सर्च-रिसर्च : आयुष्य म्हणजे रंगसूत्रांचा खेळ

प्रा. शहाजी बा. मोरे
Thursday, 16 April 2020

पुरुषांपेक्षा स्त्रिया दीर्घायुषी असतात, असा सार्वत्रिक समज आहे. भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार जी लोकसंख्या आहे, त्यात साठ वर्षांवरील लोकांमध्ये दहा लाख महिला पुरुषांपेक्षा अधिक आहेत. शास्त्रज्ञ व सर्वचजण यामागे पुरुष जोखीम घेतात, व्यसनाधीन असतात ही कारणे सांगतात. त्यात तथ्य आहे; परंतु त्याला अपवादही भरपूर आहेत.

पुरुषांपेक्षा स्त्रिया दीर्घायुषी असतात, असा सार्वत्रिक समज आहे. भारताच्या २०११ च्या जनगणनेनुसार जी लोकसंख्या आहे, त्यात साठ वर्षांवरील लोकांमध्ये दहा लाख महिला पुरुषांपेक्षा अधिक आहेत. शास्त्रज्ञ व सर्वचजण यामागे पुरुष जोखीम घेतात, व्यसनाधीन असतात ही कारणे सांगतात. त्यात तथ्य आहे; परंतु त्याला अपवादही भरपूर आहेत.

ऑस्ट्रेलियात पीएच.डी. करणाऱ्या एका विद्यार्थिनीने दाखवून दिले आहे, की लैंगिकता (नर/ मादी) व आयुष्याची लांबी हा सारा रंगसूत्रांचा खेळ आहे. प्रत्येक सजीव हा अनेक पेशींनी बनलेला असतो. प्रत्येक पेशींमध्ये एक केंद्रक असते व या केंद्रकामध्ये रंगसूत्रे (क्रोमोझोम्स) असतात. मानवामध्ये रंगसूत्रांच्या २३ जोड्या असतात, त्यापैकी २२ जोड्या स्त्रिया व पुरुषांमध्ये सारख्या असतात. परंतु पुरुषांमधील तेविसाव्या जोडीतील एक रंगसूत्र वेगळे असते. सारख्या रंगसूत्रांच्या २२ जोड्या (म्हणजे जोडीतील दोन्ही रंगसूत्रे सारखी असतात व ती ‘एक्‍स-एक्‍स’ अशा इंग्रजी वर्णांनी दाखविली जातात, तर महिलांतील सर्व २३ जोड्या सारख्या ‘एक्‍स- एक्‍स’ अशा दाखविल्या जातात. पुरुषांमधील एक भिन्न जोडी ‘एक्‍स- वाय’ अशा इंग्रजी वर्णांनी दाखविली जाते; या २३ व्या जोडीवरून मानवजातींमध्ये लिंगनिश्‍चिती (म्हणजे ‘तो’ आहे की ‘ती’) होत असते. पुरुषांमध्ये ही तेविसावी जोडी वेगळी असते. तिच्यामध्ये एक ‘एक्‍स’ रंगसूत्र व एक ‘वाय’ रंगसूत्र असते. त्यातील ‘एक्‍स’ रंगसूत्रावर काही घातक जनुके असतात. वय वाढल्यानंतर त्यांचे दुष्परिणाम जाणवतात. या रंगसूत्रावरील घातक जनुकांपासून त्याच्या सोबतचे ‘वाय’ रंगसूत्र आपले रक्षण करू शकत नाही. ते काहीसे आखूड असते. त्यामुळे ‘एक्‍स’ रंगसूत्रास झाकूही शकत नाही. शिवाय ‘एक्‍स’ रंगसूत्रामध्ये उत्परिवर्तन (म्युटेशन) घडून आल्यास त्याची जागा घेण्यास दुसरे ‘एक्‍स’ रंगसूत्र असत नाही.

या उलट महिलांमध्ये २३ व्या जोडीत दोन्ही ‘एक्‍स’ रंगसूत्रे असतात व दोन्ही सारखीच असतात. एकामध्ये उत्परिवर्तन झाल्यास (त्याच्यात नको ते बदल झाल्यास) दुसरे ‘एक्‍स’ रंगसूत्र त्याची जागा घेते. यामुळेच महिलांचे आयुष्य पुरुषांच्या आयुष्यापेक्षा जास्त असते, असे प्रतिपादन करणारा शोधनिबंध नुकताच रॉयल सोसायटीच्या ‘बायॉलॉजी लेटर्स’ या शोधपत्रिकेत प्रसिद्ध झाला आहे. या सिद्धान्तास ‘अनगार्डेड एक्‍स क्रोमोझोम हायपोथिसिस’ म्हणतात. ऑस्ट्रेलियातील न्यू साऊथ वेल्स विद्यापीठातील पीएच. डी.च्या विद्यार्थिनी झो झिरोकोस्टास यांनी फक्त मानवातील रंगसूत्रे व आयुष्याचा अभ्यास केला असे नव्हे, तर प्राण्यांच्या विविध जाती, प्रजाती व त्यांचे आयुष्य आणि रंगसूत्र यातील संबंधावर संशोधन केले. यामध्ये सस्तन प्राणी, सरपटणारे प्राणी, उभयचर, जलचर, फुलपाखरे, पतंग, कीटक, पक्षी आदी प्राणीवर्गाचा समावेश होता.

चिरतरुण राहण्यासाठी...
अन्य जाती, प्रजातीमध्येसुद्धा आयुष्यकाल व रंगसूत्रांचा असाच संबंध असल्याचे झिरोकोस्टास नमूद करतात. शिवाय काही प्रजातींमध्ये उलटा प्रकार असल्याचेही त्यांना आढळून आले. त्यांच्या संशोधनानुसार पक्षी, फुलपाखरे, पतंग (मॉथ्स) इ. पुरुषजातींमध्ये लिंग निश्‍चित करणाऱ्या जोडीतील रंगसूत्रे समान असतात (अन्य प्राण्यांमधील समान रंगसूत्रांची जोडी ‘झेड- झेड’ या इंग्रजी वर्णानी दाखविली जाते;) तर मादीमध्ये या जोडीतील रंगसूत्रे भिन्न असतात. ती ‘झेड-डब्ल्यू’ या इंग्रजी वर्णांनी दर्शविली जातात. या प्राण्यांतील मादीवर्ग नरवर्गीय प्राण्यांपेक्षा लवकर निवर्ततात. म्हणजेच या प्राण्यांचा जीवनकाळही ‘अनगार्डेड एक्‍स क्रोमोझोम’ (या प्राण्यांमध्ये ‘झेड’) सिद्धान्तास पुष्टी देतो.

झिरोकोस्टास यांच्या संशोधनानुसार ज्या प्रजातींमध्ये पुरुषलिंग निश्‍चित करणारी रंगसूत्रे भिन्न असतील त्या प्रजातींमधील स्त्रीलिंगी प्राणी पुरुषलिंगी प्राण्यांपेक्षा २१ टक्‍क्‍यांनी अधिक आयुष्य जगतात. परंतु याउलट परिस्थिती असल्यास पुरुषलिंगी प्राणी सात टक्के अधिक आयुष्य जगतात. भविष्यात याविषयी संशोधन करणाऱ्या संशोधकांनी रंगसूत्रांची लांबी व आयुष्याची लांबी याविषयी संशोधन करावे, त्यायोगे अखेरीस वयोवृद्धी (एजिंग) प्रक्रियेवर संशोधन होईल, असे झिरोकोस्टास सुचवितात. असे संशोधन प्रत्यक्षात येईलच, त्याआधारे माणूस चिरतरुण राहण्यासाठी पाऊल टाकेल.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: article shahaji more on life