अग्रलेख : घरबसल्या कमवा आणि गमवा...!

घरबसल्या गुंतवणूक दुप्पट ते हातात नोकरीचे पत्र, यांसारख्या आमिषांना रोखण्यासाठी सरकारने शंभर पेक्षा जास्त साइटवर बंदी घातली आहे. पण सजगता, दक्षता महत्त्वाची आहेच!
Cyber Crime
Cyber Crimesakal

घरबसल्या गुंतवणूक दुप्पट ते हातात नोकरीचे पत्र, यांसारख्या आमिषांना रोखण्यासाठी सरकारने शंभर पेक्षा जास्त साइटवर बंदी घातली आहे. पण सजगता, दक्षता महत्त्वाची आहेच!

घरबसल्या काय करावे? या विचारात व्यग्र असतानाच मोबाईलच्या चिमुकल्या पडद्यावर संदेश उमटतो : ‘दररोज पंधरा हजारांपर्यंत कमवा’ किंवा ‘घरबसल्या कमाईची गॅरंटी’ किंवा ‘सुरक्षित गुंतवणूक करा’ वगैरे. सोबत एखादी लिंक असते. कुतुहलापोटी ती लिंक क्लिक केली की, तिथून एका दुष्टचक्राची सुरुवात होते.

परदेशात बसलेली कुणी व्यक्ती सज्जनतेच्या मधात बुडवलेल्या आवाजात तुमची माहिती विचारते. छोटीशी गुंतवणूक करायला लावते. त्याचा परतावाही लागलीच मिळतो. घरबसल्या घडलेल्या या चमत्काराने मन सैलावते. कधीही न बघितलेली ती वेबसाइट किंवा संकेतस्थळ भरवशाचे वाटू लागते.

परतावा इमानदारीत करणाऱ्या या संकेतस्थळाचे परकेपण नष्ट होते. मग दुसरा टप्पा सुरू होतो. मोठी रक्कम गुंतवली जाते आणि ती गायबच होते. तेलही गेले, तूपही गेले! नोकरीपाण्याचेही असेच होते. नोकरी देणाऱ्या संकेतस्थळांकडून हळूच ‘अमूक इतकी रक्कम भरा’ असा लाडीक तगादा सुरू होतो. पैसे भरले की गायब! पुन्हा आपली बुद्धी गहाण पडते.

असे असंख्य प्रकार सध्या वाढीस लागले आहेत. यात श्रीमंत माणसे कधीच भरडली जात नाहीत. कारण त्यांना असल्या किरकोळ व्यवहारांची किंवा नोकरीची गरजच नसते. इथे नाडला जातो तो गरीब, गरजवंत आणि गरजवंताला अक्कल नसते, हे तर सर्वश्रुत आहेच.

छोट्यामोठ्या व्यवहारांमध्ये लोकांना गंडा घालणाऱ्या किंवा नोकऱ्यांची लालूच दाखवून फसवणाऱ्या शंभराहून अधिक वेबसाइटवर केंद्र सरकारने नुकताच बंदीहुकूम बजावला. इलेक्ट्रॉनिक आणि माहिती तंत्रज्ञान खात्यातर्फे ही कारवाई करण्यात आली. सायबर गुन्हेगारी रोखण्यासाठी अनेक प्रकारच्या सरकारी यंत्रणा कार्यरत असतात. इंटिग्रेटेड इन्फर्मेशन सेंटर ही अशीच एक यंत्रणा आहे.

सायबरगुन्हेगारीवर नजर ठेवून कार्यवाही करणे या यंत्रणेकडून अपेक्षित असते. या यंत्रणेच्या शिफारशींनुसारच शंभरेक संकेतस्थळांवर कुऱ्हाड कोसळली आहे. डिजिटलविश्वातील जाहिराती, चॅटिंग मेसेंजर्स, परदेशी एटीएम, बनावट खाती याद्वारे गंडा घालण्याचा आंतरराष्ट्रीय धंदा अहोरात्र चालत असतो.

या संकेतस्थळांचे चालक-मालक परदेशात कुठेतरी अज्ञात ठिकाणी बसून कारनामे करत असतात. त्यांची सर्वसाधारण कार्यपद्धती अशी : निवृत्त कर्मचारी, ज्येष्ठ नागरिक, गरजू बेरोजगार, अर्धशिक्षित किंवा अशिक्षित महिला यांना जाळ्यात ओढण्यासाठी ‘गुगल’ किंवा ‘मेटा’वर आकर्षक जाहिरात करायची. त्यायोगे आशाळभूतांना आपल्याकडे ओढायचे. व्हॉटसॲप किंवा टेलिग्रामसारख्या चॅटिंग मंचावरून संभाषण सुरू करायचे.

छोटी गुंतवणूक करायला भाग पाडायचे. अल्पावधीतच मोठी रक्कम हाताशी आली की दुकान बंद करायचे! या प्रकारे शेकडो लोकांना देशोधडीला लावण्याचे ‘पुण्यकर्म’ या सायबरचोरांकडून जमा केले जाते. जमताडा किंवा अन्य ठिकाणाहून बनावट फोन कॉल्स करून गंडा घालण्याचे प्रकार मध्यंतरी वाढीला लागले होते, पण त्याचे प्रमाण आता बरेच घटले आहे, असे केंद्र सरकारची आकडेवारी सांगते.

कारण मोबाईलमार्फत बँक खात्यांपर्यंत सहज पोचता येणार नाही, असे अनेक उपाय आता अमलात येऊ लागले आहेत. कुठलाही मोठा व्यवहार करताना ‘वन टाईम पासवर्ड’ तंत्राचा वापर करणे किंवा पहिलाच ऑनलाइन व्यवहार करण्यापूर्वी किमान चार-पाच तासांचा सुरक्षाकाळ ठेवणे, असे मार्ग अवलंबण्याचा सल्ला बँकांना दिला जातो. गेल्या वर्षभरात अशा प्रकारे तब्बल तीनशे कोटी रुपयांचे गंडे घातले गेल्याचे आकडेवारीवरून दिसते. यंदाच्या वर्षभरात साडेसहा हजार अशी प्रकरणे नोंदली गेली आहेत.

बसल्याजागी चार पैसे मिळावेत, असे एखाद्याला वाटले तर त्यात फारसे चूक काही नाही. हल्लीच्या काळात कार्यालयात किंवा कारखान्यात न जाताही एखादी नोकरी सहज करता येते किंवा उद्योगव्यवसायही सांभाळता येतो. शेअरबाजारातील व्यवहार तर कित्येक लोक घरबसल्याच करतात आणि त्यातून जमल्यास चार पैसे मिळवतातही. हा ऑनलाइनचा जमाना आहे.

घरबसल्या उद्योग सांभाळता येतो आणि नोकरी मिळवताही येते. त्यासाठी दरवेळी मुलाखतींसाठी रांग लावावी, असे काही नाही. तथापि, बेरोजगारांचे एवढे तांडे असलेल्या आपल्या देशात नोकरीचे आमिष दाखवण्याइतके सोपे काहीही नाही. डिजिटलयुगात हे प्रकार डिजिटल पद्धतीने होतात, जिथे व्यक्तीचा चेहरादेखील दिसत नाही, परिचय तर दूरच राहिला.

सुमारे दोन-तीन दशकांपर्यंत असलीच कृष्णकृत्ये दिवसाढवळ्या पार पाडली जात. ग्रामीण भागातील कित्येक गरीब शेतकऱ्यांना कर्ज किंवा अर्थसाह्याच्या नावाखाली गंडवले गेले आहे. संशयास्पद चिटफंड, भिशी, बोगस पतपेढ्या यांनी एकेकाळी धुमाकूळ घातला होता. यापैकी काही चिटफंड तर अमरवेलीसारखे फोफावून राष्ट्रीय पातळीवर गाजले आणि पुढे कोलमडलेही.

नोकऱ्यांच्या बाबतीतही गंडवागंडवीचा मामला होतच असे. विमानतळावरची नोकरी, कस्टम्स खात्यात किंवा पोलिस दलात भरती करण्याच्या आमिषाने पैसे गोळा केले जात. शिक्षकाची नोकरी मिळवून देण्यासाठीही वारेमाप पैसे उकळले गेल्याची प्रचंड मोठाली प्रकरणे आपल्या देशात गाजली.

या सर्व प्रकरणांमध्ये गुन्हेगाराला नावगाव होते, त्यापैकी अनेकजण तुरुंगात खडी फोडायला गेले. सायबरयुगात मात्र ही सोय नाही. कारण या विश्वातला गुन्हेगार नेहमीच अज्ञात राहातो. शंभर संकेतस्थळांवर बंदी घालून फारसे काहीही होणार नाही, हे उघड आहे. आपण सजगपणे, दक्षतेने व्यवहार करावेत, हा एकमेव मार्ग सध्या तरी उपलब्ध आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com