अग्रलेख : सुवर्णशतकाची आस

आशियाई स्पर्धांमध्ये भारताने गाठलेले पदकांचे शतक आनंददायी आहे. पण हे सकारात्मक स्थित्यंतर अचानक घडलेले नाही.
Neeraj Chopra
Neeraj Choprasakal

आशियाई स्पर्धांमध्ये भारताने गाठलेले पदकांचे शतक आनंददायी आहे. पण हे सकारात्मक स्थित्यंतर अचानक घडलेले नाही. अनेक पूरक घटक एकत्र आल्याने हे सोनेरी यश भारताच्या पदरात पडले. गेल्या दोन दशकांमध्ये वेगाने बदलत गेलेली क्रीडासंस्कृती या यशाच्या पाठीशी होती.

जगज्जेते खेळाडू हे एका रात्रीत जन्मत नसतात. दशकानुदशके त्यांचे संगोपन करावे लागते. खेळाडूंच्या पिढ्या घडवाव्या लागतात. त्यासाठी क्रीडासंस्कृतीने बाळसे धरावे लागते. खेळासाठी पोषक असे पर्यावरण निर्माण करणे ही प्रायः समाजव्यवस्थेची जबाबदारी असते. या सर्व भवति न भवतिमधूनच जगज्जेते तयार होत असतात.

हांग् चौऊ येथे नुकत्याच संपलेल्या आशियाई क्रीडा स्पर्धेत आत्तापर्यंत कधी नव्हती एवढी दिमाखदार कामगिरी करणाऱ्या भारतीय संघाने पदकांचे शतक गाठल्यामुळे क्रिकेटेतर खेळांचे झाडही आता बहरू लागले आहे, असे दिसते. आशियाई क्रीडास्पर्धा म्हणजे आशियातले ऑलिंपिक! मुख्य ऑलिंपिक स्पर्धेत भारताची पदके वाढू लागली आहेत, मग आशियाई क्रीडा स्पर्धेत पदकांचे शतकी सीमोलंघन होणे अपेक्षित होते.

त्यानुसार घडले; पण २००२ मध्ये झालेल्या आशियाई स्पर्धेत केवळ ३६ तर २०१८च्या स्पर्धेत मिळवलेल्या ७० पदकांवरून यावेळी १०७ ही झेप खरोखरीच कौतुकास्पद. हे सकारात्मक स्थित्यंतर अचानक घडलेले नाही. अनेक पूरक घटक एकत्र आल्याने हे सोनेरी यश भारताच्या पदरात पडले. यशाचा महामार्ग ‘खेलो इंडिया’सारख्या स्पर्धांमधून तयार झाला हे खरे; परंतु गेल्या दोन दशकांमध्ये वेगाने बदलत गेलेली क्रीडासंस्कृती या यशाच्या पाठीशी होती.

गेल्या ऑलिंपिक स्पर्धेत पदकविजेते वेटलिफ्टर मीराबाई चानू, पी.व्ही. सिंधू आणि बजरंग पुनिया हे अनुभवी खेळाडू या आशियाई स्पर्धेत रिकाम्या हाती परतात; पण साताऱ्याच्या ‘लक्ष्य अकादमी’त तयार होणारे जेमतेम विशी गाठत असलेले ओजस देवताळे आणि आदिती स्वामीसारखे तिरंदाज पदके मिळवतात, हा आहे बदलत असलेला भारत!

अरे बस्स झाला खेळ...आता जरा अभ्यासाकडे बघा, असा सूर पूर्वीच्या काळी घराघरांत उमटायचा. अभ्यास केल्यानंतर उरलासुरला वेळ खेळासाठी द्यायचा, अशी धारणा त्याकाळी रुजलेली होती. पण आता चित्र काहीसे बदलले आहे. ओजसने सुवर्णपदक मिळवल्यावर त्याचे ७८ वर्षांचे आजोबा आनंदाने नाच करतात, हा प्रसंग खेळाला मिळत असलेल्या प्राधान्याचे केवळ एक प्रातिनिधिक उदाहरण.

घराघरांत आता आपल्या पाल्याने कोणता ना कोणता त्याच्या आवडीचा खेळ खेळावा, असा विचार होऊ लागला आहे. भारताचे यावेळचे पथक सुमारे साडेसहाशे खेळाडूंचे होते. ही संख्या क्रिकेट, फुटबॉल, हॉकीसारख्या सांघिक खेळांतील खेळाडूंमुळे वाढते. तरीदेखील ही संख्या आश्वासक आहे. ४१ क्रीडाप्रकारांत सहभागी होताना १८ क्रीडाप्रकारांत भारताने पदके मिळवली.

सेलिंगसारखा खेळ जो कित्येकांना माहीतही नाही; पण त्या खेळातही पदके मिळवणाऱ्या गुणवत्ता असलेल्या खेळाडूंची कमी नाही. चीन आणि जपानची मक्तेदारीच असावी, असे अनेक खेळ आहेत. त्यामुळे अशा खेळांच्या प्रकारात यश मिळवणे हे ऑलिंपिकमध्ये पदक मिळवण्याइतके मोठे. पण ओजस देवताळे आणि आदिती स्वामी तिरंदाजीत जपान-कोरियाची मक्तेदारी मोडून काढतात, तेव्हा मूठभर मांस अधिक अंगावर चढते.

विश्वविख्यात नीरज चोप्रा हमखास यश मिळवतो; पण किशोर जेना हा खेळाडू रौप्यपदक जिंकतो आणि सोबत ऑलिंपिक पात्रताही मिळवतो. म्हणजेच भालाफेकीत बघताबघता दुसरी फळी निर्माण होत आहे. खेळातील कौशल्याची, गुणवत्तेची मशाल तेवत ठेवणे आणि पुढच्या पिढीकडे देणे आवश्यक असते. रिले शर्यतीत बॅटन जसे सुपूर्द करतात, तसेच हे.

आपल्याकडे ते व्यापक प्रमाणात घडेल, अशी आशा आशियाई स्पर्धांमध्ये मिळालेल्या यशाने जागवली आहे. पदकाची अपेक्षा असलेल्या खेळाडूंसाठी `टॉप्स` या सरकारच्या योजनेतून सर्व मिळून कोट्यवधी रुपये खर्च केले जातात. परदेशात सरावासाठी आणि आंतरराष्ट्रीय स्पर्धात सहभागी होण्यासाठी तेवढाच खर्च केला जातो.

नीरज चोप्राला पुढच्या पॅरिस ऑलिंपिकच्या पूर्वतयारीसाठी १४५ कोटी रुपये दिले जाणार आहेत हे एक उदाहरण. असे पाठबळ असल्याशिवाय चॅम्पियन खेळाडू तयार होत नाहीत. यशाच्या प्रगतीचा हा आलेख उंचावत असताना कौतुकाबरोबर तुलनात्मक विचार होणेही तेवढेच महत्त्वाचे आहे. चीनने २०१ सुवर्णांसह एकूण ३८३ पदके मिळवली.

जपानने एकूण १६६ तर दक्षिण कोरियाने १९०. आपण १०७ पदकांचे कौतुक करताना अव्वल तीन देश आणि आपण यातील हा मोठा फरकही लक्षात घ्यायला हवा. अर्थात आशावादी राहायलाच हवे. यशाचा कळस गाठण्यासाठी सुरुवातीला पार केलेली एकेक पायरीही आत्मविश्वासाला बळ देणारी असते.

आपल्याला मिळालेल्या पदकांचा विचार केला तर रौप्य आणि ब्राँझ यांच्यापेक्षा सुवर्णपदके कमी आहेत. शेवटी सुवर्ण जिंकतो तो त्या खेळातला ‘नंबर वन’ खेळाडू असतो. म्हणूनच पदकांची शंभरी पार झाल्यानंतर आता सुवर्णपदकांचे शतक गाठण्याचे उद्दिष्ट ठेवायला हवे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com