अग्रलेख : एकजुटीतल्या सांदीफटी!

मोदी सरकारच्या विरोधात उभ्या राहिलेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील तिसऱ्या बैठकीनंतर त्यांच्या एकजुटीला काहीएक आकार-उकार येऊ लागल्याचे जे चित्र निर्माण होत आहे.
India Aghadi Meeting
India Aghadi MeetingSakal

सध्या दिसणाऱ्या विरोधकांच्या आशादायक एकजुटीतल्या सांदीफटी बुजवण्यात यश आले, तरच पुढली प्रकाशवाट दिसू लागेल.

मोदी सरकारच्या विरोधात उभ्या राहिलेल्या ‘इंडिया’ आघाडीच्या मुंबईतील तिसऱ्या बैठकीनंतर त्यांच्या एकजुटीला काहीएक आकार-उकार येऊ लागल्याचे जे चित्र निर्माण होत आहे, ते लोकशाहीच्या दृष्टीने आश्वासक म्हणता येईल.

मुंबईतल्या पश्चिमी उपनगरातील पंचतारांकित हॉटेलात दोन दिवस या आघाडीचे मंथन झाले. देशभरातील २८ घटकपक्षांचे ६३ हून अधिक नेते या निमित्ताने एकत्र आले. या खटाटोपातून विरोधी आघाडीचा माहौल उभा करण्यात तरी हे विरोधक यशस्वी झाले आहेत.

परंतु, मोदी सरकारला धक्का द्यायचा असेल तर तेवढे पुरेसे नाही. जोवर ‘इंडिया’ला निर्णायक आणि सर्वसमावेशी अजेंडा ठरवता येत नाही, तोवर या एकजुटीचा अर्थ फार मर्यादित घ्यावा लागेल. या आघाडीच्या यापूर्वी दोन बैठका अनुक्रमे पाटणा आणि बंगळूर येथे झाल्या.

एकमेकांमधले हेवेदावे आणि हाडवैर विसरुन काँग्रेससह काही विरोधी पक्ष एकत्र आले. ही विरोधकांच्या दृष्टीने निश्चितच जमेची बाजू आहे. परंतु महाराष्ट्रातील प्रकाश आंबेडकरांच्या ‘वंचित’ची अनुपस्थिती जाणवली. मुंबईतील बैठकीत १३ जणांची समन्वय समिती स्थापन करण्यात आली.

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार हे ज्येष्ठ नाव सोडले तर या समितीत विविध पक्षातील दुय्यम नेत्यांचीच नावे दिसतात. घटक पक्षांमध्ये ताळमेळ साधण्याचे काम या समितीने करणे अपेक्षित आहे. काँग्रेसचे के. सी. वेणुगोपाल, ठाकरे गटाचे संजय राऊत, ‘आप’चे राघव चढ्ढा, नॅशनल कॉन्फरन्सचे उमर अब्दुल्ला, पीडीपीच्या मेहबुबा मुफ्ती अशी बाकीची काही नावे या समितीत आहेत.

या आघाडीमध्ये ज्यांचे नेतृत्व खऱ्या अर्थाने पणाला लागणार आहे ते बिनीचे नेते मात्र समितीत नाहीत. याच बैठकीत आघाडीचे बोधचिन्ह ठरणार होते. पण काहींच्या आक्षेपामुळे ते लांबणीवर पडले. एकंदरीत दोन दिवसांच्या औपचारिक अथवा अनौपचारिक मंथनानंतर एक समन्वय समिती स्थापन करता आली आणि ‘जुडेगा भारत, जितेगा इंडिया’ असा नारा देत विरोधक देशभर एकत्रित मोहीम राबवितील,असा निर्णय घेण्यात आला. ठोस फलित म्हणावे असे एवढेच.

विरोधी नेत्यांमध्ये अनौपचारिक चर्चा, गप्पाष्टके आणि सुखसंवाद पार पडला असला तरी ऐनवेळी यापैकी कोण टिकते, आणि कोण रणांगण सोडते, हे आत्ताच सांगणे कठीण आहे. याचे प्रमुख कारण या विरोधी पक्षांमध्ये आजवर सुसंवाद नव्हता. तपास यंत्रणांच्या ससेमिऱ्याला घाबरुन जमा झालेली ही ‘घमंडिया’ आघाडी असल्याची टीका भारतीय जनता पक्षाचे नेते करतच असतात.

या टीकेत काही अर्थ नसल्याचे मतदारांना पटवून देण्याचे कठीण काम या आघाडीला पार पाडावे लागेल. मूळ मुद्दा ‘मोदीविरोध कशासाठी?’ या मूलभूत प्रश्नाचे उत्तर शोधण्याचा आहे. तपास यंत्रणांचा गैरवापर प्रच्छन्नपणाने होताना दिसतो आहे, हे कोणीच नाकारणार नाही, पण या गैरवापरामुळे विरोधी पक्ष घायाळ झाले, हीदेखील वस्तुस्थिती आहे.

परंतु, हा झाला या राजकीय पक्षांच्या अस्तित्वाचा संघर्ष. यामुळे सामान्य मतदाराला काय गमवावे लागत आहे, हे पटवून देण्यात त्यांची खरी कसोटी लागेल. तपास यंत्रणांमुळे राजकीय नेत्यांची झोप उडाली असली त्यामुळे सामान्यजनांची अवस्थाही तितकीच बिकट झाली आहे का, हे सर्वप्रथम तपासावे लागेल. एकीकडे रेवडीच्या राजकारणाची रेवडी उडवणारे केंद्र सरकार निवडणुका आल्या की, सवलतींच्या रेवड्याच उडवताना दिसते. याचा दंभस्फोट घडवता आला तर बरेच.

तीन बैठका पार पडूनही ‘इंडिया आघाडी’ला सर्वमान्य असा आपला समन्वयक ठरवता आला नाही, ही नोंद घेण्याजोगी बाब आहे. सत्ताधाऱ्यांकडे मोदी नावाचे चलनी नाणे असताना केवळ नीतिमूल्यांची भाषणे करुन भागण्यासारखे नाही. सर्वमान्य चेहरा मिळाला नाही तर त्याचा अर्थ ‘इंडिया’च्या घटक पक्षांमध्ये एकवाक्यताच नाही, असा काढला जाऊ शकतो.

थोडक्यात, भाजपच्या वतीने उपस्थित करण्यात येणाऱ्या प्रत्येक टीकेच्या मुद्द्याला चोख उत्तर देण्याची क्षमता विरोधकांच्या आघाडीला मिळवावी लागणार आहे. त्याहीपेक्षा महत्त्वाचे म्हणजे आपसातील मतभेद गुंडाळल्याचा कितीही आभास निर्माण करता आला तरी सत्ता दिसू लागली की चित्रही बदलू लागते.

हे आघाडीच्या राजकारणातले एक कोरडे सत्य आहे. आणीबाणीच्या विरोधात झालेली जनता पक्षाची स्थापना, त्यांनी मतपेटीतून घडविलेली क्रांती आणि आणि सत्ता मिळाल्यानंतर दोनच वर्षांत त्या पक्षाच्या उडालेल्या चिरफाळ्या हा इतिहास विसरता येण्याजोगा नाही. त्यामुळेच खरी गरज आहे, ती ऐक्याची विश्वासार्हता संपादन करण्याचा.

त्यासाठी पर्यायी कार्यक्रम तयार करून त्यावर नेत्यांनी भर द्यायला हवा. पत्रकार परिषदेत ‘इंडिया’चे नेते बोलत होते, तेव्हा टीकेसाठी का होईना सतत मोदीनामाचा उच्चार ऐकायला मिळत होता. मोदीवलयाला छेद द्यायचा असेल तर विरोधकांना अशा कल्पना, असा विचार आणि असा कार्यक्रम जनतचेपुढे मांडावा लागेल, की लोकांचे लक्ष त्याकडे वेधले जाईल. त्यादृष्टीने या आघाडीच्या पुढल्या आणि चौथ्या बैठकीत काहीतरी ठोस हाती लागण्याची गरज आहे.

नुसत्याच गप्पा, फोटोसेशन आणि जेवणावळींनी रणनीती ठरत नसते. निवडणुकीच्या रणांगणावरले वास्तव यापेक्षा खूप वेगळे आणि प्रखर असते, हे ध्यानात ठेवलेले बरे. सध्या दिसणाऱ्या विरोधकांच्या आशादायक एकजुटीतल्या सांदीफटी बुजवण्यात यश आले, तरच पुढली प्रकाशवाट दिसू लागेल.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com