशयाचे ट्विट केले. सोबत एक उलगडत जाणारा फोटो अल्बम, आणि ‘मैं पल दो पल का शायर हूं, पल दो पल मेरी हस्ती है…’ हे भावमधुर फिल्मी पार्श्वगीत. अवघे क्रिकेट जगत जागच्या जागी खिळले. माध्यमांमधल्या बातम्यांचे पवित्रे बदलले. एका जबरदस्त पराक्रमी योद्ध्याने आपली समशेर आणि दमगीर झालेले जोडे अंतिमत: टांगले आहेत, याची किंचित काळीज दुखवणारी जाणीव झाली. 

गेल्या दीडेक वर्षात धोनीचे मैदानावरचे दर्शन घडलेले नाही. पण तो दिसत नसला तरी तो अजून ‘आहे’ ही जाणीवदेखील पुरेशी होती. धोनी निवृत्त झाल्यात जमा होता, कधी ना कधी हा क्षण येणार, हे साऱ्यांनीच गृहीत धरले होते. परंतु, तरीही चटका बसायचा तो बसलाच. त्याच्या जोडीला, एकेकाळचा बिनीचा फलंदाज सुरेश रैना यानेदेखील धोनीपाठोपाठ आपणही हातातली बॅट खाली ठेवत असल्याचे जाहीर केले. एकाच दिवशी दोन नायकांच्या कारकिर्दी संपल्या, ही बाब भारतीय क्रिकेटवेड्या मनाला फारशी झेपण्यासारखी नाहीच! पण मैदानात बर्फाळ डोक्याने खेळी करून प्रतिस्पर्धी संघाला बेसावध क्षणी गाठायचे ‘धोनीतंत्र’ या शेवटच्या क्षणीही दिसले. धोनी ‘फिनिशर’ म्हणून नावाजलेलाच होता. ऐन वेळी, अखेरच्या षटकात किंवा अखेरच्या चेंडूवर सामना फिरवून शांतपणे पॅव्हेलियनकडे चालत जाणारा धोनी बघितला की क्रिकेटवेडे प्रेक्षक चकित व्हायचे. अवघे स्टेडियम विजयाच्या आरोळ्यांमध्ये मश्गूल असताना हा पठ्ठ्या ‘तो मी नव्हेच’ छापाच्या निर्विकार चालीने ग्रीनरुमकडे जायचा. मैदानातही त्याच्या चेहऱ्यावर कधी त्राग्याचे भाव उमटले नाहीत की आनंदातिरेकातही अपशब्द ओठांवर आला नाही. यष्टिरक्षक म्हणून उभा असलेला धोनी फलंदाजाच्या बेसावध पावलाचा इंच इंच मोजून घेत असायचा, झपकन चेंडू कलेक्ट करून बेल्स उडवायचा, तेव्हा त्याने नेमके काय केले, हे टीव्ही रिप्लेमध्येच फलंदाजालाही कळायचे. फलंदाजीसाठी उतरायचा, तेही अर्धीअधिक फळी घरी परतल्यावर! तिथून पुढे तो सामना ‘अंजाम तक’ पोचवण्याची जबाबदारी धोनीच्या खांद्यावर असायची. अशा कितीतरी रोमहर्षक लढतींमध्ये धोनीने भारतीय संघाला विजय मिळवून दिले आहेत. जिथे एकेरी धाव मुश्किलीने निघण्याची शक्यता असे, तिथे धोनी- रैना किंवा धोनी-विराट कोहली असल्या जोड्या दोन-दोन धावा वसूल करत. भारतीय खेळात तुफानी वेग आणि ऊर्जा आणण्याचे श्रेय नि:संशय कर्णधार धोनीलाच द्यावे लागेल. 

Breaking : धोनीसोबत सुरेश रैनाचीही निवृत्तीची घोषणा

नव्या सहस्रकाच्या उंबरठ्यावर धोनीचा भारतीय क्रिकेटमध्ये प्रवेश झाला. तेव्हा कपिलदेव निखंज नावाचा सूर्य अस्तमान होत होता, आणि सचिन तेंडुलकर नावाचे साखरस्वप्न भारताला पडू लागले होते. सौरव गांगुली, राहुल द्रविड आदी मंडळी आपला जम बसवून होती. त्यांच्यात रांचीचा एक छोरा आला. टारझनटाइप मानेवर रुळणारे केस, भीमाच्या गदेसारखी फिरणारी बॅट, आणि यष्टिरक्षणात कमालीचा तरबेज असा हा क्रिकेटपटू, रणजी आणि देवधर करंडकात नाव कमावून इथवर आला होता. भारतीय क्रिकेट संघात स्थान मिळवण्यासाठीही त्याला बरीच मेहनत करावी लागली होती. ना कुणी गॉडफादर, ना मुंबई-दिल्लीतल्या तरुण खेळाडूंना मिळते, तसे मार्गदर्शन. रेल्वे खात्यात तिकीट तपासनीस म्हणून खरगपूरच्या स्टेशनात तिकिटे गोळा करणारा हा तरुण पुढील आयुष्यात देदीप्यमान विजयांचे हार गोळा करणार आहे, असे तेव्हा कोणाला वाटले असेल? 

२००४मध्ये बांगलादेशच्या दौऱ्यावर आपल्या आंतरराष्ट्रीय पदार्पणाच्या लढतीतच तो बिचारा धावचीत होऊन शून्यावर परतला. पण तिथून पुढे सुरू झाले, ते भारतीय क्रिकेटच्या इतिहासातले एक विजयपर्व होते. याच तरुणाच्या समर्थ आणि समंजस नेतृत्वाखाली पुढे भारतीय संघाने २००७ मध्ये टी-ट्वेंटी विश्वकरंडक उचलला. २०११मध्ये एकदिवसीय क्रिकेटचा विश्वकरंडक खेचून घेतला, आणि २०१३ या वर्षी ‘चँपियन्स ट्रॉफी’ जिंकली. 

'माही जैसा कोई नहीं!'​

२००९मध्ये भारतीय संघ जगात अव्वल स्थानावर आला. ९० कसोटी सामने, साडेतीनशे एकदिवसीय लढती आणि ९८ ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटच्या झुंजी ही धोनीच्या सोळा वर्षांच्या कारकिर्दींतली जमापुंजी आहे. अत्यंत भरवशाचा फलंदाज, निष्णात यष्टिरक्षक, धूर्त चाली रचणारा कर्णधार, गरजेपुरता चतुर गोलंदाज, स्वत:च्या उदाहरणासह सहकाऱ्यांना प्रेरित करणारा ज्येष्ठ बिरादर आणि कठीण प्रसंगीदेखील धीरोदात्तपणे लढत जिंकणारा ‘फिनिशर’ अशा कितीतरी भूमिकांमध्ये धोनी वावरला. गतसाली विश्वकरंडकाच्या उपांत्य लढतीत मँचेस्टर येथे झालेल्या उपांत्य लढतीत मार्टिन गप्टिलचा थ्रो अचूकपणे यष्टींवर कोसळल्याने धोनी धावचीत झाला, भारताचे विश्वकरंडकाचे स्वप्नही भंगले. तिथून धोनी खरे तर दिसलाच नाही. पहिल्या आणि अखेरच्या लढतीत धावचीत ठरलेल्या या लढवय्याने मधली सोळा वर्षे विजयी सप्तरंगांनी मढवून काढली. त्या रंगांचे एक क्षितीजव्यापी वर्तुळ पूर्ण झाले. वर्तुळाकृती इंद्रधनुष्य ही निसर्गातली अनोखी घटना असते. त्याला ‘इंद्रवज्र’ असे म्हणतात. क्रिकेटच्या दुनियेत त्याला महेंद्रसिंग धोनी असे नाव आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

(Edited by : Ashish N. Kadam)