ढिंग टांग :  देवाची करणी!

ढिंग टांग :  देवाची करणी!

विधिलिखित का कुणाला टाळता येत्ये? सटवाईने आधीच कपाळावर कोरून ठेवलेला मजकूर का कुणाला वाचता येतो? नशिबात वाढून ठेवलेले का कुणाला टाळता येते? कुणाला नाही, वाचकहो, कुणालाही नाही. गेले कित्येक वर्षे आम्ही अगदी हेच सांगत होतो, परंतु, कोणीही आमचे ऐकले नाही. 

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

तुम क्‍या लाये थे, जो तुमने खोया? तुमने क्‍या पाया, जो तुम्हारा था? भाग्य से अधिक या कम किसी को कुछ नहीं मिलता...हे गीतासार आम्ही शा. शामजी मुळजी एण्ड सन्स (किराणा भुसार व्यापारी) यांच्या दुकानी वाचून पाठ करून ठेवले आहे.

बालपणीच आम्ही शिक्षण व्यवस्थेतील गंभीर उणीवांची जाणीव संबंधितांना वेळोवेळी करून दिली. या प्रकारचे शिक्षण उपयोगाचे नसून नवे कौशल्याधारित शिक्षण धोरण अमलात येईपर्यंत आमच्यावर सक्ती करू नये, असे आम्ही सांगत होतो. ऐकले नाही! परिणाम काय झाला? सातव्या यत्तेतच असताना आमच्या मास्तरांनी आमच्यापुढे हात टेकले आणि ‘यापुढील शिक्षण तुमचे तुम्ही मिळवा!’ असा (दोन्ही कर जोडोनि) वर देऊन शाळेबाहेर काढले. देवाची करणी दुसरे काय?

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

गरजेपुरते पैसे उभे केले की काम भागते, हे आम्ही अनुभवाच्या शाळेत शिकलो. अडीअडचणीला, विडीकाडीपुरती रक्कम कुठेही मिळून जाते. त्यासाठी आटापीटा करण्याचे काय कारण? क्वचित कधी विपरीत अनुभव येतो, म्हणा. नाही असे नाही. उदाहरणार्थ, बब्या बनचुकेकडून आम्ही थोडकी रक्कम उसनी घेतली होती. ती आम्ही परत करावी, यासाठी बब्याने आग्रही भूमिका घेतली. बब्याचा स्वभाव थोडा रागीट आहे, हे खरे. पण त्याने एक दिवस भर चौकात पैसे परत करण्याविषयी इतका टोकाचा आग्रह आम्हाला केला की पंधरा दिवस आम्ही हाता-पायाला पलिस्तर बांधून हिंडत होतो. काय करणार? होष्यमाण का कुणाला टाळता येते? देवाची करणी म्हणायचे आणि दुसरे काय?

एरवी, पैका उसना घेऊन बुडवणे, ‘उद्या नक्की देतो’ असे बिनदिक्कत आश्वासन देणे, उसने पैसे देणारा समोरून चालत येत असताना आधीच हेरून वेळीच फूटपाथ बदलणे, हा सारा कोरडा व्यवहाराचा भाग आहे. कुणी उसनवारी परत मागण्यासाठी आला तर थोडी दाढी खाजवावी. ओशाळवाणे हसावे. खांदे उडवावेत, आणि ‘सध्या परिस्थिती थोडी तंगीची आहे. समजून घ्या जरा...पुढल्या आठवड्यात नक्की...’ असे सांगावे. खाऊ का गिळू या नजरेने बघत समोरचा चरफडत  निघून जातो. काय करेल? देवाची करणी!!

एकंदरित कडकीत दिवस काढण्याची आम्हाला सवय आहे. पण तरीही गेले काही महिने फारच तंगी आल्याने आम्ही आमच्या खात्रीच्या ठिकाणी गेलो. आमच्या मा. निर्मलाआंटी  स्वभावाने फार प्रेमळ! चुक्कूनही कधी रिकाम्या हाती माघारी पाठवणार नाहीत. काहीच नसेल, त्या दिवशी निदान थोडे गूळखोबरे तरी हातावर ठेवतील!!

परंतु कसचे काय! त्यांच्या समोर जाऊन उभे राहिल्यावर त्या ओशाळवाण्या हसल्या. मग त्यांनी खांदे उडवले. म्हणाल्या : सध्या परिस्थिती थोडी तंगीची आहे. समजून घ्या जरा...पुढल्या आठवड्यात नक्की हं!

उत्तरादाखल आम्हीही दाढी खाजवली. ओशाळवाणे हसलो. खांदे उडवले आणि म्हणालो : ‘‘अगदीच काही नाही का जमायचं? बघा, काही पर्समध्ये निघतंय का?’’ 

पर्समधून बसची, जुनी तिकिटं, टेलरची जुनी बिलं, सॅनिटायझरची छोटी बाटली, थोडी चिल्लर असं काढत काढत त्या हताशेने म्हणाल्या : छे, देवाची करणी, डोण्ट आस्क (फॉर) मनी!’’

असो!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com