ढिंग टांग : अयोध्येचा राजा!

ayodhya
ayodhya

इतिहासपुरुषास नेमकें आठवते. ती पौषातली टळटळीत सकाळ होती. कृष्णकुंजगडाचें पायथ्याशी वसलेले शिवाजी पार्काड नुकते आळोखे पिळोखे देत जागें होत होते. कोवळी उन्हे पार्काच्या हिर्वळीवर हुंदडत होती. पार्कातील कबुतरे आपापल्या कामाला लागली होती. (टिप : कबुतर हा सार्वजनिक ठिकाणी थर्डक्‍लास कृत्ये करणारा थर्डक्‍लास पक्षी आहे, अशी नोंद इतिहासपुरुषाने आधीच करुन ठेवली आहे. त्यांस बर्डफ्लू होवो! असो!) कृष्णकुंजगडाचा बालेकिल्ला मात्र अजुनी साखरझोपेतच होता. सारे कसे निवांत चालले होते. तेवढ्यात-

‘‘सियावर रामचंद्र की जय!’’ अशी गगनभेदी घोषणा बालेकिल्ल्यातून उमटून आस्मान भेदून गेली. कबुतरांचे उद्योग (दचकून) थांबले. कोवळी उन्हेदेखील (दचकून) हुंदडायचें विसरली. अवघे शिवाजी पार्काड (दचकून) खाडकन जागे झाले. ‘काय जाहाले, काय जाहालें?’ अशी विचारणा करीत मनुष्यमात्रें रस्त्यावर उतरली. 

बालेकिल्ल्यातील अंत:पुरात गहजब उडाला होता.

साक्षात साहेब अंथरुणात उठून बसले होते. (दचकून नव्हे!) त्यांचे चेहऱ्यावर अष्टसात्त्विक भाव उमटले होते. अर्धोन्मिलित नेत्रांनी हात जोडून ते स्तब्ध बसून राहिले. त्यांचा कदीम सेवक पप्याजी फर्जंद यांस कळेना की चहा आत्ताच न्यावा की थोडका वेळ जावो द्यावा?

‘‘साहेब, चहा आणू?’’ अत्यंत अदबीने त्याने विचारले.

‘‘नको रे नको, आता मला काऽऽही नको!’’ साहेबांनी हळूवारपणे गदगद सुरात नकार दिला. डोळ्यात पाणी होते. ओठांवर मंद स्मित होते. फर्जंदास (आवाजावरुन) वाटले की साहेबांस सर्दी झाली की काय? ‘आले घालुनु मस्त उकळुनु चाय आणुनु देऊ काये?’ असे त्याला विचारायचे होते. पण धाडस झाले नाही.

‘‘आता एकच ध्यास लागला आहे, बाळा!’’ साहेबांनी ममतेने ओथंबलेल्या सुरात म्हटले.

फर्जंदाला हुंदका फुटायचा तेवढा बाकी होता. आपले साहेब असे कां करताहेत? हे त्या बिचाऱ्यास कळेना! बाळा? बा-हा-ळा? छे छे! ज्या कानांना ‘पप्याऽऽऽ...’ अशी डरकाळी ऐकावयाची सवय, त्या कानांवर ‘बाऽऽळाऽऽ...?’ हे काय भलतेच? हे म्हणजे मोगलाई हाटेलीच्या बोर्डावर ‘आज का स्पेशल : साबुदाणा वडा’ असे लिहिलेले वाचल्यापैकीच!

‘‘आम्ही अयोध्येला जाणार!’’ साहेबांनी अचानक जाहीर केले. ‘जाणार म्हंजे जाणारच. का नको जाऊ? किंबहुना गेल्याशिवाय राहणार नाही...’ अशी काही चुलत-कौटुबिंक वाक्‍ये पाठोपाठ बाहेर पडतात की काय, याची वाट पाहात फर्जंद तेथेच उभा राहिला. पण तसे घडले नाही. साहेब भक्तिभावाने ओथंबलेल्या सुरात सांगो लागले-  ‘‘पप्या, अरे पप्याराया, आम्हाला दृष्टांत की रे जाहला! दृष्टीसमोर तेज पुंजाळले. एका दाढीधारी सत्पुरुषाने प्रकट होवोन आमच्या हाती धनुष्य ठेविले! म्हणाले, ‘‘जा, वत्सा, तुजप्रत कल्याण असो!’’

‘‘आमचे कल्याण असोच, पण नाशिकही असो, महाराज!’’ (पक्षी : साहेब) त्या सत्पुरुषास गळ घातली.

‘‘बरं! वत्सा, तुजप्रत नाशिकही असो! जा, कार्याला लाग, आणि दंडकारण्यातील प्रदेश सुजलाम सुफलाम कर! जागोजाग बागा फुलव! पूल बांध, रस्ते रंगव!’’ एवढे तो दाढीधारी सत्पुरुष म्हणाला, आणि अदृश्‍य जाहला...

...साहेबांची दृष्टांतकथा ऐकोन फर्जंद धन्य धन्य जाहला. महाराष्ट्रात रामराज्य अवतरणार, याबद्दल त्याचें मनीं शंका उरली नाही. साहेबांनी त्यांच्या दमदार खर्जात ’पायोजी मैंने रामरतन धन पायो!’ हे भजन गायला सुरवात केली. फर्जंदानेही त्यांच्या सुरात सूर मिसळला, आणि अयोध्येच्या वारीसाठी ब्यागा भरावयास घेतल्या.

सियावर रामचंद्र की जय!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com