esakal | या जगण्यावर...आपुलाची संवाद आपणासी
sakal

बोलून बातमी शोधा

Sant Tukaram Maharaj

या जगण्यावर...आपुलाची संवाद आपणासी

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

-- प्रा. दिलीप धोंडगे

वृक्षवल्ली आम्हां सोयरीं वनचरें... या चरणाने सुरु होणारा तुकोबांचा एक अभंग प्रसिद्ध आहे. माणसाने समाजनामक संस्था आपल्या समान हितसंबंधांसाठी उभी केली; पण स्पर्धा, ईर्षा आदी प्रकारांमुळे समान हितसंबंधांना बाधा पोचते व माणसाला त्रस्ततेचा अनुभव येतो. पण एखादी व्यक्ती समाजात राहून या सगळयांपासून लांब राहिली, तरीदेखील समाज त्याला त्यात खेचल्याशिवाय राहात नाही. चांगल्याला वाईट म्हणणे व वाईटाला चांगले म्हणणे हे सहजपणे करणे काही जणांचा खेळ असतो. हे ज्याच्याबाबत विनाकारण घडते, त्याला मनःस्ताप होतो. संतसज्जनांच्या वाट्याला असे विपरीत अनुभवाला येते. ‘लोक जैसा ओक धरिता धरवेना’ असे तुकोबांनी म्हटलेले आहे, ती लोकांच्या विपरीत वर्तनावरचीच प्रतिक्रिया.

प्रस्तुत अभंगात तुकोबा एका प्रतिजगताचा अनुभव कथन करतात. लौकिक जगतात आपले इष्टमित्र, गणगोतादी असतात. पण या प्रतिजगतातील सोयरेधायरे निराळे आहेत. वृक्ष, वेली, सुस्वरात आळवणारे पक्षी हे आप्तेष्ट आहेत. त्यामुळे आमचा प्रतिजगतातील एकांतवास हा फारच सुखाचा झाला आहे. लोकांतवास अर्थातच तेवढा सुखाचा होत नाही. याची कारणे अनेक सांगता येतील. एकांतवास सुखाचा का झाला, याचे तुकोबाकृत कारण पाहिले तर लोकांतवास सुखाचा का होत नाही याचे व्यत्यासी कारण कळायला मदत होते.

हेही वाचा: मुंबई: उद्या पाणी उकळून आणि गाळूनच प्या, कारण...

एकां तवास सुखाचा का तर ‘नाही गुणदोष अंगा येत.’ लोकांतवासाचे महत्तम लक्षण म्हणजे गुणदोष अंगाशी येणे. एकांतवासाचे लक्षण अर्थातच गुणदोष अंगाशी न येणे. संतांचे वैशिष्ट्य म्हणजे ‘तुल्यनिंदास्तुतिर्मौनीसंतुष्टो येन केनचित’ म्हणजे निंदा व स्तुति समान मानणारे, मननशील आणि जे मिळेल त्याने संतुष्ट राहाणारे. परिणामतः दोषांचे तर सोडाच; पण गुणदेखील अंगाला आलेले त्यांना कसे आवडणार? आकाशाच्या मांडवाखाली व पृथ्वीवर जेथे आमचे मन रममाण होईल तेथे आम्ही क्रीडा करु, असे तुकोबांनी पुढे म्हटले आहे. आकाश व पृथ्वी यांच्यातील पोकळीला अवकाश म्हणतात. अशा विस्तीर्ण अवकाशात वास्तव्य करायचे. यामुळे मनाला अवगाहन करायला मोठा अवकाश लाभतो व त्या क्रीडेला भव्यतेचे परिमाण लाभते. हेव्यादाव्याच्या कुजकट गोष्टींत अडकून दोष लावून घेण्यापेक्षा आत्मिक उन्नयनाला अवसर जेथे मिळतो तेथे रमायचे.

मानवी गरजा वाढवाव्यात तेवढ्या वाढतात. कमी कराव्यात तेवढ्या कमी करता येऊ शकतात. यंत्रयुग आणि इलेक्ट्रॉनिक्स युग यांमुळे वस्तूंचा उपयुक्ततेच्या पलिकडे सोस वाढला आहे. हा सोस स्पर्धा निर्माण करतो ही स्पर्धा निकोप नसते परिणामी दुःखद ठरते. वस्तूंचा सोस शारीरिक व बौद्धिक क्षमतांना अवरुध्द करणारा ठरतो, हे सूक्ष्म विचार करता सहजपणे लक्षात येते. तुकोबा हे परमेश्वराच्या भक्तीत रमलेले भक्त होते. ‘एथ भजनचि प्रमाण | काय थोरपण जाळावे ते’ या प्रमेयाला अनुसरणारे होते. यामुळे अनेक प्रकारांनी परमेश्वराच्या भजनरुपी भोजनाची रुची चाखण्यासाठी त्यांना एकांतातील प्रतिजगतामध्ये मोठा वाव होता. कशातच न सामावणारा आनंद होता. एकच गोष्ट नाना प्रकारांनी अनुभवण्यात सर्जनशीलतेचा अनुभव येतो.

हेही वाचा: नवज्योतसिंग सिद्धू यांची पंजाब काँग्रेसच्या अध्यक्षपदी नियुक्ती

‘हरिकथा भोजन परवडी विस्तार | करोनि प्रकार सेवूं रुची’ असे तुकोबांनी म्हणण्याचा इत्यर्थ हाच होय. या प्रतिजगतातील एकांतवासात आपल्याच मनाशी आपल्याला संवाद करता येतो. लौकिक जगतात व्यावहारिक दृष्टीने एकाचा दुस-याशी संवाद होतो. पण प्रतिजगतातील एकांतात मनःसंवाद होतो. श्रीमद्भगवद्गीतेतील उपरोल्लेखित श्लोकातील ‘मौनी’ हा शब्द मननशीलता स्पष्ट करणारा आहे. लौकिक जगतात जगणा-याने कायमच्या व्यावहारिक संवादाला काही प्रमाणात आपणच आपणाशी संवाद करण्याची म्हणजे मननाची जोड दिल्यास सर्जनाची अनोखी अनुभूती घेता येऊ शकते.

हेही वाचा: ....त्यासाठी भाजपला राज्यातून हद्दपार करावं लागेल - पृथ्वीराज चव्हाण

loading image