esakal | ढिंग टांग  : अल्फाबेटचा तिढा!
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग  : अल्फाबेटचा तिढा!

मातोश्री हाइट्‌स, वांद्रे. वेळ : नाइट लाइफच्या पूर्वीची. काळ : पेंगणारा. पात्रे : महाराष्ट्राचे कारभारी श्री. रा. रा. उधोजीसाहेब सीएम आणि महाराष्ट्राचे ‘आपलं माणूस’ ऊर्फ पर्यटनमंत्री चि. विक्रमादित्य.

ढिंग टांग  : अल्फाबेटचा तिढा!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

स्थळ : मातोश्री हाइट्‌स, वांद्रे. वेळ : नाइट लाइफच्या पूर्वीची. काळ : पेंगणारा. पात्रे : महाराष्ट्राचे कारभारी श्री. रा. रा. उधोजीसाहेब सीएम आणि महाराष्ट्राचे ‘आपलं माणूस’ ऊर्फ पर्यटनमंत्री चि. विक्रमादित्य.
...................
विक्रमादित्य : (खोलीच्या दारावर टकटक करत) हाय देअर बॅब्स...मे आय कम इन?

ताज्या बातम्यांसाठी ई-सकाळचे ऍप डाऊनलोड करा 

उधोजीसाहेब : (पांघरुणात शिरत) नोप! एक तर मी दमलोय! दिल्लीहून परत आल्यावर एक मिनीट उसंत मिळालेली नाही! उद्यासुद्धा मला उद्या खूप कामं आहेत! आय हॅव अ व्हेरी लाँग डे टुमारो! गुड नाइट!

विक्रमादित्य : (दुर्लक्ष करत खोलीत शिरत) एक इंपॉर्टंट गोष्ट डिस्कस करायची आहे! ॲक्‍चुअली तीन गोष्टी डिस्कस करायच्या आहेत!!

उधोजीसाहेब : उद्या सकाळी अपॉइण्टमेंट घेऊन भेटा!

विक्रमादित्य : (विषय बदलत) बाकी परवा दिल्लीत नमो अंकलकडे मजा आली नै? मला बघून म्हणाले की, ‘‘आइए, आइए मंत्रीजी...कैसे हो आप?’’

उधोजीसाहेब : ‘‘आवो आवो, मंत्रीजी, केमछो!’’ असं म्हणाले ते!

विक्रमादित्य : व्हॉटेव्हर! त्यांनी सीएए आणि एनारसी किती सोप्प्या भाषेत समजावून सांगितलं नै? मला तर सगळं कळलं! तुम्हाला?

उधोजीसाहेब : नसते विषय रात्रीच्या वेळी काढू नकोस! झोप उडेल!!

विक्रमादित्य : सीएए, एनारसी आणि एनारसी हे काय हॉरर टॉपिक्‍स आहेत?

उधोजीसाहेब : तुझ्या नमो अंकलशी बोलल्यावर सीएए आणि एनारसी दोन्ही आवडलं! तिथून सोनिया मॅडमकडे गेलो तर त्यांचंही पटलं! पुन्हा अमितभाईंनी सांगितल्यावर पुन्हा पटलं! मग इथं मुंबईत आल्यावर पुन्हा विरोधात मत गेलं! ‘इकडे आड तिकडे विहीर’ अशी अवस्था झाली आहे! क्‍या करुं? या इंग्रजी अल्फाबेटसनी देशभर उच्छाद मांडलाय नुसता!

विक्रमादित्य : आपला तर बुवा सीएएला सपोर्ट आहे!

उधोजीसाहेब : (चुळबुळत) तसा माझाही आहे रे...पण आमच्या तीन चाकी रिक्षातल्या पाशिंजरांना कोण समजावेल? सीएए आणि एनारसी म्हटलं की ते खवळून खुर्चीतून उठून उभेच राहतात!!

विक्रमादित्य : बट व्हाय? त्यांचा सीएए आणि एनारसीला आणि एनपीआरला विरोध कां आहे?

उधोजीसाहेब : (खांदे उडवत) त्यांचं त्यांना माहीत! त्यांचं प्रबोधन करण्याची आवश्‍यकता आहे!

विक्रमादित्य : (चुटकी वाजवत) मी करू?

उधोजीसाहेब : ऊंहू! तुला जमणार नाही!

विक्रमादित्य : (कमरेवर हात ठेवून आव्हान देण्याच्या पवित्र्यात) कमॉन! आय कॅन डू इट! सीएए हा चांगला कायदा आहे! एनआरसी लागूच होणार नाहीए, आणि एनपीआर म्हंजे सिंपल जनगणनेचा भाग आहे!

उधोजीसाहेब : (समजूत घालत) आमच्या लोकांना मी रोज हेच सांगतोय! पण ते म्हणतात, तुमचंच प्रबोधन करण्याची गरज आहे!! काय खरं आणि काय खोटं? कुणी सांगावं?

विक्रमादित्य : (हाताची घडी घालून) तुमचं खरं खरं मत काय आहे, बॅब्स?

उधोजीसाहेब : (साधक बाधक विचार करत) माझ्या मते सीएए हा चांगला कायदा असला तरी घटनेच्या विरोधात आहे! एनपीआरसुद्धा जनगणनेचा भाग असला तरी एनारसीचाच एक भाग आहे, आणि एनारसी आवश्‍यक असला तरी तो लागू होऊ देणं गैरलागू आहे!

विक्रमादित्य : (दाद देत) सुपर्ब! द्या टाळी!!