अग्रलेख : आघाडीचे पुढचे पाऊल

लोकसभा निवडणुकीच्या संग्रामात दुसऱ्या क्रमांकाच्या म्हणजे ४८ जागा असलेल्या महाराष्ट्राचे महत्त्व विशेष आहे.
Mahavikas Aghadi
Mahavikas Aghadisakal

‘इंडिया’ आघाडीतील पक्ष इतर राज्यांत परस्परांच्या विरोधात लढताना दिसत आहेत. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रातील ‘मविआ’चे जागावाटप मार्गी लागणे ही बाब महत्त्वाची आहे.

लोकसभा निवडणुकीच्या संग्रामात दुसऱ्या क्रमांकाच्या म्हणजे ४८ जागा असलेल्या महाराष्ट्राचे महत्त्व विशेष आहे. उत्तरेकडे भक्कम पकड जमविलेल्या भारतीय जनता पक्षाला महाराष्ट्राचा ‘पेपर’ मात्र सोपा वाटत नाही, असे दिसते. या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडीने जागावाटप जाहीर करणे ही गोष्ट महत्त्वाची आहे. काही जागांवरील उमेदवार जाहीर व्हायचे बाकी असले तरी आघाडीने एक पाऊल पुढे टाकले आहे.

सांगली, दक्षिण- मध्य मुंबई, भिवंडीसह काही जागांवरून आघाडीअंतर्गत धुसफुस सुरू असली तरी सगळ्याच प्रश्नांवर तोडगा काढत न बसता पुढे जाण्याचा निर्णय आघाडीच्या नेत्यांनी घेतल्याचे दिसून येते. त्याचमुळे आघाडीचे शिल्पकार,ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी, आमच्यात मतभिन्नता नसल्याचे आणि एकजुटीने निवडणुकीला सामोरे जाण्यास सज्ज असल्याचे सांगितले.

महाराष्ट्राच्या राजकारणात एका वेगळ्या पार्श्वभूमीवर महाविकास आघाडी आकाराला आली होती आणि त्याची मोठी किंमत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोन पक्षांना मोजावी लागली. त्यानंतरही तिन्ही पक्ष एकत्र राहिले आहेत. केंद्रीय पातळीवर विरोधी पक्षांची ‘इंडिया’ आघाडी आकाराला आल्यानंतर या आघाडीतील पक्ष देशाच्या विविध भागांमध्ये परस्परांच्या विरोधात लढताना दिसताहेत.

मात्र, मतभेद असतानाही महाविकास आघाडीतील तिन्ही पक्ष एकत्र लढत आहेत, हे उल्लेखनीय. एका पक्षाने संपूर्ण जागा लढवायच्या ठरवल्या तरीसुद्धा अनेक जागांवर मतभेद असू शकतात. इथे तर चार वर्षांपूर्वीपर्यंत विरोधात असलेले पक्ष एकत्र आले आहेत. त्यामुळे मतभेद स्वाभाविक आहेत.

सांगलीच्या जागेवरून दोन्ही बाजूंकडून खूप ताणण्याचा प्रयत्न झाला आणि त्याचा ताण आघाडीवर आल्याचे चित्र निर्माण झाले. परंतु काँग्रेसने नमते घेऊन शिवसेनेला पुढे चाल दिली आणि संघर्ष टाळण्याचा प्रयत्न केला. स्थानिक पातळीवर त्याची किंमत चुकवावी लागणार आहे, याची कल्पना असूनही काँग्रेसने ही तडजोड स्वीकारली.

लोकसभा निवडणुकीत शिवसेना २१, काँग्रेस १७ आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्ष १० जागा लढवणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे. काँग्रेस आघाडीतला एकमेव राष्ट्रीय पक्ष आहे. अशोक चव्हाणांसह चार-दोन नेते सोडून गेले असले तरी शिवसेना किंवा राष्ट्रवादी काँग्रेससारखी मोठी फूट काँग्रेसमध्ये पडलेली नाही. विधानसभेतील संख्याबळाचा विचार केला तर तिथेही काँग्रेसचे संख्याबळ दोन्ही पक्षांहून अधिक आहे.

असे असतानाही जागावाटपात शिवसेनेचे वर्चस्व दिसले. जागावाटपाचा फॉर्म्युला निश्चित होण्याच्या आधीच प्राथमिक चर्चेच्या आधारे शिवसेनेने परस्पर उमेदवार जाहीर करून टाकले, जे काँग्रेससाठी अडचणीचे ठरणार होते. काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांनी तक्रारीचा सूर लावला; परंतु त्याचा उपयोग झाला नसल्याचे अंतिम जागावाटपानंतर लक्षात येते. मोठ्या पक्षाने जो समजूतदारपणा दाखवायचा असतो तो काँग्रेसने इथे दाखवला.

त्याची कारणे देशाच्या राजकारणात शोधावी लागतात. भाजपपासून डावे, तृणमूल काँग्रेसपर्यंत अनेक पक्ष काँग्रेसची कोंडी करण्याचा प्रयत्न करीत आहेत. गांधी कुटुंबीय हे सगळ्यांचे लक्ष्य आहे. अशा स्थितीत काँग्रेसला राष्ट्रीय पातळीवर काही लढाऊ सहकाऱ्यांची आवश्यकता आहे आणि ती गरज उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेकडून पूर्ण केली जाऊ शकते.

त्याचमुळे शिवसेनेने दादागिरी करूनही काँग्रेसच्या राज्यातील नेत्यांनी ती गुमान सहन केली. काँग्रेसच्या सहनशीलतेचा शिवसेनेने गैरफायदा घेतला, असेही म्हटले जाऊ शकते. ज्या जागांवरून वाद होते, ते मागे टाकून महाविकास आघाडीने पुढे जाण्याचा निर्णय घेतला, एवढाच अर्थ त्यातून निघू शकतो. मात्र, समोर भारतीय जनता पक्ष आणि महायुती असताना त्यांच्याशी लढण्यासाठी पुरेशी मुत्सद्देगिरी आघाडीने दाखवलेली दिसत नाही.

एकीकडे महायुतीकडून प्रत्येक जागा जिंकण्यासाठी त्या त्या ठिकाणची परिस्थिती लक्षात घेऊन पक्ष आणि उमेदवार निश्चित करण्यात येत असताना महाविकास आघाडीत मात्र जास्तीत जास्त जागा पदरात पाडून घेण्याची ईर्षा दिसली. वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आघाडीला अखेरपर्यंत झुलवत ठेवले आणि अखेरच्या क्षणी वेगळी वाट धरली.

आंबेडकर यांचा आजवरचा प्रवास पाहता त्याचा अंदाज आघाडीच्या नेत्यांना होता, परंतु अन्य पक्षांना सोबत घेण्यासाठी जी लवचिकता आणि बेरजेचे राजकारण करण्याची आवश्यकता होती, ते इथे दिसत नाही. दिंडोरीसारख्या ठिकाणी डाव्या पक्षांना एखादी जागा सोडणे किंवा राजू शेट्टी यांच्यासारख्या लढाऊ नेत्याला सोबत घेणे यासाठी फारसा उत्साह दाखवला गेला नाही.

आंबेडकरी विचारसरणीच्या छोट्या-मोठ्या नेत्यांना सोबत घेण्यासाठीची रणनीतीही दिसली नाही. एकजुटीने लढताना आवश्यक असलेले ‘सोशल इंजिनिअरिंग’ करण्याची आघाडीला गरज वाटली नाही, ही बाब खटकतेच.

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com