esakal | ढिंग टांग : डर के आगे जीत है!
sakal

बोलून बातमी शोधा

maharashtra-poltical

गेल्या आठवड्यात मी दिल्लीला जाऊन आलो. आता दिल्लीची वारी ही काही नवलाईची गोष्ट नाही. पण मी दिल्लीला गेलो, ही बातमी ऐकून सत्ताधारी आघाडीतल्या लोकांनी घाबरून ताबडतोब आपापल्या भेटीगाठी सुरू केल्या. 

ढिंग टांग : डर के आगे जीत है!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

आजची तिथी : प्रमादीनाम संवत्सर श्रीशके १९४२ आषाढ सोमवती अमावस्या.
आजचा वार : मंडेवार.
आजचा सुविचार : ज्याला नाही कर, त्याला कशाची डर?


नमो नम: नमो नम: नमो नम: नमो नम: ( १०८ वेळा लिहिणे) माणसाने आत्मनिर्भर असावे आणि आत्मनिर्भयसुद्धा असावे. -मी दोन्ही आहे!!  महाराष्ट्राचे दुर्दैव असे की आज असा आत्मनिर्भर आणि आत्मनिर्भय मनुष्य (म्हंजे मीच) सत्तेवर नाही. सत्तेवर नसूनही (किंवा नसल्यामुळे) सतत हिंडतो आहे. कधी तो कोकणात चक्रीवादळग्रस्तांमध्ये फिरत असतो, कधी ठिकठिकाणी कोरोना इस्पितळांमध्ये पाहणी करीत असतो. याउलट ‘ते’ नुसते घरात बसले आहेत- घाबरून! सत्तेवर बसलेले हे लोक म्हंजे भयगंडाने पछाडलेला समूह आहे, समूह ! म्हणूनच बहुधा आमचे हे विरोधक मला खूप घाबरतात. इतके घाबरतात की विचारता सोय नाही! जराशी हूल दिली तरी दचकून अंग काढतात!! हाहा!!

बाकी कुणीतरी आपल्याला बघून घाबरते आहे, ही जाणीव तशी सुखदच म्हणायला हवी. डर अच्छा होता है! उदाहरणार्थ, गेल्या आठवड्यात मी दिल्लीला जाऊन आलो. आता दिल्लीची वारी ही काही नवलाईची गोष्ट नाही. पण मी दिल्लीला गेलो, ही बातमी ऐकून सत्ताधारी आघाडीतल्या लोकांनी घाबरून ताबडतोब आपापल्या भेटीगाठी सुरू केल्या. मी दिल्लीत श्रीमान मोटाभाईंना भेटलो. इथे मुंबईत हलकल्लोळ झाला. ताबडतोब दादरला यांच्या भेटीगाठी सुरू! मीटिंग संपवून ते लोक उठतच  होते, तेव्हा दिल्लीत मी श्रीमान नमोजींकडे पोचल्याचे कळल्याने परत मीटिंगला बसले!!  

आणखी लेख वाचण्यासाठी येथे क्लिक करा

दिल्लीला का गेले असतील? कुणाला भेटले? महाराष्ट्राचा राजस्थान होणार का? मध्य प्रदेश होणार का? ‘ऑपरेशन लोटस’ सुरू झाले का? एक ना दोन, शंभर प्रश्न या लोकांना पडले. परवा सगळे दौरे आटोपून नागपूरला स्वत:च्या घरी परतलो तरी तेच! घाबरून एकत्र आले!! एरवी एकमेकांची तोंडे पाहात नाहीत, पण मी जरा कुठे हिंडलो की घाबरून एकत्र येतात!! हाहा!!

आमचे अध्यक्ष मा. चंदुदादा कोल्हापूरकर तर स्पष्टच म्हणाले, की ‘तुम्हाला हे लोक जाम घाबरतात! हे लोक म्हंजे हे महाविकास आघाडीवाले लोक! अक्षरश: दचकून अंग काढतात!’ 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘‘माझ्या व्यक्तिमत्त्वात घाबरण्यासारखं काय आहे? मी काय बागुलबुवा आहे का?’’ मला गंमतच वाटली. एकदा जाऊन मंत्रालयात ‘भॉक’ करून यावे का? पण हल्ली तिथे कोणीच नसते. जाऊन काय उपयोग? नवलच  आहे! एकीकडे मला हसतमुख, साजरागोजरा म्हणायचे आणि मनातल्या मनात घाबरायचे!! याला काय अर्थ आहे?

‘‘तसं नाही हो! तुम्ही मागे म्हणाला होता ना!...म्हणून घाबरतात बहुतेक!’’ चंदुदादांनी (नेहमीप्रमाणे) चष्मा पुसत पुसत पुटपुटत खुलासा केला.

‘‘काय म्हणालो होतो?’’ 

‘‘हेच की... पुन्हा येईन म्हणून!,’’ चाचरत ते म्हणाले. एकदम  माझ्या मनात प्रकाश पडला. अरेच्चा! असे आहे तर!! तरीच लेकाचे मला इतके घाबरतात. घाबरून एकत्र येतात आणि ‘सरकार पाडण्याचे कारस्थान! कारस्थान!’ असा आरडाओरडा करतात. ते संजयाजी राऊत तर दर दोन दिवसांनी ‘सरकार पाडताय? आत्ताच पाडा!’ असे उगीचच ओरडत असतात. त्यांना मनातून तेच हवे आहे की काय कोण जाणे!! जाऊ दे!! आपल्याला काय करायचे आहे? त्यांचे त्यांच्यापाशी! जोवर ते आत्मनिर्भर आणि आत्मनिर्भय होत नाहीत, तोवर चाललेला हा खेळ बरा आहे!!

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा