esakal | ढिंग टांग : खयाल! 

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग : खयाल! 

हे सृष्टीस्त्रिये, मोड तुझी मरणनिद्रा 
जागी हो, होशील ना? 
अन्यथा- 
दिल को खुश रखने को 
गालिब ये खयाल अच्छा है 
बहोतही अच्छा है. 

ढिंग टांग : खयाल! 
sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

ढिले पडतील अंधाराचे पवित्रे 
विखाराचे ढग पांगत जातील, 
कण्हणाऱ्या बीमार चराचरात 
पुनरुत्थानाची बीजे रुजतील 
पुन्हा एकदा उगवेल 
चिरंतन विजिगीषु सूर्य 
उगवतीचे रंग उजळतील 
-उजाडेल ना आता? 

हे सृष्टीस्त्रिये, बदल गे 
तुझी अवजड कूस, 
झटक प्रात:कालीन आळस, 
गिळून टाक सृजनाचे उमासे 
प्रसव गे, उद्याचा सहस्त्ररश्मी सूर्य 
झळझळू दे पुनश्च विश्वकिरीट 
शिळ्याबासी शेवाळाने ग्रासलेला 
हा चराचराचा कटाह 
पुन: उकळू दे चैतन्याने 
नवनिर्माणाच्या वेणा, 
सरसरुदेत तुझ्या देहामनांत, 
सोड हे अवघडलेपण 
भारलेले पाय उचल, आणि 
फुंक पुन्हा चराचराच्या चुलवणात, 
संजीवक प्राणशक्ती, 
धगधगू देत विस्तव, उडू देत ठिणग्या, 
उठू दे समृध्द धुराची रेघ 
चंद्रमौळी कौलारावर रेंगाळू दे 
रटरटू देत व्यंजने, घुमू दे 
सुगंध सुग्रासाचा पुन्हा एकदा 
तुझ्या भरल्या किनखापी घरात. 
उजाडेल ना आता? 

तुझी कूस बदलण्याचा अवकाश, 
गे माये, इडापीडा टळेल, 
क्वारंटाइन लक्ष्मी पुन्हा येईल 
खळखळून हांसत, ओलांडेल उंबरा. 

ढासळतील पडझडीचे इरादे 
कोलमडतील कारस्थाने, 
गारद्यांच्या सावल्यांचे पोपडे 
फितुर भिंतीवरुन गळतील आपोआप. 
मरणम्लान सृष्टीदेहाला 
पुन्हा मिळेल जीवनाचे वरदान 
जागृत होत जाईल एकेक देवस्थान, 
गजबजतील देवळे, फुलबाजार 
अगरबत्त्यांची दुकाने. 
देवळांच्या बाहेर पुन्हा जमतील 
भाविक पायताणांचे ढीग. 
हिसकतील माकडे हातातले काहीबाही, 
भिक्षेकऱ्यांची पात्रे खुळखुळतील. 
दुमदुमतील उदघोष अस्मानात 
तारणहार, विघ्नहर्त्या वगैरे वगैरे 
देवादिकांच्या गर्भगृहांची 
कवाडे करकरत उघडतील. 
पिवळ्या-शेंदरी फुलांच्या राशीत 
ईश्वराचे अंश पुन्हा लोळतील, 
जागे होत जाईल अवघे गोकुळ 
लेकुरवाळे गोठे गजबजतील 
उजाडेल ना आता? 
चाकरमान्यांच्या गर्दीने पुन्हा 
चेंदतील, कोंदतील, फुंदतील 
शहरगावचे रस्ते, सडका, चौक. 
गावोगावच्या गल्लीकुच्या सुखावतील 
शेंबड्या पोरट्यांच्या किलबिलाटाने. 
वाड्या-वस्त्यांवर पुन्हा जमतील, 
गप्पांचे फड, पुन्हा घट्ट होतील 
दोस्तदारांच्या गळामिठ्या, 
चिंध्या होतील तोंडफडक्यांच्या 
विषाचा अंमल उतरेल क्षणार्धात. 
सारे काही होईल आलबेल. 
…तू फक्त कूस बदल माये! 
उजाडेल ना आता? 

हे सृष्टीस्त्रिये, मोड तुझी मरणनिद्रा 
जागी हो, होशील ना? 
अन्यथा- 
दिल को खुश रखने को 
गालिब ये खयाल अच्छा है 
बहोतही अच्छा है.