ढिंग टांग : नक्षत्रांचे देणे!

ब्रिटिश नंदी
Saturday, 14 November 2020

जरि आभाळाची किनार तिमिरी बुडली
जरि अपरात्रीला घूक अशुभ ओरडली
जरि दिवे पालवित आला अंध:कार
मी जपून ठेविन इवलीशी ही दिवली

या हजार वाटा फुटल्या आयुष्याला
दशदिशा मोकळ्या अनोळखी वाऱ्याला
शोधीन सख्या, मी हजार वाटांमधुनी
जी वाट अखेरी येई तुझ्या घराला

जरि क्‍लांत लोचनी अवघडलेली नीज
धडधडत्या हृदयी विव्हळती आवाज
विसरुन वेदना वांझ तया समजून
मी तुझ्या कीर्तनी पूर्वरंग होईन

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

जरि आभाळाची किनार तिमिरी बुडली
जरि अपरात्रीला घूक अशुभ ओरडली
जरि दिवे पालवित आला अंध:कार
मी जपून ठेविन इवलीशी ही दिवली

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

जणु चराचरावर पसरे काजळमाया
सृष्टीची थर्थरे जर्जर कृशवत काया
अज्ञात विषाणू पोखरतो हा देह
भिंतीवर हलती अमंगळाच्या छाया

किती काळ लोटला, संपत नाही रात
हिंडते चेटकिण भेसूर गाणी गात
क्षितिजावर जोवरि चाहुल नाही त्याची
मी जपेन तोवरि उरी दिव्याची वात

जात्याच जिवट मी, मजला कसली भीती
जाणून असे मी विषवल्लीची रिती
माणूस असे मी द्विपाद पृथ्वीवरचा
या विज्ञानाशी जुळली माझी प्रीती

कुणी इथे जन्मते, कुणी तिथे मावळते
कुणी तिथे मुरझते, कुणी इथे अंकुरते
हा सृजनसोहळा अथवा उत्सव कसला,
हे कोडे मजला जन्मोजन्मी छळते

देशभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

अन अशाच एका अथांग उत्तररात्री
चांदणे उतरते, भिनते माझ्या गात्री
मी कण्हतो, उठतो, पुन्हा टाकितो मान
आठवते मजला माझी जीवनधात्री

जे घडले त्याचा गहिवर नुरला काही
आयुष्य वाहुनी गेले याच प्रवाही
मी पुन्हा भिडवतो डोळे अदृष्टाशी
अन पुसतो डोळे, सरसावुनिया बाही

हे असेच असते जगणे आणिक मरणे
मरणांत जगुनिया जगणे, -जगून घेणे
हातात शेवटी उरतो एकच दीप
तो दीप देतसे नक्षत्रांचे देणे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Dhing tang article Constellation