हौस ऑफ बांबू; किंगमेकर बाळूचे काळेकरडे स्ट्रोक्स! | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

हौस ऑफ बांबू; किंगमेकर बाळूचे काळेकरडे स्ट्रोक्स!

हौस ऑफ बांबू; किंगमेकर बाळूचे काळेकरडे स्ट्रोक्स!

नअस्कार! सर्वप्रथम माझ्या लाखो चाहत्यांना (आणि थोड्या) वाचकांना नव्या वर्षाच्या लक्ष लक्ष शुभेच्छा! येतं वर्ष तुम्हा सर्वांना धडधाकट प्रकृतीचं, भरपूर मजेचं आणि उदंड वाचनाचं जावो!! गेलं वर्षं (एकदाचं) गेलं, म्हणायचं आणि पुढल्या वर्षासाठी सरसावून बसायचं, यातच खरी गंमत आहे. वर्ष सरता सरता दिल्लीच्या दिशेनं सुखद झुळूक यावी, तशी साहित्य अकादमी पुरस्कारांची बातमी आली. -हल्ली त्या दिशेनं थंडीची लाट तेवढी येत्ये.

हेही वाचा: निकोप, स्पर्धात्मक सहकारासाठी

दिल्लीहून आलेली ही झुळूक (व्हाया कल्याण) थेट पुण्यात धडकली नि मन कसं प्रसन्न झालं. कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाच्या आवारात लगबगीनं चालणारे एक विद्वान गृहस्थ बघितलेत का? ते आमचे सन्मित्र डॉ. किरण गुरव. त्यांनी ‘बाळूच्या अवस्थांतराची डायरी’ लिहिली होती. त्या डायरी-कम-कादंबरीलाच यंदा अकादमी पुरस्कार मिळाला आहे. आता हा बाळू कोण? असला बाळबोध प्रश्न विचारु नका. (त्याच्यासाठी ही कादंबरी वाचा!) बाळू तुमच्या-आमच्या ओळखीचाच आहे, येवढंच सांगत्ये.बाल साहित्याचा पुरस्कार संजय वाघ यांच्या ‘जोकर बनला किंगमेकर’ला मिळाला. एखाद्या वाघाला थेट बालसाहित्य पुरस्कार मिळण्याची ही पहिलीच वेळ असावी! हल्ली बालसाहित्यात या वाघोबांइतकी प्रयोगशील भर घालणारे विरळाच म्हणायचे. या दोघांचंही मन:पूर्वक अभिनंदन! (लाल गुलाब कुरियरने रवाना करत आहे. काळजी नसावी!)

हेही वाचा: ...माणसाला मरण नाही!

दिल्लीची झुळूक ‘व्हाया कल्याण’ आली, असं मघाशी म्हटलं, त्याला कारण आमचे लाडके युवा लेखक प्रणव सखदेव! त्यांना यंदाचा युवा अकादमी पुरस्कार मिळाला. त्यांनी (कागदावर) काढलेले ‘काळेकरडे स्ट्रोक्स’ रंगीत संगीत झाले...प्रणव सखदेव! वॉव!! सिर्फ नामही काफी है!!मला मुळात नावच एवढं आवडलं की हे एक ना दिवस प्रसिद्ध झाल्याशिवाय राहणार नाही, असं भाकित मी फार पूर्वीच करुन ठेवलं होतं. इतकं चांगलं नाव मराठी लेखकाचं असणं कसं शक्यंय? असंच मला सुरवातीला वाटायचं. टोपणनाव तर नसेल नं? असाही वहीम मनात होताच. हो, टोपणनाव सखदेव आणि त्याच्याआड निघायचा कुणी तरी अशी भीती उगीच मनात बसली होती. पण नाही, एक दिवस कल्याण स्लो लोकलमध्ये विंडो सीटला बसलेला एक तरुण पाहिला आणि... - तेच हे प्रणवराव हं! (आता राव म्हटलं पाहिजे, अकादमी मिळाली!) मध्यंतरी या तरुणाला पत्रकारिता करण्याची उबळ आली होती. पण वेळीच या सखदेवरावांनी पत्रकारितेला ‘बाय बाय’ करुन लेखनाकडे मोर्चा वळवला, हे चांगलंच झालं...

हेही वाचा: पत्नीच्या मदतीनं चर्चमधील फादरनं केला अल्पवयीन मुलीवर बलात्कार

कल्याणचा हा कोवळा तरुण हल्ली पुण्यात येऊन भलताच अकाली प्रौढ तर झाला नाही ना?, अशी पापशंका माझ्या कोथरुडी मनात घर करुन राहिली होती. (दिवाळी अंकातल्या कथा वाचल्या की असं होणारच!) पण मध्यंतरी फर्गसन रोडवर प्रणव दिसला होता, तेव्हा...जाऊ दे!त्याचं झालं असं की, पुण्यात कोणीही गाजायला लागलं की ‘फर्गसन’वर आपोआप दिसतंच. किंवा फर्गसनवर कुणी दिसायला लागलं की आपोआप हळूहळू गाजू लागतंच. प्रणव सखदेवरावांचं असंच झालं. बरं झालं बै, हा तरुण आमच्या पुण्यात आला. कल्याणात राहिला असता तर पारनाका ते खडकपाडा आणि बैलबाजार ते बेतुरकरपाडा येवढ्याच चौकोनात अडकून पडला असता! पुण्यात मनुष्य रातोरात इंटरनॅशनल होतो.

कल्याणचे दोनच पदार्थ आमच्यामते (सध्या) इंटरनॅशनल आहेत. एक, वझेबंधूंचा खिडकीवडा आणि दुसरे आमचे प्रणवराव सखदेवराव!! असो.सर्व विजेत्यांचं मन:पूर्वक अभिनंदन! आणि नव्या वर्षाच्या त्यांना स्पेशल शुभेच्छा!

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..
टॅग्स :Editorial Article
loading image
go to top