सर्च-रिसर्च :  झाडांवर विश्‍वातील महास्फोटांचे पुरावे?

सम्राट कदम
Monday, 16 November 2020

अमेरिकेतील कोलोरॅडो विद्यापीठाचे भूवैज्ञानिक डॉ. रॉबर्ट ब्रेकन्रिज यांच्या अनुमानानुसार, झाडाच्या बुंध्यावरील या वलयांनी आपल्या आकाशगंगेजवळील सुपरनोव्हांची (महाविस्फोट) नोंद घेतल्याचे दिसते.

एखादे जुने झाड कापल्यावर त्याच्या खोडावर दिसणारी गोलगोल वलये आपण पाहिली असतील. अत्यंत सुबक आणि रेखीव असलेल्या वलयांबद्दल अगदी लहानग्यांपासून ते शास्त्रज्ञांपर्यंत सर्वांनाच कुतूहल आहे. ही वलये झाडाच्या पूर्वेतिहासाबरोबरच मानवजातीचा नव्हे, तर जीवसृष्टीचाच इतिहास सांगतात का? याचा शोध शास्त्रज्ञ घेत आहेत. अमेरिकेतील कोलोरॅडो विद्यापीठाचे भूवैज्ञानिक डॉ. रॉबर्ट ब्रेकन्रिज यांच्या अनुमानानुसार, झाडाच्या बुंध्यावरील या वलयांनी आपल्या आकाशगंगेजवळील सुपरनोव्हांची (महाविस्फोट) नोंद घेतल्याचे दिसते. या वलयांसंबंधीचे प्राथमिक संशोधन ‘इंटरनॅशनल जर्नल ऑफ ॲस्ट्रोबायोलॉजी’मध्ये प्रकाशित झाले आहे. विश्‍वामधील सर्वांत प्रकाशमान आणि ऊर्जावान घटना म्हणजे सुपरनोव्हा! मोठाल्या ताऱ्यांचा स्फोट म्हणजेच सुपरनोव्हा होय. आपला सूर्य त्याच्या संपूर्ण आयुष्यात जेवढी ऊर्जा आणि प्रकाश बाहेर टाकेल, तेवढा प्रकाश आणि ऊर्जा या घटनेतून बाहेर पडते. आपल्या शेजारच्या आकाशगंगेतील सुपरनोव्हांचा पृथ्वीवरील जीवसृष्टीवर परिणाम झाल्याची शक्‍यता शास्त्रज्ञांनी व्यक्त केली आहे. त्यातून बाहेर पडणाऱ्या विद्युतचुंबकीय लहरींमधील घातक किरणांचा ओझोन थरावर आणि मानवी सभ्यतेवर परिणाम झाल्याची दाट शक्‍यता आहे. मागील चाळीस हजार वर्षामध्ये आपल्या आकाशगंगेजवळ किमान चार सुपरोनोव्हा घडून गेल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. या सगळ्या परिणामांची नोद झाडांच्या बुंध्यांमधील गोलाकार वलयांनी घेतल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. 

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

रेडिओकार्बनचा परिणाम  
पृथ्वीवर कार्बन १४ किंवा रेडिओ कार्बन नावाचे एक समस्थानिक अगदी नगण्य प्रमाणात आढळते. ते पृथ्वीवर तयार झालेले नाही. ब्रह्मांडातून येणाऱ्या अतीऊर्जावान किरणांमुळे आकाशामध्ये हे समस्थानिक तयार झाले आहे. विशेष म्हणजे, याचा तयार होण्याचा वेग हजारो वर्षांपासून सारखाच किंवा स्थिर आहे. एखाद्या वस्तूचे, सांगाड्याचे, जिवाश्‍माचे वय काढण्यासाठी कार्बन डेटींगचा वापर करत असल्याचे माहीत असावे. तसेच, वनस्पती श्‍वसनासाठी कार्बन डायऑक्‍साईडचा वापर करत असतात. वनस्पती जेव्हा कार्बन डायऑक्‍साईड आत घेतात, तेव्हा काही प्रमाणात का होईना कार्बन१४ ही शोषला जातो. हजारो वर्ष ही प्रक्रिया स्थिर असते. म्हणजे कार्बन १४ शोषण्याचा दर सारखाच असतो. पण विशिष्ट कालावधीत तो वाढल्यास त्याचा थेट परिणाम झाडांच्या बुंध्यावरील वलयांवर दिसत असल्याचा शास्त्रज्ञांचा दावा आहे. सुपरनोव्हातून बाहेर पडणाऱ्या गॅमा किरणांमुळे पृथ्वीच्या वातावरणातील रेडिओकार्बन निर्माण होण्याचा दर वाढला आणि पर्यायाने त्या कालावधीत झाडांनी शोषलेल्या आणि साठवलेल्या रेडिओकार्बनची संख्याही जास्त आहे. रेडिओकार्बनचा हा फुगवटा थेट बुंध्यावरील वलयांमध्ये उमटला असल्याचे शास्त्रज्ञ सांगतात. पिढ्यान्‌पिढ्या झाडांच्या बुंध्यातील ही रचना आणि रेडिओ कार्बनचे अवशेष हस्तांतरित केल्यामुळे हजारो वर्षांतील बदल आपल्याला अभ्यासता येत आहेत. या सिद्धांताचा वापर करून रॉबर्ट यांनी मागील चाळीस हजार वर्षांत पृथ्वीच्या जवळ आठ सुपरनोव्हा घडून गेल्याचे अनुमान बांधले आहे. पृथ्वीच्या दक्षिण गोलार्धातून दिसणाऱ्या वेला नक्षत्रातील एक सुपरनोव्हा, जो ८१५ प्रकाशवर्ष दूर आहे; त्याच्या स्फोटामुळे १३ हजार वर्षापुर्वी पृथ्वीच्या वातावरणावर परिणाम केल्याचे स्पष्ट होते. त्यावेळी रेडिओ कार्बनच्या निर्मितीचा दर ३ टक्‍क्‍यांनी वाढल्याचे स्पष्ट होते. यातील उरलेल्या सुपरनोव्हांचा कालावधी आणि नक्षत्र शोधण्याचा प्रयत्न शास्त्रज्ञ करत आहेत. निश्‍चितच प्राथमिक स्वरूपातील हे संशोधन ब्रह्मांडातील सर्वाधिक प्रकाशमान घटनेचा, जीवसृष्टीवर होणाऱ्या थेट परिणामांशी संबंध स्पष्ट करत आहे.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Search-Research article rings on tree trunks

Tags
टॉपिकस
Topic Tags: