ढिंग टांग : दिवे लागले रे...!

Dhing-Tang
Dhing-Tang

महामारीच्या संकटकाळात मास्क आणि दिवा लावणे अत्यंत गरजेचे आहे. मास्क, हॅंडवॉश आणि दिवे ही महामारीशी मुकाबला करण्यासाठी आवश्‍यक असलेली त्रिसूत्री आहे. मास्क लावल्याने रोगजंतूंना अटकाव होतो, हॅंडवॉशने हात निर्जंतुक होतो आणि दिव्याने सकारात्मक ऊर्जेचा संसर्ग होऊन उरलीसुरली इडापीडा नष्ट होते. हात निर्जंतुक असावा, ही सध्या काळाची गरज आहे. किंबहुना हात की सफाई हाच तर संकल्प आहे!!...म्हणूनच आईतवारी (होय, बहुधा आईतवारीच! हल्ली वार कोणाला लक्षात राहातो?) नौबजेनौमिनट आम्हीही (मास्कसकट) दिवा लावला, त्याची ही कथा!

नमोजींनी आदेशिल्यानुसार आम्ही दुपारपासूनच तयारी सुरू केली होती. आधी मेणबत्त्या शोधून ठेवल्या. मग हॅंडवॉशनिशी हात धुतले. दिवाळीतल्या पणत्या माळ्यावरून काढल्या.

पुन्हा हॅंडवॉशनिशी हात धुतले! टॉर्चमधील ब्याटरी बदलूनच टाकावी, असे वाटून किराणाच्या दुकानात गेलो. ‘सेल आहे का?’ असे विचारल्यावर ‘शा. मुळशी चापशी अेंड सन्स’पैकी मुळशी किंवा चापशी किंवा त्यांच्या पुत्रपौत्रांपैकी कुणी एकाने ओठांची भेदक हालचाल केली. शब्द ऐकू आले नाहीत, पण ‘तुझ्या नानाची टांग’ असे काहीसे असावेत!! बिचाऱ्याचा गैरसमज झाला होता. आम्ही ‘बंपर सेल’बद्दल विचारतो आहो, असे त्या संभ्रमित जिवाला वाटले होते. आम्ही त्याला प्रेमाने टॉर्चचे मागले झाकण उघडून त्यास आतील ब्याटरीची पोकळी दाखवली! त्या पोकळीत त्याला विश्‍वरूपदर्शन झाले असेल का? बहुधा होय! कारण, गैरसमजाचे मळभ दूर झाल्याप्रमाणे त्याने किंचितसे नाक फेंदारून आमच्याकडे दुर्लक्ष केले. (खुलासा : हा व्यवहार होत असताना आम्ही सावधपणे मास्क लावला होता बरे! मास्क नसता तर शा. मुळशी चापशीने उधारीची वही उघडून अधिक हिंस्त्र व्यवहार केला असता! असो!!) अखेर आम्ही विजेरीचा वापर न करण्याचा निर्णय घेऊन सुखरूप घरी परतलो व पुन्हा हॅं. हा. धु.! 

सायंकाळी सातसाडेसातचे सुमारास जसजसा अंधार पडू लागला, तसतसा आम्हांस इसाळ येऊ लागला. कधी येकदा नऊ वाजताहेत, आणि आम्ही दिवे लावतो असे अगदी झाले होते. दिवे लावण्याची रिहर्सल करून पाहावी, अशी सूचना आम्ही शेजाऱ्यापाजाऱ्यांकडे मांडली असता त्यांनी योग्य तो प्रतिसाद दिला नाही. ‘‘भंपकपणा हो सगळा! दिवे लावून कुठे कोरोना जातो होय! गाढवांचा बाजार नुस्ता!’’ अशी मताची चिडखोर पिंक टाकून आमचे शेजारी मा. काका कर्वे यांनी दार लावून घेतले. आम्ही पुन्हा हॅं. हा. धु!!

...अखेर ती घडी येऊन ठेपली. आठ पंचावन्न... छप्पन्न... सत्तावन्न... अठ्‌ठावन्न... एकुणसाठ... आणि...नऊ!! आम्ही तांतडीने आधी दिवे घालवले. दिवा लावण्याआधी घरातले दिवे घालवणे क्रमप्राप्त असते. तेही मन:पूर्वक केले. ‘अंधेरा छटेगा, कोरोना हटेगा’ असे आशावादी उद्‌गार काढत काढत आम्ही भस्सकन काडी लावली आणि...दिवा उजळला!! 

दिवा लावून आसपास पाहिले तो काय...घरोघरी पसरलेल्या अंधारात सहस्त्रावधी इवल्या इवल्या ज्योती उजळत होत्या. त्यात एक आमचीही पणती होती...मन भरून आले!

‘एकच पणती, माझ्यापुढती, तमा नसे तिज घोर तमाची...’ अशा ओळी आम्हाला स्फुरत असतानाच शेजारच्या मा. काका कर्वेंचा आवाज कानी आला. ‘‘लायटर आहे का?’’ असा अत्यंत अनुचित प्रश्‍न विचारला. दिवा का लायटरने पेटवायचा? हल्ली लायटर कोण बाळगतो? निमूटपणे काड्याची पेटी आम्ही पुढे केली. मा. काका कर्वेंनी स्वत:हून आमच्यासमोर भंपकपणाची ज्योत पेटवली. कृतकृत्यतेने आम्ही हॅं. हा. धु.!!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com