esakal | ढिंग टांग : .... तेवढेच ज्ञानप्रकाशात!
sakal

बोलून बातमी शोधा

media-trial

गेल्या पाच-सहा महिन्यात आमच्या बुद्‌ध्यांकात प्रचंड वाढ झालेली पाहून अनेक बुद्धिवंत आणि तज्ज्ञ एकाच वेळी बुचकळ्यात आणि अचंब्यात पडले आहेत. -की बुवा एकाच व्यक्तीच्या बुद्धीचे तेज इतके प्रखर कसे?

ढिंग टांग : .... तेवढेच ज्ञानप्रकाशात!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

गेले काही दिवस तुम्हाला दिवस लवकर मावळत नसल्याचे लक्षात आले असेलच. वातावरण ढगाळ असले तरी उजेड दीर्घकाळ पडलेला असतो. हा उजेड आमच्या बुद्धिमत्तेचा! गेल्या पाच-सहा महिन्यात आमच्या बुद्‌ध्यांकात प्रचंड वाढ झालेली पाहून अनेक बुद्धिवंत आणि तज्ज्ञ एकाच वेळी बुचकळ्यात आणि अचंब्यात पडले आहेत. -की बुवा एकाच व्यक्तीच्या बुद्धीचे तेज इतके प्रखर कसे?

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

लॉकडाऊनच्या काळात आम्ही घरबसल्या जे ज्ञान मिळविले, त्याचा हा अलौकिक प्रकाश आहे. हे ज्ञान आम्हास घरात पलंगावर बसून प्राप्त झाले. उशापायथ्याशी गिरद्या घ्याव्यात व मुखात ज्ञानवृध्दीस चालना देणारी आयुर्वेदिक जडीबूटीचा बार धरुन आसन धारण करावे. पुढ्यात टीव्ही आणि हातात मोबाइल फोन एवढी आयुधे घेऊन बसले की ज्ञानप्रवाह आपापत: वाहून येत साधकाच्या देहाच्या रंध्रारंध्रातून शरीरात शिरतो, हे ज्ञानकण तिथून थेट मेंदूत जातात. या ज्ञानकणांच्या अँटिबॉडी अनेकांच्या देहात आलरेडी असतात. तरीही त्यांच्याठायी हा ज्ञानप्रकाश प्रकटतो! आमचे नेमके हेच झाले आहे. मुळात आमची बुध्दी अतिशय कुशाग्र आणि कुतूहल म्हणाल तर दिसेल त्या उघड्या भांड्यात तोंड खुपसणाऱ्या मांजरालादेखील लाज वाटावी, असे! थोडक्‍यात, या ज्ञानलालसेपोटी (बसल्या बसल्या) आमची अवस्था ग्यासबत्तीसारखी झाली आहे. (म्हंजे ग्यास आणि बत्ती दोन्ही एकाचवेळी! असो!) साथीचे रोग आणि प्रशासकीय गलथानपणा, कोविडसंदर्भातील आकडेवारीची मीमांसा, तसेच विविध प्रकारच्या आत्महत्त्या, अंमली पदार्थ, सिताऱ्यांची जीवनशैली, बॉलिवुडची रहस्ये, अशा कैक विषयात आम्ही ज्ञानकण गोळा केले आहेत. त्यातील काही ज्ञानकण येथे (वानोळा म्हणून ) देत आहोत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

१. कोरोना विषाणू ही एक शुद्ध अफवा आहे.
२. कोरोना ही अफवा नसून एक भयंकर घातक विषाणू आहे. तो चिन्यांनी तयार केला आहे.
३. कोरोनाच्या लढाईत आपला विजय होतो आहे...खरंच!
४. कोरोनाच्या लढाईत आपली वाट लागली आहे ...खरंच!
५. अर्थव्यवस्थेचा बोजवारा उडाला असून कोरोना ही तर देवाची करणी आहे.
६. पब्लिक सोशल डिस्टन्सिंग पाळत नाही. मास्क लावा!
७. पब्लिक उत्तम प्रकारे सोशल डिस्टन्सिंग पाळते. त्यांच्या संयमाला शतप्रतिशत नमन!  पण मास्क लावा!
८. बालवीर, रणवीर, अंतराळवीर, यांच्या माळेत रेमडेसिवीर समाविष्ट नाही. ते एक औषध आहे.
९. आपली तब्बेत बरी आहे की वाईट याचे सर्वप्रथम निदान चाळीचा गुरखा करतो.
त्याच्याकडे ताप मोजण्याची बंदूक असते व ती तो अतिशय मर्दपणाने आपल्या कपाळावर बिनदिक्कत रोखतो. कोरोना संपल्यावर त्या लेकाच्याला बघून घेऊ!
१०. आपल्या शरीरात ऑक्‍सिजन असतो, तो शहाण्णव टक्के तरी हवाच! शहाण्णव टक्के हा आकडा आपल्या आयुष्यात येईल, असे चुक्कूनही कधी वाटले नव्हते.
११. तंबाकूचा बार लावून वर मास्क चढवून रस्त्यावर हिंडणे यासारखी कठोर शिक्षा दुसरी नाही!
१२. मास्क लावलेल्या अवस्थेत अपमान करणे, आणि ओढवून घेणे, सहज शक्‍य होते. ओठांची भेदक हालचाल कळू नये, यासाठी एन  हा मास्क आवर्जून वापराचा. शिवी दिली, तरी चालते!
१३. आत्महत्त्येचा तपास पोलिस अथवा कुठलीही तपास यंत्रणा कधीही करीत नाहीत. ते माध्यमांचे काम आहे.
१४. न्याय देणे हे कोर्टाचे मुळी कामच नव्हे, उलट ते माध्यमांच्या कार्यक्षेत्रावरील अतिक्रमण आहे!
...हा निव्वळ वानोळा होता! अधिक ज्ञानसंवर्धनानंतर पुढील उजेड पाडू! तूर्त इतकेच.