esakal | ढिंग टांग :  चिनी कम!
sakal

बोलून बातमी शोधा

india-china

मा. रक्षामंत्र्यांची कणखर (आणि शुद्ध) भाषा ऐकून चिन्यांनी चीची करत पळ काढला असणार, याबद्दल आमच्या मनात शंका उरली नाही. एवढ्या शुध्द हिंदीसमोर तर आमचीसुध्दा गाळण उडते. तिथे चिन्यांची काय पत्रास?

ढिंग टांग :  चिनी कम!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

वातावरण एकाचवेळी प्रफुल्लित एवं तणावाचे होते. दालनात एकाचवेळी अगरबत्ती आणि दारुगोळ्याचा वास दर्वळत होता. एकाचवेळी ‘ॐकार’ आणि जयजयकार घुमत होता. ते पाहून एकाचवेळी आमच्या मनात अष्टसात्त्विकभाव आणि रणसिद्धताभाव दाटून आला. हे दोन्हीही भाव एकाच ठायी उमटणे, हा दुर्मीळ योग आहे बरं!

आता हे सांगितले पाहिजे की, आम्ही साक्षात मा. रक्षामंत्र्यांच्या दालनात होतो. नुसतेच होतो असे नव्हे, तर उपस्थित होतो! समोर रक्षामंत्री करारी मुद्रेने बसले होते, आणि आम्ही त्यांच्या पुढ्यात अदबीने उभे होतो. मा. रक्षामंत्र्यानी सेवकाला ‘चिनी कम’ चहा आणण्याचा आदेश दिला.

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

‘‘विश्राम’’ त्यांनी फर्मावले. आम्ही थोडे खांदे पाडून (म्हंजे नेहमीसारखे) उभे राहिलो.

‘‘क्‍या समस्या है?’’ त्यांनी विचारले. ती पृच्छा आम्ही अष्टसात्त्विकभावाने स्वीकारली. वास्तविक सरहद्दीवर चिन्यांनी सुरु केलेल्या चिडवाचिडवीमुळे आम्हीही चिडीला येऊन आमच्या मनात तमसभावाचा प्रभाव वाढला होता. या चहाटळ चिन्यांना चांगला चरचरीत चटका द्यावा, पुन्हा लेकाचे असले उद्योग करणार नाहीत, अशी तामसी गळ घालण्यासाठीच आम्ही मा. रक्षामंत्र्यांकडे आलो होतो.

‘‘चिंता न करें, शत्रुराष्ट्र को सक्षम प्रत्युत्तर देने हेतु हमारा सैन्यदल सीमाक्षेत्र में सिध्द है...’’ उजवा हात आशीर्वचनपर उभा करुन त्यांनी आम्हांस आश्वसिले. ते पुढे म्हणाले : ‘‘ बंधुवर, भय भावना को मनमस्तिष्क से निकाल दें...’’

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

मा. रक्षा मंत्र्यांच्या शुद्ध तुपातील हिंदी भाषेने आमच्या मराठी मनाचे बुरुज निम्मे ढासळले होते, हे येथे कबूल करणे भाग आहे... ‘‘हमने हमारे पडोसियों को यह दो टूक बता है, की आपकी अयोग्य वर्तन के कारण पडोसीधर्म के पवित्र कार्य में बाधा आ रही है. यह कदापि नहीं चलेगा. हम इसकी कडी आलोचना एवं निर्भर्त्सना करते हैं, और भविष्य में भी अवश्‍य करेंगे..,’’ म ाननीय रक्षामंत्री एकदा बोलायला लागले की बस्स! आम्ही भक्तिभावाने ऐकत होतो. त्यांच्या चेहऱ्यावरचे कठोर भाव बघून एखाद्या चिनी जनरलचे नाक आणखीनच चपटे झाले असते, या विचाराने आम्हाला खुदकन हसू आले. तिथेच आमचे चुकले!

‘‘हंसीए मत! यह कोई विनोदन का विषय नहीं!’’ रक्षामंत्र्यांनी आम्हाला तिथल्या तिथे झापले. वास्तविक आम्ही हसलो होतो चिन्यांना, पण...जाऊ दे. आम्ही ताबडतोब गंभीर झालो. ‘‘हम हमारे पडोसी को शुद्ध वाणी में कह देतें हैं की, अनुचित बल का प्रयोग हमपर न करें, उसका परिणाम ठीक न होगा...’’ रक्षामंत्र्यांनी आम्हाला निर्वाणीचे बजावले.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘‘ इस विषयपर कुछ विचार विनिमय होना चाहिए, ऐसा लगता हय...’’ आम्ही चहाचा कप उचलत महत्प्रयासाने शब्द जुळवीत म्हणालो.

‘‘चाय रख दिजिए! यह भली भांती जान लें की यह चर्चा का विषय भी नहीं है...’’ असे म्हणून मा. रक्षामंत्र्यांनी आम्हाला चक्क दालनाचा दरवाजा दाखवलान! नाइलाजाने कदमताल करत आम्ही तेथून बाहेर पडलो.

मा. रक्षामंत्र्यांची कणखर (आणि शुद्ध) भाषा ऐकून चिन्यांनी चीची करत पळ काढला असणार, याबद्दल आमच्या मनात शंका उरली नाही. एवढ्या शुध्द हिंदीसमोर तर आमचीसुध्दा गाळण उडते. तिथे चिन्यांची काय पत्रास?

‘चिनी कम’ चहा राहिला, किंतु परंतु, हा चर्चेचा विषय नाही, हे मात्र आम्हाला मनोमन पटले.