अग्रलेख : विषवल्लीची फळे

समाजात धार्मिक आणि जातीय स्तरावर एकदा तेढ माजली की विद्वेषाचे वातावरण कसे झपाट्याने फैलावत जाते, त्याची अनेक उदाहरणे गेल्या काही दिवसांत बघायला मिळत आहेत.
crpf
crpfsakal

समाजात दुराव्याची दरी निर्माण करणाऱ्यांवर कठोर स्वरूपाची कारवाई झालेली दिसून आलेली नाही.

समाजात धार्मिक आणि जातीय स्तरावर एकदा तेढ माजली की विद्वेषाचे वातावरण कसे झपाट्याने फैलावत जाते, त्याची अनेक उदाहरणे गेल्या काही दिवसांत बघायला मिळत आहेत. याच विद्वेषाच्या वातावरणात मग माथी भडकलेले लोक कोणत्याही थराला जाऊ शकतात. त्यातून हिंसाचार सुरू होतो आणि परिणामी निरपराध लोकांचा हकनाक बळी जातो.

राजधानी दिल्लीपासून हाकेच्या अंतरावर असलेल्या हरयाणातील नुह गावात सोमवारी जे काही घडले, ते समाजात अशा रीतीने पसरलेल्या विखारामुळे घडले आहे, असे ठामपणे म्हणता येते. विश्व हिंदू परिषद तसेच बजरंग दल यांनी संयुक्तपणे काढलेल्या मंडल जलाभिषेक यात्रेवर झालेली दगडफेक हे पुढे उद्‍भवलेल्या भयावह हिंसाचाराचे निमित्त असले तरी त्यामागील खरे कारण समाजात माजलेली ही जातीय आणि धार्मिक तेढ हे आहे.

या दगडफेकीनंतर संतप्त जमावाने किमान डझनभर गाड्या पेटवून देत सभोवतालच्या दुकानांची लूट करून, त्यांस आगीही लावून दिल्या. या जमावाच्या हातात शस्त्रे कशी आली, हा प्रश्नच आहे. यावेळी केलेल्या गोळीबारात गृहरक्षक दलाचे दोन जवान मृत्युमुखी पडले आहेत. शिवाय, अनेक पोलिस गंभीररीत्या जखमी झाले आहेत.

नुह हा मुस्लिमबहुल भाग आहे. त्यामुळे तेथे हिंदू संघटनांनी काढलेल्या अशा प्रकारच्या यात्रेमुळे तणाव निर्माण होण्याची शक्यता लक्षात घेऊन पोलिसांनी पुरेशी दक्षता घ्यायला हवी होती. हिंसाचाराचा उद्रेक झाल्यानंतरही तत्परतेने कृती झाली नाही, असे प्रत्यक्षदर्शी सांगतात. आता दोन दिवसांनंतरही ही आग विझलेली नाही. या हिंसाचाराचे लोण आता परिसरातील अन्य गावांतही पसरत चालले आहे.

मंगळवारी तर फरीदाबाद तसेच देशाच्या राजधानीला लागून असलेले गुरूग्राम आणि परिसरातही हिंसाचार उफाळून आला. या दंगलीत मशिद आणि मंदिर यांना हल्ल्याचे लक्ष्य करण्यात आले. या दोन दिवसांत आतापावेतो किमान अर्धा डझन निरपराधांना हकनाक प्राणास मुकावे लागले आहे. त्यामुळेच बुधवारी बजरंग दलाच्या अशा मिरवणुका तसेच मेळावे यांच्यावर दिल्ली परिसरात बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाली आहे.

खरे तर समाजात विद्वेष निर्माण करणाऱ्या आणि धार्मिक तसेच जातीय तेढ माजवणाऱ्या भाषणांचे प्रस्थ अलीकडल्या काळात झपाट्याने वाढत चालले आहे. सर्वोच्च न्यायालयाने त्याची वेळोवेळी दखल घेऊन, प्रशासनाला गंभीर इशारेही दिले आहेत. मात्र, त्यानंतर अशी वक्तव्ये करून समाजात दुराव्याची दरी निर्माण करणाऱ्यांवर कठोर स्वरूपाची कारवाई मात्र कुठे झालेली दिसून आलेली नाही.

या हिंसाचाराचे मूळ खुनाचे आरोप असूनही मोकाट फिरणारा बजरंग दलाचा प्रांत गोरक्षक मोनू मानोसर याच्या ‘मंडल जलाभिषेक यात्रे’त सहभाग असल्याचे सांगण्यात येते. त्यासंबंधीचे व्हिडिओ व्हायरल झाले आणि स्थानिक जनतेची माथी भडकली, असे प्रथमदर्शनी दिसत आहे. माथी भडकवून देण्यात आलेला हा जमाव इतका संतप्त झाला होता की, त्याने स्थानिक वैद्यकीय महाविद्यालय, बसस्थानक, तसेच सायबर क्राइम पोलिस ठाण्यांवरही हल्ला करून मोडतोड केली.

आता हरयाणाचे मुख्यमंत्री मनोहरलाल खट्टर कायदा आणि सुव्यवस्था राखण्यात आलेल्या अपयशामुळे जनतेचे लक्ष अन्यत्र वेधण्यासाठी ही हिंसक दंगल हा एका पूर्वनियोजित कटाचा भाग असल्याचे सांगू पाहत आहेत. मात्र, त्यामुळे त्यांना आपली जबाबदारी झटकून मोकळे होता येणार नाही.

हरयाणातील जलयात्रेनंतरची हिंसक दंगल ज्या दिवशी झाली, त्याच दिवशी जयपूर-मुंबई सुपरफास्ट एक्सप्रेसमध्ये सुरक्षा दलाच्याच एका जवानाने बेफाम गोळीबार करून चौघांना ठार केले. त्यामागचा हेतू, तो बोलतानाची सापडलेली ध्वनिचित्रफीत, त्याची मानसिक स्थिती या सगळ्याची सखोल चौकशी झाल्यानंतर त्यातून सत्य बाहेर येईलच.

पण समाजात विद्वेषाचे वातावरण तयार झाले, की कशा प्रकारचे उद्रेक घडू शकतात, याचे हे उदाहरण आहे हे नक्कीच. हल्लेखोराने वापरलेली भाषा (ज्याची ध्वनिचित्रफित व्हायरल झाली) त्याच्या मनातील विखाराचाच प्रत्यय देणारी आहे. समाजात मुळात धार्मिक तेढ असली की त्यातून उद्‍भवणारे दुष्परिणाम रोखता तर येत नाहीतच, परंतु दुर्घटनांचे दुष्टचक्र सुरू होते.

त्यांची साखळी साऱ्या सामाजिक स्थैर्यावरच आघात करणारी ठरू शकते. त्यामुळे मुळात अशा प्रकारे तेढ निर्माणच होऊ नये आणि आता उभी ठाकलेली दुराव्याची दरी अथक प्रयत्नांनी साधणे, ही जबाबदारी प्रामुख्याने राज्यकर्त्यांचीच आहे. केवळ न्यायालयीन इशाऱ्यांनी होण्याइतपत हे काम सोपे नाही.

मात्र, आपल्या देशात अलीकडल्या काळात निवडणुकांच्या राजकारणासाठी ध्रुवीकरणावरच भर दिला जात आहे आणि त्यामुळेच ही सामाजिक विद्वेषाची भावना जनतेच्या मनात निर्माण होत आहे. महाराष्ट्रासारख्या सुसंस्कृत म्हणवणाऱ्या राज्यातही अलीकडल्या काळात अशी काही वक्तव्ये झाली आहेत. वेळीच त्याबाबत काही उपाययोजना व्हायला हवी.

त्यामुळे सर्वपक्षीय राजकारण्यांनी ध्रुवीकरणाचा मार्ग सोडून, निवडणुकांच्या मैदानात जनतेचे प्रबोधन कसे करता येईल, याकडे कटाक्षाने लक्ष द्यायला हवे. अन्यथा, ही विषवल्ली अशीच फैलावत राहील आणि सर्वसामान्य निरपराध नागरिक तिचे बळी ठरतच राहतील.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com