हवामानबदल : वन्यजीवांना वाचवावे कसे?

sundarban-forest-tiger
sundarban-forest-tiger

मागील लेखांकात आपण वन्यजीवांवरील हवामानबदलाचे परिणाम पाहिले. यातील अन्य काही माहिती आणि करता येण्याजोगे काही उपाय आता पाहू. 

ज्या प्रजाती एका विशिष्ट प्रकारच्या अधिवासांवर अवलंबून असतात किंवा तापमान आणि आर्द्रता यांच्या काही विशिष्ट आवाक्‍यावर (रेंज) ज्यांचे जीवनचक्र अवलंबून असते अशा; अथवा ज्यांचे जीवनचक्र सुरू होण्यासाठी काही विशिष्ट पर्यावरणिक उत्प्रेरक घटनांची आवश्‍यकता असते अशा; दोन प्रजातींमधील काही देवाणघेवाणीवर ज्यांचे जीवनचक्र अवलंबून असते अशा आणि दुर्मीळ म्हटल्या जाणाऱ्या प्रजातींना सर्वाधिक धोका असतो. पानगळीच्या प्रदेशातील नदीकाठच्या वनांमध्ये आढळणारी मोठी खार, हिमालयात विशिष्ट उंचीच्याच पट्ट्यात आढळणारा हिमबिबळ्या, तिथलेच त्याचेच भक्ष्य असणारा ब्लू शीप हा प्राणी किंवा निलगिरीत आढळणारी तहर ही बोकडाची जात ही अशा काही प्रजातींची उदाहरणे. सततच्या कमी होत जाणाऱ्या वृक्ष-रेषेमुळे आणि सूचिपर्णी वृक्षांच्या आक्रसत चाललेल्या प्रदेशामुळे हिमबिबळ्याचे अधिवास सुमारे तीस टक्‍क्‍यांनी कमी होण्याची शक्‍यता आहे. पुढील ५० ते ९० वर्षांमध्ये अंदाज केल्यानुसार समुद्राच्या पातळीत २८ सेंटिमीटर वाढ झाली, तर बांगलादेशाच्या सुंदरबन भागातले वाघांचे अधिवास ९६ टक्के इतके कमी होतील. अगदी अलीकडे झालेल्या संशोधनानुसार, अवकाळी हिमवर्षावामुळे हिमालयन काळ्या अस्वलाच्या वर्तणुकीत फरक पडला आहे. मुख्यत्वे त्यांची ऋतुनिद्रा (हायबरनेशन) कमी काळ झाल्याने ती आक्रमक होऊन मानवाबरोबर त्यांचे संघर्ष वाढले आहेत. बदलत्या पीकपद्धती आणि पर्जन्यमान, यामुळे सारस क्रौंच पक्ष्यांचा घरटी करण्याचा काळ बदलला जाऊन त्यानुसार त्यांचे जगणे आणखी अवघड झाले आहे. काझीरंगातले वार्षिक पूर आता पूर्वीसारखे पुनर्प्रस्थापनक्षम न राहिल्याने त्यामुळे होणाऱ्या प्राण्यांच्या मृत्युसंख्येत वाढ झाली आहे. समुद्राचे वाढते तापमान लक्षद्वीपच्या प्रवाळभिंती आणि अन्य समुद्री जीवन संपवत चालले आहे. जेव्हा आपण हवामानविषयक न्याय हा विषय बोलतो, तो फक्त मानवापुरता मर्यादित न ठेवता समग्र सृष्टीचा त्यात विचार झाला पाहिजे. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

संकटाच्या निराकरणाचे उपाय
३५० पीपीएम कार्बन-डायऑक्‍साइडपलीकडचा एकही आकडा मानवेतर प्रजाती, सृष्टिव्यवस्था यांसाठी विनाशकारी ठरतो, हे आता प्रमाणित सत्य आहे. आजमितीलाच त्याची पातळी ३९०  पीपीएम ओलांडते आहे. अधिकृत आंतरराष्ट्रीय परिषदेने त्याच्या निराकरणाचे काही उपाय सांगितले आहेत. दुर्दैव हे की आपण तेही करत नाही. संशोधन वगैरे लांबच. या उपायांचा आढावा :

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

१) सृष्टिव्यवस्था, अधिवास यादरम्यान असलेले विविध दुवे (जोडमार्ग, अंतरमार्ग, विश्रांतिस्थाने) बळकट करणे, ज्यायोगे हवामानबदलाला प्रतिसाद म्हणून विविध प्रजाती एका जागेवरून दुसरीकडे जे स्थलांतर करतात, ते सुलभ होईल. २) सृष्टिव्यवस्थांवरचे निदान इतर मानवी ताण कमी करणे. अशा ताणांचे आणि हवामानबदलामुळे येणारे ताण एकत्र होणे निःसंशय अधिक विनाशकारी ठरते. ३) अगदी एक चौरस किलोमीटर इतक्‍या छोट्या अंतरातले हवामानबदल तपासून त्यांची नोंद करणे. स्थानविशिष्ट उपाय काय असावेत, ते ठरवायला याची खूप मदत होते. ४) संपूर्ण मानवजातीने अग्रक्रमाने करण्याचा उपाय म्हणजे हरितगृह वायूंचे प्रमाण कमीत कामे ठेवणे. कारण, त्यामुळे होणारा बदल जितका जास्त, तितके त्याच्याशी जुळवून घेणे अवघड होत जाते. ५) विषुववृत्तीय जंगलांची तोड आज हवामानबदलामुळे नष्ट होणाऱ्या त्यांच्यातील जैवभारामुळे एकूण कार्बन उत्सर्जनाच्या वीस टक्के उत्सर्जनाला कारणीभूत आहे. ती जितकी कमी होईल, तितकी ती प्रजातींसाठी हितावह असेल. ६) सृष्टिव्यवस्थांचे पुनरुज्जीवन गरजेचे. त्यामुळे अधिक कार्बन संचयित होईल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com