ढिंग टांग  :  खरी कमाई! 

ढिंग टांग  :  खरी कमाई! 

आता जाहीर करायला हरकत नाही- आम्ही पहिल्यापासून एक सुसंस्कारी, सविनय बालवीर याने की स्काऊट होतो, आहो आणि यापुढेदेखील राहू! खिश्‍याला शिट्टी लावून आम्ही "खरी कमाई' करायला बाहेर पडलो, की बाकीच्या बालवीरांना सहजी मागे टाकतो. पण सध्या दिवस वेगळे होते. हेरून ठेवलेल्या घरात जाऊन "काही काम असेल तर्सांगा!' अशी विनंती करून घुसायचे, "खरी कमाई' करून बाहेर पडायचे, हा आमचा जुना खाक्‍या. त्यास स्मरून आम्ही थेट निर्मलाआंटींच्या घरी गेलो. 

""हे पहा, आता तुला आत्मनिर्भर व्हायला हवं!,'' नाकासमोर तर्जनी उगारत मास्कआडून निर्मलाआंटीने दटावले. आम्ही उगेमुगे राहिलो. निर्मलाआंटी खूप खूप मायाळू आहेत. चुकले तर रागावतात, तेदेखील हळूचकन! "" दिस्सीज नॉटड्डन हांऽऽ'' एवढेच म्हणतात. चांगले काम केले की हसतात खुदकन!! चेहऱ्यावरून कडक शिस्तीच्या वाटतात, पण तसे काहीच नाही! काही काही लोक दिसायला चिडके असतात, पण हृदयात अपार प्रेम अस्ते त्यांच्या. आपले नमोजीचाचा नाहीत्का? कित्ती कित्ती मवाळ आहेत. वरून कडक आतून मधाळ! जणू आमच्या कोकणातला नारळ किंवा फणशीच. वरुन्काटे, आतून्गरे!! 

निर्मलाआंटी तर त्यांच्याहीपेक्षा मायाळू आहेत. साऱ्यांनी भराभरा मोठे होऊन "खरी कमाई' करावी आणि ट्याक्‍स भरावा, इतकेच त्यांचे म्हणणे असते. सगळ्यांनी ट्याक्‍स भरला, तर गरजूंना मदत करता येते. बरेच काय काय करता येते! पण त्यांचे कुणी ऐक्कतच नाही. जाऊ दे. 

समोर निर्मलाआंटी बसल्या होत्या. "खरी कमाई'साठी आलोय, काम द्या' असे आम्ही सांगणार, तेवढ्यात म्युझिक सुरू झाले. एका मार्चिंग सॉंगचा जबर्दस्त ठेका सुरू झाला. किंचित गळा खाकरून निर्मलाआंटीने किनऱ्या सुरात गायला सुरवात केली... 

आत्मनिर्भर, आऽऽत्मनिर्भर, आऽऽत्मनिर्भर व्हा नाऽऽ 
मातृभूमीला वंदन करुनि, नमवु सकलही मानाऽऽऽ...।।धृ.।। 
भरतभूमी ही विशाल सुंदर 
हे तर मन्मातेचे मंदिर 
खळखळ वाहती येथे निर्झर 
निर्भरतेचे जीवनगाणे त्यांच्यासंगे गा नाऽऽ..।। 

...या नव्या स्फूर्तीगीताने आमचे भान हरपले. नकळत आमच्या पावलांनीही ठेका धरला. काही आलरेडी आत्मनिर्भर झालेले बालवीर आणि वीरबाला, त्या गाण्याच्या तालावर समूहनृत्यदेखील करीत होती. हे नवे गाणे सध्या खूप फेमस झाले आहे. तोंडपाठ करून ठेवले पाहिजे, असा आम्ही मनोमन निर्धार केला. गाणे संपले. निर्मलाआंटीने समाधानाने डोळे मिटून गरम पाण्याचा घोट घेतला. (खुलासा : त्याआधी मास्क किंचित दूर केला होता. असो.) 

""कसं वाटलं गाणं?'' त्यांनी विचारले. तर्जनी आणि आंगठ्याची टोके जुळवून आम्ही "टॉप' असे म्हटले. त्या खुदकन हसल्या. खुशीत असल्या की त्या इडलीबिडली खायला देतात. नाही म्हटले तरी सकाळपासून पोटात काही नव्हते. ""आत्मनिर्भर म्हंजे काय हो,?'' असे विचारायचे होते, पण डेरिंग झाले नाही. त्यांच्या सैपाकघरातून येणारा सांबाराचा उकळता वास अस्वस्थ करत होता. 

""किती दिवस असा उगीचच हिंडत राहणार तू? बरं दिस्तं का, अं? लौकर लौकर आत्मनिर्भर हो! आयतोबा नुस्ता!!'' निर्मलाआंटीने दटावले. इडलीसाठी हपापलो आहोत, हे चाणाक्ष आंटीनी ओळखलेन!! त्या चटकन म्हणाल्या : 

""अंह! आयती इडली मिळणार नाही! त्याऐवजी मी कोपऱ्यावरच्या अण्णाला कर्ज देईन! तो इडलीच्या आट्याची चक्की टाकेल. त्याच्या मी इडल्या करून देईन. त्या तू सायकलीवरून विकणाऱ्या दुसऱ्या एका अण्णाला नेऊन दे! तो तुला आ-ण-णा-व-ळ (अण्णावळ नव्हे!) देईल आणि इडलीही...तीच तुझी खरी कमाई बरं!'' 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com