ढिंग टांग : ‘लय’ भारी!

ढिंग टांग : ‘लय’ भारी!

माझ्या तमाम बंधून्नो, भगिनीन्नो आणि मातांन्नो, जय महाराष्ट्र. काय बोलू? बोलण्यासारखं खूप आहे. कुठून सुरवात करू? गेले काही दिवस आपण ‘कोरोना’च्या मागे हात धुऊन लागलो आहोत. हात धुऊन म्हंजे अक्षरश: हात धुऊन! लागलंच पाहिजे! लागणारच! हे ‘कोरोना’चं संकट महाराष्ट्रातून उपसून फेकून देणारच. त्यासाठीच आपण सगळे मेहनत घेत आहोत. म्हणजेच घरात बसलो आहोत!

खूप लोक मला सांगतात की उघडा, उघडा! हे उघडा, ते उघडा! अरे, उघडा काय उघडा? काही लाजबिज? उघडं करून काय करणार? मद्यालयं उघडा, व्यायामालयं (पक्षी : जिम) उघडा, ग्रंथालयं उघडा, देवालयं उघडा!! सतत आपलं उघडा, उघडा, उघडा! सगळं लयाला जाईल तेव्हा समजेल! आता लय झालं असंच मी म्हणेन. किंबहुना म्हणणारच. ज्याला मद्यालयात जायचं त्यांनी, तिथे जावं, उरलेल्यांनी ग्रंथालयात जावं, बाकीच्यांनी व्यायामालयात जाऊ जोर बैठका काढाव्यात आणि यातलं काहीच नको असेल तर देवालयं उघडतो आहोतच! (हे ‘लय’ भारी आहे!) जिथं जायचं तिथं जा! अरे, काय चाललंय काय? तुम्हाला काय जातं, उघडा सांगायला? उघडलं की जबाबदारी कोण घेणार? आपण हळूहळू उघडतो आहोत. उघडणारच. म्हणजे उघडलंच पाहिजे. 

मुंबईत लोकल सुरू करा, असे मला नागपूर आणि कोल्हापुरातले लोक सांगत आहेत. मला राजकारण करायचं नाही, पण तरीही मी विचारतो की तुमचा मुंबईशी काय संबंध? मी तर असं विचारीन की तुमचा महाराष्ट्राशी तरी (आता) काय संबंध? लोकल गाड्या सगळ्यांनाच हव्या आहेत. लोकल गाडीत बसून सहा महिने झाले. याला लॉकडाउन नाही तर लोकलडाउनच म्हटलं पाहिजे! आपण सगळे दाढ्या नि डोईवरले केस वाढवून विंडोसीटला बसलो आहोत. -पण घरातल्या! गाडीतल्या नव्हे. आम्हाला तर कधी नव्हे ती विंडो सीट मिळाली आहे! आम्हाला म्हंजे आमच्या पक्षाला! याआधी आम्ही कायम दुसऱ्या सीटवर बसायचो. विंडो सीट कधीच मिळाली नव्हती. ती मिळाली! सुखासुखी बरी सोडू? नाहीच सोडणार. सोडणार नाही म्हंजे नाही! 

देशभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

...सगळ्यांनाच कामावर जायचंय. कामावर गेलं नाही तर पगारपाणी कसं चालणार? पगारपाणी नाही चाललं तर घर कसं चालणार? घर नाही चाललं तर सरकार कसं चालणार? हे दुष्टचक्र आहे आणि तेच आपल्याला भेदायचं आहे. भेदणारच! किंबहुना भेदलं पाहिजे!! आपल्याला गाड्या हव्या आहेत, पण गर्दी नको आहे. गर्दी झाली की वाट लागेल. आपल्याला पुन्हा लॉकडाउन नकोय! खरंच नकोय. अजिबात नकोय. किंबहुना, तो नको म्हंजे अगदीच नकोसा आहे. पण गर्दी झाली तर आपला काही इलाज चालणार नाही. मी पुन्हा लॉकडाउन करीन! मग मला जबाबदार धरू नका.

जगभरातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

ज्याप्रमाणे भुंगा फुलाला चाहूल लागू न देता हळूचकन फुलाच्या पाकळ्यांमध्ये शिरून मकरंद पितो, तसा आपण प्यायला शिकलं पाहिजे. पाकळ्या मिटल्या की भुंगा लॉकडाउन!! मग आतच अडकून पडायला होणार! ते टाळायचं असेल तर भुंगा व्हा, भुंगा! मकरंद प्यायला मिळावा, म्हणून आपण जरूर तेवढी मकरंदालयं उघडलीच आहेत! 

सणासुदीचे दिवस आहेत. घरी रहा, हात धुवा, दोन मीटरचं अंतर राखून जिव्हाळ्याने राहा! आणि हो...मास्क लावा! जो न लावील मास्क, त्याला...जाऊ दे. यमक सुचलं नाही. पुढच्या वेळी जमवू. जय महाराष्ट्र.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com