esakal | ढिंगटांग :  युद्धतज्ज्ञांचा सुकाळु! 

बोलून बातमी शोधा

ढिंगटांग :  युद्धतज्ज्ञांचा सुकाळु! 

आजमितीस आमच्या ओळखीचेच किमान साताठ क्विंटल युद्धतज्ज्ञ कार्यरत आहेत व बिनओळखीचे किमान बारा दशलक्ष क्विंटल युद्धतज्ज्ञ देशोदेशी पसरले आहेत. हे युद्धतज्ज्ञ जागरूक आहेत, म्हणूनच आम्ही रात्री बिनघोर झोपू शकतो, याची जाणीव आम्हाला आहे.

ढिंगटांग :  युद्धतज्ज्ञांचा सुकाळु! 
sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

सांप्रतकाळी गल्लोगल्ली युद्धतज्ज्ञांचा सुकाळु झाल्याचे पाहून आम्हाला परम संतोष होत असून, ज्या देशात इतके युद्धतज्ज्ञ एकाचवेळी उपस्थित आहेत, तो देश विश्वात अजिंक्य न ठरता तरच नवल! लष्कर पोटावर चालते असे म्हणतात. युद्धतज्ज्ञांचे कळप व्हाट्सॅप किंवा फेसबुकावर चालतात.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप   

चिनी वर्चस्ववाद, दक्षिण चिनी समुद्रातील युद्धमानता, तैवानची त्रेधातिरपीट, हाँगकाँगची हबेलंडी, नेपाळचा नैमित्तिक नतद्रष्टपणा, भूतानच्या कहाण्या आणि त्याअनुषंगाने (फार दिवसांनी हा शब्द कामी आला. किंबहुना आलाच!) भारताचे सामरिक धोरण आणि तदनुषंगिक त्रुटी या सर्व विषयांवर आम्ही नुकतीच पारंगतता मिळवली, त्याचे श्रेय या युद्धतज्ज्ञांच्या सामूहिक ज्ञानवाटपामुळेच आहे, हे आम्ही येथे कृतज्ञतापूर्वक नमूद करू. होय, भारताच्या लष्करी धोरणासंबंधी आम्ही किमान तीन-चार पीएचड्या आरामात पुऱ्या करू शकू, एवढे ज्ञान आमच्यापास एव्हाना गोळा झाले आहे. आजमितीस आमच्या ओळखीचेच किमान साताठ क्विंटल युद्धतज्ज्ञ कार्यरत आहेत व बिनओळखीचे किमान बारा दशलक्ष क्विंटल युद्धतज्ज्ञ देशोदेशी पसरले आहेत. हे युद्धतज्ज्ञ जागरूक आहेत, म्हणूनच आम्ही रात्री बिनघोर झोपू शकतो, याची जाणीव आम्हाला आहे. आम्हीही ‘त्यातले’च आहो! तसे पाहू गेल्यास कोणालाही घरबसल्या युद्धतज्ज्ञ होता येते. याचा एक ऑनलाइन अभ्यासक्रमच आम्ही सुरू करण्याच्या विचारात आहोत. युद्धतज्ज्ञ होणे, फारसे कठीण नाही. काही बेसिक (पक्षी : मूलभूत) पथ्ये पाळली की पुढले सारे सुरळीत होते. ही पथ्ये खालीलप्रमाणे : 

सर्वप्रथम चीनसंदर्भात बोलताना ‘१९६२ साली पं. नेहरू कसे चुकले? इथपासून सुरुवात करावी. तपशिलाची गरज नाही! ‘पंडितजी चुकले’, हे मोठ्या आवाजात म्हटले तरी बास होते. मुख्य म्हंजे त्याने कांग्रेसवाले थोडे गप्प बसतात. पंडितजी चुकले हे इतक्या वेळा ऐकून ऐकून कांग्रेसवाल्यांनाही ते खरेच चुकले, असे वाटू लागले असणार!! त्याचा गैरफायदा उचलावा! पंडितजींची चूक दाखवून झाली रे झाली की पहिला पॉइण्ट स्कोर झाला असे समजावे. 

त्यानंतर लागलीच चिनी लोकांच्या विश्वासघातकी स्वभावावर सहजी घसरावे! आपल्या बोलण्यात प्रचंड विरोधाभास आणि विसंगती आहे, याची चिंता करण्याचे काही कारण नाही. त्याने पॉइण्ट बिलकुल जात नाही! चिनी लोक हे भयंकर विश्वासघातकी आहेत, हे सांगता सांगता ते वटवाघळे, खवले मांजर आणि नाकतोडे खातात, हेही सांगून आपला युक्तिवाद प्रभावी करावा. वटवाघूळ खाणाऱ्या माणसाबद्दल जनरली मत बरे होत नाहीच!! 

तिसरा मुद्दा लद्दाखच्या भौगोलिक स्थितीसंदर्भात काढावा. बावीस वर्षांपूर्वी वक्रतुंड  ट्रावल्सतर्फे आपण लडाखला जाऊन आलो होतो, हे लगेहाथ सांगून टाकावे. (जमल्यास) एखादा फोटो टाकावा! पँनगाँग तळे सुंदर आहे, पण सगळे पाणी खारट असल्याचे जनरल नालेज देऊन टाकावे. पॉइण्ट स्कोर होतो. पण तिथे ऑक्सिजनअभावी आपल्याला चक्कर आली होती, हे सांगणे खुबीने टाळावे!! 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चौथा मुद्दा थोडा गहन आहे. गलवान हे खोरे आहे, की नदी की नुसतेच डोंगर, याचा शिताफीने तपशील टाळावा. नाहीतरी तो माहीत नसतोच! 

पाचवा आणि निर्णायक मुद्दा भारताच्या युद्धतयारीचा. याबद्दल बोलताना तपशिलात जाण्याचे काही कारणच नसते. ‘हा बासष्टचा भारत नाही मिस्टर!’ हे वाक्य तोंडावर फेकावे. या वाक्याला युक्तिवाद नाही, हे ओळखून असावे. 

...एवढी तयारी झाली की युद्धतज्ज्ञ म्हणून मिरवायला आपण मोकळे! आमचा ऑनलाइन कोर्स केलात की मग बघायलाच नको! टीव्हीवरल्या प्यानल डिस्कशनचे बोलावणेही येऊ शकते!! चला, सज्ज व्हा!!