ढिंग टांग : आरेरे...अरारा!

ढिंग टांग : आरेरे...अरारा!

आजची तिथी : प्रमादी संवत्सर श्रीशके
आधिक आश्विन एकादशी. आजचा वार : ट्यूसडेवार!
आजचा सुविचार : वाघ म्हटले तरी खाणार, वाघ्या म्हटले तरी खाणार...मग आम्ही म्हणतो पाग्या!

नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: ( वेळा लिहिणे) मन क्षुब्ध होऊन गेले आहे. नागपुरातल्या माणसाचे मन क्षुब्ध झाले की तो काय करतो, हे महाराष्ट्र पुरते जाणून आहे. ‘आरे’ला ‘का बे’ करण्याची आमची वृत्ती आहे. आमचा कारभार रोखठोक असतो. पण सध्या मी संयमाने वागतो आहे. कुणी ‘आरे’ म्हटले की लागलीच ‘का बे’ करायचे नाही! ‘क्‍यों बे’ असे तर बिलकुल म्हणायचे नाही, असे स्वत:ला बजावतो आहे. पण मन कष्टी झाले आहे हे मात्र खरे.

वाघ आणि माणूस यांच्यातील संघर्ष किती टिपेला पोचला आहे, याचा विचार सध्या करतो आहे. या संघर्षात बहुतेकदा माणसाची सरशी होते, पण आरेवनाच्या बाबतीत माणूस हरला! वाघ जिंकला!!

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

छे, छे, माझी केवढी तरी मेहनत वाया गेली! मुंबईकरांचे कोट्यवधी रुपये वाचवायला गेलो, आणि त्याच्या दुप्पट खर्च झाले! (हेही आमच्या नागपुरी पद्धतीनेच पार पडले म्हणायचे.) चालायचेच. (बंद खोलीत) ठरल्याप्रमाणे सारे काही यथासांग झाले असते, तर आज मुंबईत मेट्रो रेल्वेने बाळसे धरले असते. आरेच्या त्या मोकळ्या जागेत कारशेड दिमाखात उभी राहिली असती. मुंबईकरांनी मला किती दुवा दिली असती. मगर ये न हो सका! पर्यावरणाचे कारण पुढे करुन वाघांनी डाव साधला. अशाने कसा होणार मुंबईचा विकास अं? 

मी दु:खी आहे, कष्टी आहे, शोकमग्न आहे. मेट्रोसाठी बलिदान देणाऱ्या झाडांनो, मला क्षमा करा. कां की, तुमचे बलिदान वाया गेले. तुमच्या हौतात्म्याच्या जागेवरच आम्ही मेट्रो कारशेड नावाचे समाधीस्थळ बांधणार होतो. पण नाही जमले! नाही चिरा, नाही पणती...असे तुमचे हौतात्म्य वाया गेले. नव्या कारभाऱ्यांनी आमची कारशेड गुंडाळून ठेवली. तुमच्या स्मारकाची जागा त्यांनी शेवटी बदललीच. अहंकार हो अहंकार! सध्याचे पर्यावरण अहंकाराला पोषक़ आहे हेच खरे! 

निव्वळ अहंकारापोटी त्यांनी कांजूरमार्गला जागा हलवली. याला काय म्हणायचे?

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नाही म्हणायला आरेवनातल्या बिबट्यांचे फावले. त्यांची वस्ती, अधिवास कायम राहिला. वास्तविक वाघाच्या जातीने मुंबईत राहण्याचे काही कारण नाही. त्यांनी चंद्रपुरात, ताडोबा, नागझिऱ्यात राहावे. पण इथे त्यांचे फावले. (आता लेकाचे आजूबाजूच्या सोसायट्यांमध्ये अधून मधून घुसायला मोकळे!) वास्तविक (मुंबईत जागा महाग असूनही) मी त्यांच्यासाठी जागा ठेवली होती. पण बिबटे असले तरी मुंबईकर वाघच ते! सिनेमाचा प्रभाव असणार! त्यांना मी हिंदी चित्रपटातला खलनायक वाटलो असेन का? गरीबीत राहणाऱ्या नायकाच्या वस्तीवर बुलडोझर चालवू पाहणाऱ्या खलनायकाला हिरो बुकलून काढतो, हे पठडीतले सिनेदृश्‍य माझ्या डोळ्यांसमोर सारखे येत आहे. त्या आरेवनातील चहाटळ बिबट्यांनी काल जंगलात पार्टी केली असेल. ‘कशी जिरवली एका माणसाची’ असे ते म्हणाले असतील! 

आता सगळे बदलले! कसली मेट्रो नि कसले काय! वाघांना नीट नांदता यावे, म्हणून मुंबईकर करदात्यांनी किती किंमत मोजायची, याचा काही हिशेब? छे, सगळा घोटाळा झाला. ...आरे वनातले बिबटे निवडणुकीत मते देत नाहीत, आणि पर्यावरणातले बदल राजकारणात कामाला येत नाहीत, हे त्या वाघांच्या पुढाऱ्याला कुणी समजावेल का? आरेरे..आरारा!

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com