अग्रलेख : राज्याची राजकीय जत्रा!

शिवसेनेच्या साडेपाच दशकांच्या वाटचालीत यंदा प्रथमच वर्धापनदिनाचे दोन मेळावे होणार, हे गतवर्षी दोन ‘दसरा मेळावे’ झाले, तेव्हाच स्पष्ट झाले होते!
eknath shinde and uddhav thackeray
eknath shinde and uddhav thackeraysakal

शिवसेनेच्या सात-बारा उताऱ्यावर नेमके कोणाचे नाव आहे, त्याचा फैसला अखेर मुंबईची जनताच करणार आहे, हे निश्चित. पण तोपर्यंत राजकीय कलगीतुरा कशासाठी?

शिवसेनेच्या साडेपाच दशकांच्या वाटचालीत यंदा प्रथमच वर्धापनदिनाचे दोन मेळावे होणार, हे गतवर्षी दोन ‘दसरा मेळावे’ झाले, तेव्हाच स्पष्ट झाले होते! शिवसेनेच्या इतिहासात या दोन्ही मेळाव्यांचे स्थान मोठे आहे; कारण या मेळाव्यातूनच संघटनेच्या वाटचालीची पुढील दिशा शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे स्पष्ट करत आणि त्यांच्यानंतर उद्धव ठाकरे यांनीही हीच परंपरा कायम ठेवली होती.

मात्र, यंदाच्या या दोन वर्धापनदिन सोहळ्यांकडे सर्वांचेच लक्ष लागलेले असताना, नेमका तोच मुहूर्त साधून भारतीय जनता पक्षाचे नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीही कल्याणात आपला ‘शो’ लावला आणि या मेळाव्यांना तिसरी किनार प्राप्त झाली! त्यामुळे खऱ्या अर्थाने ‘धर्मसंकट’ ओढवले ते टीव्हीचा छोटा पडदा या दोन्ही मेळाव्यांनी व्यापून टाकणाऱ्या वृत्तवाहिन्यांवर. तो अवकाश मग तीन मेळाव्यात विभागला गेला.

मात्र, फडणवीस हे चलाख राजकारणी असल्याने ते मैदानात उतरले होते ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे वकीलपत्र घेऊन. त्यामुळे शिंदे यांचे भाषण सुरू होण्यापूर्वीच त्यांनी आपले भाषण आवरतेही घेतले. मात्र, या तिन्ही मेळाव्यांचा सूर एकच होता आणि तो अर्थातच चिखलफेक आणि एकमेकांची उणीदुणी काढणे, यापुरताच मर्यादित होता.

शिंदे यांनी भाषणाचा बराच वेळ त्यांच्या सरकारने गेल्या वर्षभरात केलेल्या विकासकामांच्या आढाव्यात घालवला खरा; पण तेथील त्यांच्या समर्थकांना रस होता तो फक्त ते उद्धव यांच्यावर उगारत असलेल्या आसूडात! फडणवीस यांनीही नरेंद्र मोदी सरकारच्या नऊ वर्षपूर्तीच्या निमित्ताने आयोजित केलेल्या मेळाव्यात थेट उद्धव ठाकरे यांच्याच गेल्या वर्षभरातील ‘सुपरिचित’ भाषेचा वापर करत, त्यांच्यावर तिखट शब्दांत प्रहार करण्यातच समाधान मानले.

बाकी उद्धव असोत की शिंदे यांचे हे मेळावे म्हणजे ‘महाराष्ट्राची राजकीय जत्रा’च होती! उद्धव ठाकरे यांच्या भाषणापूर्वी त्याच व्यासपीठावर ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ हा कार्यक्रम पार पडला होता. मात्र, पुढे या दोन्ही मेळाव्यांना ‘करूण’ जत्रेचे स्वरूप प्राप्त झाले; कारण गद्दारी आणि कुणी कुणाच्या पाठीत खंजीर खुपसला, तीच गेल्या वर्षभरात घासून गुळगुळीत झालेली रेकॉर्ड फडणवीस यांच्यासह शिंदे तसेच उद्धव यांनी कितव्यांदा तरी वाजवली.

बाकी वाढदिवसाचे दोन्ही मेळावे म्हणजे आगामी निवडणुकांची नांदीच गाणारे होते. मात्र, त्यांतही एकच राग आळवला गेला आणि तो होता शिवसेनेच्या सातबारा उताऱ्यावर आपलेच नाव कसे आहे हे सांगणारा. शिवाय, बाळासाहेब ठाकरे यांच्या वारसाहक्काचीही ही लढाई होती. गेले वर्षभर म्हणजे शिवसेनेत मोठी फूट पाडून उद्धव ठाकरे यांना ‘वर्षा’वरून थेट ‘मातोश्री’वर पाठवण्यात यश आल्यापासून शिंदे असोत की फडणवीस; दोघेही हीच टेप वाजवत आहेत. त्यामुळे मग या दोन्ही मेळाव्यांना जमलेल्या ‘सैनिकां’च्या हाती नवे असे ‘विचारधन’ काहीच लागले नाही.

मात्र, फडणवीस यांचा सूर गेल्या दोन-चार दिवसांत भलताच आक्रमक कसा झाला आहे, त्याचे प्रत्यंतर त्यांच्या कल्याणातील सभेतून आले. शिंदे यांनी हाच मुहूर्त साधून मुंबई महापालिकेतील अनियिमततेची चौकशी करण्याच्या दिलेल्या आदेशाच्या पार्श्वभूमीवर फडणवीस यांनी साडेबारा हजार कोटी ‘मातोश्री’वरून परत आणण्याची भाषा केली. शिंदे यांचे ‘सादरीकरण’ हे उद्धव ठाकरे यांच्या तुलनेत भलतेच उठावदार होते.

यापूर्वीच्या दसरा मेळाव्यात त्यांनी वाचून दाखवलेले भाषण हे कंटाळवाणे आणि ‘सैनिकां’चा रसभंग करणारे होते. आता वर्षभर मुख्यमंत्रीपदाची खुर्ची सांभाळल्यामुळे आणि निवडणूक आयोग तसेच सर्वोच्च न्यायालयाने ती वाचवल्याने त्यांचा आत्मविश्वास वाढल्याचे दिसले. बाळासाहेबांची आठवण करून देत त्यांनी ‘सैनिकां’ना दंडवत तर घातलेच; शिवाय काही आठवणी सांगताना त्यांच्या डोळ्यात पाणीही आले.

हे सारे त्यांच्या समर्थकांना भारावून टाकणारे होते. त्या तुलनेत उद्धव ठाकरे यांच्या २० मिनिटांच्या भाषणात तोचतोचपणा होता आणि ‘आपल्याला शत्रूला कायमचे संपवायचे आहे,’ हाच नेहमीचा बाज होता. त्यामुळे जत्रा भरल्या खऱ्या; पण त्यात गेल्या साडेपाच दशकांत जी मौज आणि चैतन्य असे, ते मात्र बिलकूलच नव्हते. एक मात्र खरे. आता शिवसेनेच्या या दोन्ही गटांना आपापल्या आघाडीत जागावाटपाच्या वेळी जोरदार रस्सीखेच करावी लागणार आहे.

उद्धव गटाच्या मनीषा कायंदे शिंदे गटात गेल्यामुळे विधान परिषदेत उद्धव ठाकरे गटाकडे असलेले विरोधी पक्षनेतेपदही धोक्यात आले असून, त्यावर राष्ट्रवादी कॉंग्रेस दावा करू पाहत आहे. शिवाय, शिशिर शिंदे या एकेकाळच्या धडाडीच्या नेत्यानेही उद्धव यांना अखेरचा ‘जय महाराष्ट्र!’ केला आहे. असे काही छोटे मोठे धक्के उद्धव ठाकरे गटाला निवडणुकीपर्यंत बसत राहतील.

मात्र, प्रश्न असा आहे की शिंदे-फडणवीस यांना एवढा आत्मविश्वास असेल तर ते किमान मुंबई महापालिकेची निवडणूक का घेत नाहीत? शिवसेनेच्या सात-बारा उताऱ्यावर नेमके कोणाचे नाव आहे, त्याचा फैसला अखेर मुंबईची जनताच करणार आहे, हे निश्चित. तोपावेतो ही अशी भाषणे म्हणजे ‘शब्द बापुडे केवळ वारा...’ हे तर शिवसैनिकांनाही चांगलेच ठाऊक आहे.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com