सर्च रिसर्च : "कोरोना'च्या लढाईतील "जयचंद' 

सम्राट कदम 
Monday, 27 April 2020

 "कोविड-19'शी मानवाचेही युद्ध चालू आहे आणि या युद्धात "सार्स कोविड-19' या विषाणूशी हातमिळवणी करणाऱ्या "जयचंदा'चा म्हणजेच मानवी पेशींचा आणि त्यातील जनुकांचा शोध शास्त्रज्ञांनी घेतला आहे.

भारतीय इतिहासातील पराक्रमी राजा पृथ्वीराज चौहान आणि परदेशी आक्रमक मोहंमद घोरी यांच्यात सोळा वेळा युद्ध झाले. विशेष म्हणजे प्रत्येक वेळी पृथ्वीराजने घोरीला जीवदान दिले. परंतु कन्नोजचा राजा जयचंद याने वैयक्तिक सूड घेण्यासाठी घोरीशी हातमिळवणी करत पृथ्वीराज चौहानचा पराभव केला, हा इतिहास सर्वांना ज्ञात आहे. आता याचा जागतिक महामारी असलेल्या "कोविड-19'शी काय संबंध? असा प्रश्‍न तुम्हाला पडला असेल. इतिहासातील या प्रसिद्घ युद्धांप्रमाणे "कोविड-19'शी मानवाचेही युद्ध चालू आहे आणि या युद्धात "सार्स कोविड-19' या विषाणूशी हातमिळवणी करणाऱ्या "जयचंदा'चा म्हणजेच मानवी पेशींचा आणि त्यातील जनुकांचा शोध शास्त्रज्ञांनी घेतला आहे. 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

संशोधकांनी फुफ्फुसे, श्वसनमार्ग आणि आतड्यांमधील "कोविड-19'साठी संवेदनशील असलेल्या पेशींचा शोध शास्त्रज्ञांनी घेतला आहे. "रेगॉन इन्स्टिट्यूट ऑफ एमजीएच, एमआयटी ऍन्ड हार्वर्ड'ने यासंबंधी संशोधन केले असून, "सेल' या शोधपत्रिकेत ते प्रकाशित झाले आहे. "कोविड-19'साठी प्रतिबंधात्मक औषध शोधण्यासाठी या संशोधनाचा उपयोग होईल, असा विश्वास संशोधक व्यक्त करत आहेत. "सार्स कोविड -19' या विषाणूच्या काट्यावर प्रथिनांसोबत मानवी पेशीवरील अँजियोटेन्सीन कन्व्हर्टिंग एन्झाईम (एसीई-2) अभिक्रिया करते, इथपर्यंतची प्रक्रिया शास्त्रज्ञांनी उलगडली होती. परंतु "एसीई-2' आणि "इंटरफेरॉन' (मानवी पेशीत विषाणूंच्या प्रवेशावेळी तयार होणारे प्रथिन) यांच्यातील सहसंबंध अजून उलगडला नव्हता. आता नव्या संशोधनामुळे त्यांच्या सहसंबंधांवर प्रकाश पडला आहे आणि त्यातूनच या लढाईतील "जयचंद' कोण असावा, याचा अंदाज शास्त्रज्ञांनी बांधला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

लढणारा संसर्ग 
"इंटरफेरॉन' नावाचे हे प्रथिन पेशीमधील विषाणूच्या प्रवेशाला रोखण्याचा प्रयत्न करते. त्यासाठी प्रतिकार करणाऱ्या पेशींना ते जागृत करते आणि विषाणूचे पुनरुत्पादन थांबवते. त्याचबरोबर जनुकांच्या विशिष्ट समूहाला विषाणूविरुद्ध लढण्यासाठी हे प्रथिन प्रेरित करते. फुफ्फुसातील पेशींना "डॅमेज कंट्रोल'च्या विरोधात सहकार्य करण्याचे काम "एसीई-2' हे एन्झाईम करत असल्याचे आधीच्या संशोधनातून स्पष्ट झाले होते. परंतु पहिल्यांदाच "एसीई-2' आणि "इंटरफेरॉन' यांच्यातील सहसंबंध स्पष्ट झाला आहे. "कोविड-19' विषाणू आपल्या यजमान (होस्ट) पेशीच्या प्रतिकारशक्तीचा आणि त्याच्यातील प्रथिनांचा स्वतःच्या वाढीसाठी वापर करत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. म्हणजेच जयचंदने पृथ्वीराजविरुद्ध लढण्याचे तंत्र मोहंमद घोरीला दिल्यासारखा हा प्रकार आहे. केवळ "कोविड-19' नव्हे, तर इतरही विषाणू पेशींमध्ये प्रवेश मिळविण्यासाठी "इंटरफेरॉन'ने उत्तेजित केलेल्या जनुकांचा वापर करतानाचे पाहिले गेले आहे. विषाणूविरुद्ध लढणाऱ्या या "इंटरफेरॉन' प्रथिनांच्या परिणामांचे अनेक फायदेही मिळतात. हिपॅटायटस- बी आणि सी विरुद्ध लढतानाही याचा फायदा झाला होता. "कोविड-19' संदर्भात मात्र "इंटरफेरॉन'ची भूमिका अजूनही क्‍लिष्ट आणि संदिग्ध असल्याचे शास्त्रज्ञांचे मत आहे. म्हणजेच, एका बाजूला "कोविड-19'विरुद्ध दंड थोपटणाऱ्या जनुकांना तो प्रेरित करतो, तर दुसऱ्या बाजूला विषाणूला पेशींमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी अधिकची जागा आणि संधी उपलब्ध करून देतो. त्यामुळे "कोविड-19' विरुद्धच्या लढाईत "इंटरफेरॉन' या प्रथिनाच्या भूमिकेसंबंधी आत्ताच निष्कर्ष काढणे योग्य नसल्याचे शास्त्रज्ञ म्हणतात. अत्यंत काळजीपूर्वक "क्‍लिनिकल ट्रायल' घेतल्यानंतरच "इंटरफेरॉन' संदर्भातील स्पष्टता येईल, अशा शास्त्रज्ञांना विश्वास आहे. म्हणजेच "कोविड-19' विषाणूवरील औषध शोधण्यासाठी शास्त्रज्ञांना पेशीतील या "जयचंदा'वर लक्ष ठेवणे गरजेचे आहे. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: search research article corona

Tags
टॉपिकस
Topic Tags: