ढिंग टांग : हवापालट! (एक पर्यटन अनुभव)

ब्रिटिश नंदी
Monday, 23 November 2020

दिल्लीची हवा प्रचंड बिघडली असल्याने दूर कोठेतरी हवापालटाला जावे, असा सल्ला डॉक़्टरांनी दिला. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही तशीच काळजी व्यक्त केली. ‘हल्ली आपल्याकडे राजकीय प्रदूषण भयंकर वाढले आहे.

हवापालटासाठी कोठे जावे? याचे उत्तर प्राय: ट्रावलिंग  अलौन्स किती मिळतो यावर अवलंबून असते.  तथापि, काही काही वेळा अपरिहार्य कारणास्तव हवापालटाची वेळ माणसावर येते. दिल्लीची हवा प्रचंड बिघडली असल्याने दूर कोठेतरी हवापालटाला जावे, असा सल्ला डॉक़्टरांनी दिला. आमच्या पक्षाच्या नेत्यांनी आणि कार्यकर्त्यांनीही तशीच काळजी व्यक्त केली. ‘हल्ली आपल्याकडे राजकीय प्रदूषण भयंकर वाढले आहे. ते कमी करण्यासाठी कुठेतरी तुम्ही जायला हवं’, असा युक्तिवाद आमचे वकीलमित्र मा. सिब्बलसाहेब यांनी केला. त्यांचा युक्तिवाद पटला नाही; पण धकाधकीच्या आयुष्यातून थोडी उसंत काढून चांगलीशी हवा खाण्यासाठी कोठेतरी जावे, हे मात्र पटले. हल्ली खाण्यापिण्यासाठी कोणी कुठे जायची गरज उरलेली नाही. हल्ली दिल्लीत बाखरवडी मिळते, आणि पुण्यात पराठे मिळतात!!

आसामात वडापाव मिळतो, आणि केरळात आलू टिक्की मिळते! चांगली हवा खाण्यासाठी मात्र स्वत: उठून कुठेतरी जावेच लागते.

दिल्लीत प्रदूषणाचा स्तर इतका वाढला होता, की पक्षाच्या कार्यालयात माणसे येईनाशी झाली. मी कार्यालयात गेलो की शुकशुकाट! बहुधा हवापालटाला गेली असणार!! शेवटी डॉक्‍टरांच्या सल्ल्यानुसार आम्हीही ठरवले, की दिल्ली सोडून कुठेतरी (महाराष्ट्रात) स्वच्छ हवेच्या ठिकाणी जायचे. कुणीतरी म्हणाले की सध्या मुंबईत (आपले सर्वांचे लाडके) महाविकास आघाडी सरकार आल्यापासून मुंबईतली हवा खूप झकास झाली आहे. पण म्हटले नको! दिदी म्हणाली की, महाराष्ट्रात माथेरान नावाचे ठिकाण आहे, तिथे जा! पण तिथे घोड्यावर बसावे लागते, हे कळल्यावर बेत रद्द केला. माणसाने घोडे असलेल्या ठिकाणी हवापालटासाठी जाऊ नये!

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

ज्या पर्यटकांचे शेवटपर्यंत कुठे जावे हे ठरत नाही, ते अखेरीस गोव्यात जातात, हे एक पर्यटनविषयक सत्य आहे!! अखेर गोव्यात पोचलो!

विमानतळावर काही मास्कधारी पक्षकार्यकर्ते ‘गोयान गांधी आयलॉ रे’ हे स्फूर्तिगीत म्हणत उभे होते. हात हलवून त्यांना अभिवादन केले. तेवढ्यात लगबगीने एक मास्कधारी गृहस्थ आले. मला वाटले, खाजगी ट्रावलवाले असावेत. गोव्यात गेल्यावर हे टॅक्‍सीवाले हमखास गराडा घालतात. मी दुर्लक्ष केले. ते आले आणि म्हणाले, ‘ हांव दिगंबर कामत! मोबोराँ वचपाक गाडी तयार आसा!’

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘मोबोराँ?’ मी प्रश्नार्थक मुद्रा करुन विचारले.

‘राँ बीच खूब सोबित आसा मरे!’ ते म्हणाले. मग कळले की मोबोर हा दक्षिण गोव्यातला एक बीच आहे. म्हटले, सोबित तर सोबित! आपल्याला काय?

निळेशार आकाश, निळाशार समुद्र आणि निळेशार मन...सोबित! गोव्यात आले की सारे काही सोबित होऊन जाते. येथे किनाऱ्यावरल्या वाळून शांतपणे उन्हे खात पडून राहावयाचे. नाही म्हटले तरी गेले काही दिवस दगदग झालीच होती. बिहारमध्ये,,,जाऊ दे! ती आठवणसुध्दा नको! तो विचार झटकून लौकरात लौकर सोबित मोबोर बीच गाठायचा, असे मनोमन ठरवूनच गाडीत बसलो. टूर गाइड कामतबाब आमच्यासोबत होते.

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दिल्लीतील प्रदूषण वाढले म्हणून आम्हाला इथे पाठवण्यात आले. ते बरेच झाले, असे वाटले.‘गोव्यात नेमके कुणाचे राज्य आहे हो? आपल्या पक्षाचेच आहे ना?,’ कामतबाब यांना विचारले. ‘आख्क...कितें रें! सोड रे...!,’ असे ते (बहुधा) तिरसटून म्हणाले. त्यांच्या चेहऱ्यावर मास्क होता. असो.

...आता काही दिवस गोव्यात आराम करणार आहे. दिल्लीतले राजकीय प्रदूषण कमी व्हायला हवे!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article about Delhi air pollution