esakal | ढिंग टांग: हळू हळू! 
sakal

बोलून बातमी शोधा

Mission-Begin-Again

पुन्यांदा सुरवात करताना काही गोष्टींची पथ्ये पाळणे अनिवार्य आहे. अन्यथा केराच्या टोपलीत टाकलेला लॉकडाउन हा शब्द नाक धरून पुन्हा चिमटीत धरून उचलावा लागेल, हा वैधानिक इशारा आम्ही आधीच देऊन ठेवत आहो.

ढिंग टांग: हळू हळू! 

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

जय हो! आमचे परमप्रिय नेते जे की रा. रा. श्रीमान उधोजीसाहेब यांच्या हुकमावरून आम्ही तात्काळ येक पुण्यकर्म केले आहे. लॉकडाउन हा शब्द आम्ही एकदाचा केराच्या टोपलीत टाकला आहे ! गेले कित्येक दिवस हा शिंचा शबूद आमचे जिणे हैराण करीत होता. वापरलेला मास्क धुऊन धुऊन वापरावा, तद्वत आम्ही काही दिवस हा शबूद वापरला. पण अखेर त्यास आम्ही फेकून दिले आहे. त्याऐवजी मा. उधोजीसाहेबांनी "मिशन बिगीनगेन' यानेकी "बेगीनं पुन्हा' यानेकी "पुन्यांदा ष्टार्ट' हा शब्द चलनात आणला आहे. 

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

सध्या चलनात आणण्याजोगे फक्त शब्दच उरले आहेत, नाणी संपली!! नाणी संपली की माणसाला नवनवे शब्द स्फुरतात, ऐसा आमचा अनुभव आहे. 

...तर मंडळी, अशा नाणी संपलेल्या अवस्थेतच सांप्रत आम्ही पुन्यांदा जीवनाला ष्टार्ट याने की सुरवात करणार आहो. कोरोना विषाणूसोबत जगताना नाण्यांशिवाय जगणेदेखील आपण शिकले पाहिजे. आपण कोरोनासोबत जगायला तयार आहो, पण कोरोना आपल्यासोबत जगायला तयार आहे का? या सुप्रसिद्ध सवालाच्या चालीवरच आम्ही विचारू शकलो असतो की, नाण्याशिवाय जगायला आम्ही तयार आहो, पण नाणी तयार आहेत का? पण नाही विचारले. (नाण्यांनी "हो' म्हटले तर काय करायचे?) असो. 

सर्वप्रथम, पुन्यांदा सुरवात करताना काही गोष्टींची पथ्ये पाळणे अनिवार्य आहे. अन्यथा केराच्या टोपलीत टाकलेला लॉकडाउन हा शब्द नाक धरून पुन्हा चिमटीत धरून उचलावा लागेल, हा वैधानिक इशारा आम्ही आधीच देऊन ठेवत आहो. 

सर्व गोष्टी हळूहळूवारपणे कराव्यात, कधीही धसमुसळेपणाने करू नये. त्या किनई हळूहळूवारपणे कराव्यात. शब्दप्रयोग लक्षात घ्या!! -हळूहळूही नव्हे आणि हळूवारपणेही नव्हे. हळूहळूवारपणे!! म्हंजे नेमके काय करायचे? असे तुम्ही (हळूचकन) विचाराल... तेच आम्ही येथे हळूहळू सांगत आहो. तुम्ही हळूहळू ऐका! 

बेगीनं पुन्हा कार्यक्रमात काहीही "बेगीनं' होणार नाही. कां की यातील बेगीन हा इंग्रजी बीगिन आहे. सारे काही हळूहळू करायचे. हळू हळू उठून हळूहळू चालत मॉर्निंगवॉकला जायचे. जलदगतीने चालणे अलौड नाही. त्याऐवजी सायकल चालवावी. सायकलिंग हे सोशल डिस्टंसिंग पाळण्यासाठी उपयुक्त असे वाहन आहे. शिवाय बाजारहाटाची पिशवी हॅंडलला अडकवता येते व ओळखीचा भेटल्यास नमस्कार करण्याच्या भानगडीत पडणे जड जाते. हॅंडल सोडून नमस्कार करू गेल्यास अनवस्था प्रसंग ओढवू शकतो, याची संबंधितांनी नोंद घ्यावी. 

बाजारात जावयाचे असल्यास हळूहळू जावे. तिथे सम तारखेला डावीकडली दुकाने उघडी दिसतील. विषम तारखेला उजवीकडली दुकाने उघडी असतील. क्‍यालिंडरात सम-विषम तारखा पाहून मग हळूच पिशवी उचलायची. "आज पीवन का पीटू?' असे एखाद्यास मास्कआडून विचारण्यास हरकत नाही. 

असे महिनाभर हळूहळू दिवस काढावे. त्यानंतर आपण हळूहळू सारे काही नॉर्मलवर आणू, असा मा. उधोजीसाहेबांचा आग्रह आहे. त्यांचा आग्रह म्हंजे आज्ञाच. ती पाळणे भाग आहे. लोकांना (पक्षी : कमळवाले!) वाटेल की हे काय हळू हळू चालले आहे? यह क्‍या हल्लूहल्लू चल रहा है? माणसाने कसे धडाकेबाज असले पाहिजे. 

पण नाही. वाट निसरडी आहे. खबरदारीही घ्यायला हवी नि जबाबदारीही. कोण घेणार ती? म्हणूनच "बेगीनं पुन्हा'चा संदेश जारी करण्यात आला आहे. परंतु, "बेगीनं पुन्हा'चा अर्थ "मी पुन्हा येईन' असा नाही, हे त्या कमळवाल्यांना कोण सांगणार? जाऊ दे. हळू हळू येईल त्यांच्या लक्षात!! पुनश्‍च हरि ॐ!!