ढिंग टांग : व्हॅलेंटाइन विवाद!

ढिंग टांग : व्हॅलेंटाइन विवाद!

प्राणप्रिय मा. उधोजीसाहेब यांच्या चरणी,  य:कश्चित दाशी कमळाबाईचा सा. न. आणि व्हालेंटाइन दिनाच्या अनेकानेक हार्दिक शुभेच्छा. काय सांगू? काय बोलू? काही सुचेनासे झाले आहे…‘कोन्यात झोपली सतार सरला रंग, पसरली पैंजणे सैल टाकुनी अंग, दुमडला गालिचा तक्के झुकले खाली, तबकात राहिले देठ, लवंगा, साली!’ अशी माझी सध्या आवस्था झाली आहे. एकेकाळी, तुम्ही आणि मी किती किती आणाभाका घेतल्या होत्या. किती किती व्हालेंटाइन डे साजरे केले होते… मला अजूनही आठवते की, दर व्हालेंटाइन दिनाला गुलाबाचे फूल घेऊन मी तुमच्याकडे येत असे. लांब दांड्याची गुलाबकाडी तुमच्या मुखकमलासमोर धरली की तुमच्या नाकाला हुळहुळत असे, आणि तुम्ही सटासट शिंकायचात! त्या शिंका माझ्या कानाला कित्ती गोड लागत!! पण गेले ते दिवस, राहिल्या त्या आठवणी…गेल्या दीड वर्षापासून मी तुमच्या शिंका ऐकलेल्याच नाहीत. हल्ली मास्क लावण्याचे दिवस आहेत, आणि शिंका म्हटले तर लोक प्राणांतिक दचकतात. तेव्हा नको तो विषय!

माझ्याशी प्रेमाचे नाटक करुन ऐनवेळी मांडवात नवरी बदलण्याचा तुमचा नाट्यप्रयोग माझ्या जिव्हारी लागला आहे. पण त्यातून मी आता सावरत्ये आहे. नाते बदलले तरी भावना बदलते का? नाही! आजही मी व्हालेंटाइन डेला तुमचीच आठवण काढून दिवसभर लोळत पडलेली असते. कुणाकडे जाणं नाही, येणं नाही! आपल्यामध्ये कितीही बेबनाव येवो, कुणीही कितीही राष्ट्रवादी बिब्बा घालो, त्या बिब्ब्याच्या फुल्या त्यांच्यावरच उमटल्याशिवाय राहणार नाहीत, असा शाप देत्ये!

साध्वीचा शाप फुकट जाणार नाही. बघालच तुम्ही. ‘मी पुन्हा येईन’ असे सांगून मी घर सोडल्ये होते, हे लक्षात आहे ना? एक ना एक दिवस माझी सौभाग्यपावले पुन्हा तुमच्या अंगणात पैंजणे वाजवू लागतील, असा विश्वास वाटतो. अजूनही तुमचीच वाट पाहणारी आणि मनातल्या मनात झुरणारी. 

- आपकी अपनी कमळाबाई.
………………
कमळे,
असली भिकार पत्रे पाठवू नकोस, म्हणून तुला हजारदा बजावले होते. पण तू ऐकत नाहीस. पहिल्यापासून तू अशीच आहेस. तुझे पत्र न वाचताच केराच्या टोपलीत टाकले होते. परंतु, ओला कचरा आणि सुका कचरा वेगळा करण्याच्या कामात चुकून पुन्हा हाती लागले!! वाचून संतापाने अंगाची आगाग झाली. व्हालेंटाइन दिनी प्रेमीजनांच्या अंगावर रोमांच का काय ते येतात, असे ऐकतो! पण आमच्या नशिबी ते कुठले? आमच्या प्रॉपर्टीवर डोळा ठेवून तू वर्षानुवर्षे प्रेमाचे नाटक केलेस. त्याला आम्ही फशी पडलो! उशीरा का होईना, जाग आली ही जगदीश्वराची कृपा!! आता तुला आमच्या दौलतीत आणि मनात स्थान नाही, ही खूणगाठ बांधून ठेव. तुला आम्ही कधीच बेदखल केले आहे.

मोठमोठ्या कविंच्या कवितेतील ओळी नको तिथे वापरुन इंप्रेशन मारण्याची तुझी आयडिया जुनीच आहे. कोन्यात झोपली सतार काय, नि पैंजणे काय…तुला हे शोभत नाही. तुझ्या खोट्यानाट्या व्हालेंटाइन शुभेच्छा तुझ्यापाशीच ठेव. आता आम्ही रुळ बदलले आहेत आणि मार्गही बदलला आहे. तू दरवर्षी व्हालेंटाइन डेला अन्य अर्धाडझन लोकांना गुलाबकाडी आणि शुभेच्छा पाठवतेस, असे लक्षात आले आहे. हा काय प्रकार आहे? 

जय महाराष्ट्र. (फायनल!) उधोजी.
ता. क. : काहीही असले तरी मास्क लाव, सॅनिटायझर वापर आणि वारंवार हात धू बरं का!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com