ढिंग टांग : थाली में छेद! 

actress
actress

सुप्रसिद्ध तारका कु. रंगनादेवी यांस कोण ओळखत नाही? आम्ही तर बुवा कु. रंगनादेवी यांचे पहिल्यापास्नंच फॅन आहो. त्यांच्या वाढदिवसाला आम्ही कडकडीत उपवास करतो. कारण उघड आहे. त्या पवित्र दिवशी आम्ही पहाटेच घर सोडून कु. रंगनादेवी यांच्या आलिशान निवासस्थानाच्या समोरील फूटपाथवर जागा धरतो. कु. रंगनादेवी ग्यालरीत येऊन आम्हा चाहत्यांना गोडसे स्मितहास्य करुन अभिवादन करतील, अशी स्वप्ने पाहातो. अधूनमधून पोलिस येऊन वेगळ्या पद्धतीने (मागील बाजूस) अभिवादन करुन जातात. पण आम्ही ती सुखद वेदना सहन करत तिष्ठत राहातो. 

वाढदिवस आणि आगामी चित्रपटाचे प्रमोशन या दोनच मुहूर्तांना आमचे लाडके सितारे (मोफत) दर्शन देतात. परंतु, परवा आक्रितच घडले! परवाच्या दिवशी कु.रंगनादेवी यांचा वाढदिवस नव्हता नि नव्या चित्रपटाचे प्रमोशनही, तरीही आम्हाला त्यांचे दर्शन घडले! (काहीही कारण नसताना) त्यांनी चक्क मुलाखतीसाठी आम्हांस बोलावणे धाडले. मग काय! आम्ही (कामातून) गेलो... 

‘‘मी क्षत्राणि आहे! सर कटा दूंगी, पर झुकाऊंगी नहीं!!’’ सप सप सप सप हवेत वार काढत कु. रंगनादेवी यांनी आमच्यावर चाल केली. आम्ही दाराआड लपलो, म्हणून बचावलो. कु. रंगनादेवी यांनी ‘पिस्तुल रानी’ चित्रपटात अस्साच भन्नाट रोल केला आहे, त्याची आठवण आली. 

‘‘जळो तुमचं बॉलिवुड! गटारगंगा आहे ती, गटारगंगा! ती आधी साफ करा!,’’ कु.रंगनादेवी यांनी फर्मावले. इथे आम्हाला त्यांनी ‘ कातिल और वकील’ चित्रपटात वकिलीणबाईंचा भन्नाट रोल केला आहे, त्याची आठवण आली. 

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

...बॉलिवुड आणि गटारगंगा? छे छे! हे काय भलतेच? अवघे आयुष्य आम्ही जिच्यासाठी वेंचले. आयुष्यातील अनेक वर्षे जिच्यासाठी तिष्ठलो. प्रसंगी उधारी-उसनवारी केली, शैक्षणिक कारकीर्दीचीदेखील पर्वा केली नाही, अशा या चंदेरी दुनियेला कुणी गटारगंगा असे संबोधल्यामुळे आमच्या मनाची शंभर शकले होणे साहजिकच होते. 

बॉलिवुड ही का गटारगंगा आहे? तो का नशिल्या पदार्थांचा पाताळतंत्री अड्डा आहे? लखलखती तेजाची ही न्यारी दुनिया अचानक अधोविश्वासारखी काळोखी कशी काय बुवा झाली, अं? बाकी ‘दम मारो दम’पासून ‘संजू’पर्यंत (व्हाया ‘उडता पंजाब’) आम्ही किमान दोन-अडीच क्विंटल ‘नशीले’ चित्रपट आजवर प्रत्येकी सरासरी सातवेळा पाहिले आहेत. पडद्यावर दिसणारे मद्य, गांजा, अफू आदी व्यसनांचे चित्रण पाहून आम्हालाही वेळोवेळी अंमल चढला आहे. परंतु, हे सगळे पडद्यावर असते, अशी आमची भाबडी समजूत होती. पडद्यामागेही बॉलिवुड अस्सेच का असते? आम्ही विचारात पडलो... 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘‘जिस थाली में खाते हो, उसी में छेद करते हो? यह गलत है...,’’ आम्ही हे वाक्‍य उच्वारले नाही, तरीही कु. रंगनादेवींनी बरोब्बर ऐकलेन!! 

‘‘ खामोश!! माझ्या घरावर बुल्डोझर फिरवलात, आता आख्ख्या बॉलिवूडवरुन गाढवाचा नांगर फिरवते की नाही बघा!‘‘ त्वेषाने तलवारीचे आणखी बारा-तेरा वार (हवेत) काढत कु. रंगनादेवींनी आपला इरादा जाहीर केला. 

‘‘देवीजी, असं करु नका, आधीच तुमच्या वाग्बाणांनी अवघं बॉलिवूड घायाळ की हो झालं आहे...’’ आम्ही जिवाच्या आकांताने कशीबशी प्रार्थना केली. 

त्या खुदकन हसल्या! म्हणाल्या, ‘‘ सध्या थिएटरं बंद आहेत नं! नवं पिक्‍चर कुठं रिलीज करणार? म्हटलं ही नवी आयडिया काय वाईट आहे? हो की नाही?’’ 

युरेक्‍का! आम्ही ओरडलो, ‘‘इसकू कहते है असली थाली में छेद!’’

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com