esakal | या जगण्यावर... : सृजनाचा साक्षात्कार
sakal

बोलून बातमी शोधा

books

या जगण्यावर... : सृजनाचा साक्षात्कार

sakal_logo
By
डॉ. सतीश बागल

काही वर्षांपूर्वी मला एका स्थानिक संस्थेकडून भाषणाचे आमंत्रण आले होते. विषय होता ‘सृजनाचा साक्षात्कार’. साहित्य, कला, सिनेमा इत्यादी क्षेत्रात नवनवीन क्षितिजे धुंडाळणारी सृजनशील निर्मिती कशी होते, हा विषय होता. अनेक उदाहरणे देऊन मी भाषण दिले. नंतरचा प्रश्न हा होता की, सृजनाचा साक्षात्कार काव्य, साहित्य, ललित लेखन, सिनेमा, नाटक अशा प्रकारातूनच का यावा? असा साक्षात्कार सामान्य माणसालाही का होऊ नये?

हेही वाचा: भ्रष्टाचाराच्या आरोपांवर 'राम मंदिर ट्रस्ट'ची पहिली प्रतिक्रिया!

वास्तविक पाहता, सृजनशीलता जगण्याची प्रमुख प्रेरणा आहे. माणसाची जगण्याची तीव्र इच्छा, जीवनावरचे प्रेम, भविष्याबद्दलची उज्ज्वल दृष्टी यातूनच निसर्गाशी झगडून पुढे जाण्याची प्रेरणा आणि शक्ती माणसाला मिळते. जगण्यासाठीच माणूस विविध प्रयोग करतो, नवनवीन वाटा अनुभवू पाहतो. ही सृजनशीलताच मानवी उत्क्रांतीची गंगोत्री आहे. सृजनशीलता मोठ्या कलाकारांप्रमाणेच सामान्य माणसालाही अनुभवता येते. सृजनाची, सौंदर्याची, नावीन्याची ओढ सामान्य माणसाच्याही जगण्याच्या केंद्रभागी असते; माणसाच्या अस्तित्वाचे ते मर्मच आहे म्हणा ना! सृजन या शब्दाचा अर्थच मुळी मनात खोलवर वाहणारा खळाळता, सुंदर आणि शाश्वत झरा! हा झराच आपल्याला जीवनातील सौंदर्याची अनुभूती देतो, जीवनाला अर्थ देतो, रोजच्या जगण्यात नावीन्याचे रंग भरतो.

हेही वाचा: केंद्रीय मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार; ज्योतिरादित्य, सोनेवाल यांना संधी?

रोजच्या जीवनात आपण ज्या अनेक छोट्या छोट्या गोष्टी नियमितपणे वा उत्स्फूर्तपणे करतो त्या सर्वांमध्ये सौंदर्य, नाविन्य आणि वेगळेपण अनुभवता येते. एखादी साहित्यकृती, नाट्यकृती (वा सिनेमा) भावणे आणि काही काळ मन विशाल होणे, जाणिवांच्या कक्षा रुंदावणे यात सृजनाचा अनुभव आहेच! मात्र साध्या साध्या गोष्टी जसे कपड्यांच्या उत्तम घड्या घालणे, चांगली इस्त्री करणे, बेडवर सिमेट्रिकली चादर टाकणे, यातही सृजनशीलता आणि सौंदर्यदृष्टी दिसून येते.

हेही वाचा: नक्षलवाद्यांनो मुख्य प्रवाहात सामिल व्हा; संभाजीराजेंचं आवाहन

उत्तम रुचकर स्वयंपाक करणे ही मोठी कला आहेच; परंतु डिशमध्ये ती सुंदरपणे मांडणे यातदेखील कला सामावलेली आहे. पोहे डिशमध्ये नीट सर्व्ह करणे, त्यावर पांढरे शुभ्र खोबरे, हिरवी कोथिंबीर आणि लिंबाची पिवळी धमक फोड यांची सुरेख सजावट असणे यातूनही सृजनाचा साक्षात्कार होत असतो.

हेही वाचा: कुंभमेळ्यातील बनावट कोरोना अहवालांच्या चौकशीचे आदेश!

मुलांना शिकवत असताना अनेक उदाहरणे देऊन, थोडे नाट्य वापरून उत्तम शिकवता येते. शिकवण्यातून ही मुले जीवनाला यशस्वीपणे सामोरे जातील, या आनंददायी विचारातूनही सृजनाच्या ऊर्जेचा अनुभव येतो. जीवनातल्या प्रत्येक क्षणी सृजनाचा स्पर्श होऊ लागला की, समजावे आपले आतले सूर चांगले जुळू लागले आहेत. प्रत्येक क्षणाला सृजनाचा अनुभव घेणे शक्य आहे का? थोडे अवघड भासले तरीही हे अशक्य निश्‍चित नाही. जाणीवपूर्वक प्रयत्न केला तर साध्या साध्या गोष्टीतही सृजनाचा अनुभव येतो. मात्र त्यासाठी हाती घेतलेल्या कामावर प्रेम करायला, त्याच्याशी मैत्री करायला शिकले पाहिजे. हाती घेतलेल्या कामावर जितके प्रेम करू तितके ते अधिक सुंदर भासेल आणि ते करण्याचे अनेक पर्याय आपसूकच समोर येतील. दुसरे म्हणजे सृजनाचा अनुभव घेण्यासाठी कुठे लांब जावे लागत नाही. दैनंदिन जीवनातील रोजच्या अनेकानेक गोष्टींमध्ये, वस्तूंमध्येही सृजनाचा अनुभव येतो. छोट्या छोट्या गोष्टींमध्ये रस घेता येणे, आनंद घेणे यातच जीवनाचे सार्थक आहे. मुख्य म्हणजे सृजनाचा आनंद सध्याच्या, आत्ताच्या वर्तमानातील क्षणातूनच घेता येतो. मन भविष्याकडे धाव घेते आहे, किंवा ते भूतकाळात, जुन्या आठवणीत अडकले आहे, असे होऊ नये.

हेही वाचा: राज्यात १५ जूनपासूनच शाळा होणार सुरु

आत्ताचा हा निसटता क्षणच सृजनाचा अनुभव देणारा क्षण आहे. जगण्यातील सारे सौंदर्य आणि काव्य या क्षणामध्येच सामावले आहे. हा क्षण वाया का घालवायचा? या क्षणातच सृजनशील होऊया, सौंदर्याचा ध्यास घेऊया!

loading image