अग्रलेख: आता तरी जागे व्हा

oxygen cylinder
oxygen cylinder

परस्परांवर आरोप-प्रत्यारोप करण्याचा खेळ थांबवून कोविडच्या संकटावर मात करण्यासाठी एकदिलाने काम करण्याचे सरसंघचालकांचे आवाहन महत्त्वाचे आहे; पण ते आचरणात येणार का, हा प्रश्न सध्याचे एकूण राजकीय चर्चाविश्व पाहता उपस्थित होतो.

कोरोना विषाणूने भारतावर चढवलेल्या दुसऱ्या हल्ल्याने देशभरात हाहाकार उडवून दिलेला असतानाच, आता थेट राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी या विषयावर प्रथमच स्पष्टपणे काही विचार मांडले आहेत. ‘कोरोनाची पहिली लाट ओसरू लागल्यानंतर जनता, प्रशासकीय यंत्रणा व सरकारही गाफील राहिले’, असे उद्‍गार भागवत यांनी काढले आहेत. त्याचवेळी ‘एकमेकांवर दोषारोप करण्याची ही वेळ नाही, तर कोरोनाच्या मुकाबल्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन काम करायला हवे’, असा वडिलधारा सल्लाही त्यांनी संघपरिवाराचे कुटुंबप्रमुख या नात्याने दिला आहे. हे आवाहन सध्याच्या आप्तकालिन परिस्थितीचा विचार करता महत्त्वाचे आहेच. पण त्याला प्रतिसाद कसा मिळणार हा प्रश्न आहे. याचे कारण अर्थातच दुभंगलेले राजकारण आणि त्याचे चर्चाविश्व. जेथे परिस्थिती आटोक्यात आहे, तेथे श्रेय घेण्याचा खटाटोप करायचा आणि जेथे कोरोनाची परिस्थिती गंभीर आहे, तेथे आपल्या विरोधकांना जबाबदार धरण्याचा प्रयत्न करायचा, असे गेले काही दिवस सातत्याने पाहायला मिळत होते. महाराष्ट्र सरकारने दिलेली कोविडबाधितांची आकडेवारी फसवी असल्याचा महाराष्ट्रातील विरोधी पक्षनते देवेंद्र फडणवीस यांचा आरोप हे त्याचे ताजे उदाहरण. एकीकडे खुद्द मोदी आणि नीती आयोगानेही महाराष्ट्र सरकारची प्रशंसा केली असताना राज्यातील विरोधी पक्षनेते वेगळा सूर लावत आहेत. अर्थात देशभरात हे असे प्रकार चालू आहेत. अशा आरोप-प्रत्यारोपांत नवे काही नाही; पण आता संघ-भाजप परिवारातूनच भाजप सरकारांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी व्यक्त होत आहे आणि त्याची दखल घ्यावी लागेल.

oxygen cylinder
अग्रलेख : स्वप्नपूर्ती की समाप्ती?

नाराजीचा सूर

कोविडच्या हाताळणीवरून महाराष्ट्रात भाजपनेत्यांकडून होत असलेल्या ‘ब्लेम गेम’बद्दल केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही अलीकडेच नापसंती व्यक्त केली होती; तर भाजप आणि विशेषत: मोदी यांचे कडवे समर्थक म्हणून ओळखले जाणारे अभिनेते अनुपम खेर यांनीही एक ट्वीट करून ‘सध्याचा काळ हा आपल्या चुका मान्य करण्याचा आहे, प्रतिमा व्यवस्थापनाचा नाही’, असे जळजळीत अंजन भाजप नेत्यांच्या डोळ्यात घातले होते. त्यामुळे आता संघपरिवार आणि भाजप नेते यांच्यात मोदी तसेच केंद्र सरकारचा कारभार याबाबत गेल्या सात वर्षांत प्रथमच नाराजीचा सूर उमटू लागल्याचे स्पष्ट होत आहे. उत्तर प्रदेशातील योगी आदित्यनाथ सरकारविरोधातही कोरोना नियंत्रणातील कमालीच्या बेफिकिरीबाबत तीव्र असंतोष आणि तोही स्वपक्षीयांकडूनच गेल्या दोन आठवड्यांपासून जाहीरपणे व्यक्त होऊ लागला आहे. केंद्रीय राज्यमंत्री संतोष गंगवार यांनी सहा मे रोजीच योगी आदित्यनाथ यांना एक पत्र लिहून, ऑक्सिजनचा तुटवडा तसेच इस्पितळात बेड मिळण्यास होणारा अक्षम्य विलंब याबाबत संताप व्यक्त केला होता. आदित्यनाथ यांचे मंत्रिमंडळातील एक सहकारी आणि लखनौचे आमदार कौशल यांना कोविडमुळे आपल्या भावास गमवावे लागले. ते आणि बस्तीचे खासदार हैश द्विवेदी, भदोहीचे आमदार दीनानाथ भास्कर तसेच कानपूरचे खासदार सत्यदेव पचौरी आदी आणखी काही भाजप नेत्यांनीही आदित्यनाथ यांना प्रशासकीय गोंधळाबाबत संताप व्यक्त करणारी पत्रे लिहिली आहेत. मात्र, सरसंघचालकांनी सरकारच्या बाबतीत व्यक्त केलेले मत अधिक स्पष्ट आहे.

oxygen cylinder
अग्रलेख : मौनराग सोडा

संघाने आपल्या ‘कोविड रिस्पॉन्स टीम’तर्फे ‘आपण जिंकणारच : अपार सकारात्मकता ’ या विषयावर आयोजित केलेल्या चर्चासत्राचा समारोप करताना, भागवत यांनी याच चर्चेत ‘विप्रो’चे अध्यक्ष अझीज प्रेमजी यांच्या प्रतिपादनाचा धागा पुढे नेत परस्परांवर दोषारोप टाळण्याचे आवाहन केले. आपल्या भाषणात त्यांनी सर्वांना बरोबर घेत पुढे जाण्याच्या आवश्यकतेवर भर दिला. सध्याच्या आपत्कालिन परिस्थितीच्या संदर्भात हे विधान आहे, हे खरेच, पण त्याला आणखी एक परिमाणही आहे. ते म्हणजे २०१४ नंतर सरकारच्या कारभाराविषयी,त्यातील कोणत्याही पैलूविषयी संघनेत्यांनी जाहीरपणे प्रतिकूल व्यक्त केल्याचे आढळले नव्हते. ते प्रथमच घडले आहे. वास्तविक सध्याच्या आपत्तीचे स्वरूप पाहता देशात सहमतीचे आणि खांद्याला खांदा लावून काम करण्याचे वातावरण तयार करण्यासाठी याआधीच प्रयत्न व्हायला हवे होते. अशा प्रकारचे व्यापक सहमतीचे वातावरण निर्माण होणे हे कोविडविरोधी लढ्याच्या परिणामकारकतेसाठी आवश्यकच होते. त्यासाठी सर्वच पक्षांचे सहकार्य लागेल, हे खरेच असले तरी सत्ताधारी पक्षाचा पुढाकार त्या बाबतीत जास्त आवश्यक होता. पण तसे काही झालेले नाही. आता निदान सरसंघचालकांच्या आवाहनानंतर ही परिस्थिती बदलावी, अशी अपेक्षा आहे. यातून काही चांगले घडले आणि संभाव्य तिसऱ्या लाटेचा सामना अधिक सावधपणे केला गेला, तर त्यामुळे सर्वांचेच भले होईल. त्यानंतरच ‘भागवतबोधाची’ची नेमकी फलश्रुती काय, तेही स्पष्ट होणार आहे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com