esakal | ढिंग टांग  : बहुतांची सुखस्वप्ने! 
sakal

बोलून बातमी शोधा

ढिंग टांग  : बहुतांची सुखस्वप्ने! 

 ""जिंकलंत! उत्तमरीत्या (घरून) काम केल्याबद्दल तुमचा पगार दुप्पट करण्यात येत आहे. लॉकडाउनच्या काळात काम केल्याबद्दल तुम्हाला 50 हजार रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे!''

ढिंग टांग  : बहुतांची सुखस्वप्ने! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

टाळ्या आणि थाळ्यांच्या नादाने आसमंत दुमदुमून गेला. कुणीतरी कानाशीच शंख फुंकत आहे, असे वाटून आम्ही जागे झालो... पाहातो तो काय! लॉकडाउन उठला होता. 

ताडकन उठून घाईघाईत पाटलोण चढवून रस्ता तुडवून यावा आणि दांडकेवाल्या पोलिसांसमोर बेधडक फिरून यावे, असे वाटले. तेवढ्यात साहेबांचा फोन आला, म्हणाले, ""जिंकलंत! उत्तमरीत्या (घरून) काम केल्याबद्दल तुमचा पगार दुप्पट करण्यात येत आहे. लॉकडाउनच्या काळात काम केल्याबद्दल तुम्हाला 50 हजार रुपयांचं सानुग्रह अनुदान देण्याचा निर्णय झाला आहे!'' 

बातम्या ऐकण्यासाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

""अहो - पण'' आम्हाला काय बोलावे हे सुचेना! आपण असे (घरून) काम कधी केले? हेच मुळात आठवेना! साहेबांचा रॉंग नंबर लागला असेल!! 

""मी तुमच्याशीच बोलतोय! सवड मिळेल तसे आरामात हपिसला या!'' एवढे बोलून साहेबांनी फोन ठेवला. 

...दरदरून घाम फुटून जाग आली. स्वप्नच होते तर! पाणी पिऊन पुन्हा झोपलो! 

* * * 

""चहा घेत्येस ना?'' घोगऱ्या आवाजात कुणीतरी कानाशी कुजबुजले. डोळे उघडून पाहात्ये तर काय! स्वच्छ दाढी, आंघोळ करून हातात चहाचा कोप धरून आमचे हे उभे! धडपडत उठल्ये. 

""उपमा केलाय... गरम गरम न्याहारी करून घे!'' पुन्हा घोगरा आवाज. इश्‍श! तेवढ्यात सैपाकघरातून कुकरची शिट्टी ऐकू आली. मी गोंधळले - 

""वरणभाताचा कुकर लावलाय! भरली वांगी तयार आहेत. तुला जाग यायच्या आत पोळ्यासुद्धा लाटून झाल्या!'' घोगरा आवाज म्हणाला. 

दोरीवर पाहिले तर कपडेसुद्धा स्वच्छ धुऊन पिळून वाळत घातलेले दिसले. मन अगदी भरून आले. सुखाने मी डोळेच मिटून घेतले. ""च्यामारी, एऽऽ... चहा दे ना याऽऽ र !'' घोगरा आवाज अचानक तारस्वरात ओरडला आणि मी दचकून जागी झाल्ये! 

- स्वप्नच होते तर! पाणी पिऊन पुन्हा झोपल्ये! 

* * * 

लॉकडाउन उठला. मीही उठलो! नित्यकर्मे करून छानपैकी नमो जाकिट (जांभळ्या रंगाचे) चढवले. भांग पाडला. तेवढ्यात पीए सांगत आले, ""गाडी तयार आहे!'' 

...गाडीत बसून थेट ब्रेबर्न स्टेडियमवर गेलो. तिथे तोबा गर्दी उसळलेली. 

साऱ्यांच्या मुखात माझ्या नावाचा जयजयकार होता. अभिवादन स्वीकारत व्यासपीठाकडे गेलो. तिचे महामहीम राज्यपाल उभेच होते. त्यांनी खूण केली. जयजयकाराच्या घोषातच मी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रिपदाची ( तिसऱ्यांदा ) शपथ घेतली. समोर बसलेल्या अभ्यागतांमध्ये आमचे जुने मित्रदेखील बसले होते. त्यांच्याजवळ गेलो. खांद्यावर हात ठेवून म्हणालो, ""म्हटलं नव्हतं? मी पुन्हा येईन म्हणून?'' त्यांनी मित्रत्वाने आमच्या पोटात बोट खुपसले! मी गदगदून हसलो. हसता हसता जाग आली... 

...ओह! स्वप्नच होते तर! पाणी पिऊन पुन्हा झोपलो!