esakal | ढिंग टांग : सावकारी पाश!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

बेटा : (नेहमीप्रमाणे उत्साहात एण्ट्री घेत) ढॅण टढॅऽऽण! मम्मा, आयम बॅक!!
मम्मामॅडम : (दचकून) तुम कौन हो?
बेटा : (आश्‍चर्याने) तुमने मुझे पहचाना नही...माँऽ?
मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) तू होय! हुश्‍श! केवढी दचकल्ये मी!! अरे, हल्ली त्या मास्कमुळे माणसं ओळखायलाच येत नाहीत! परवा बंगल्याच्या गेटपाशी बराच वेळ कुणीतरी ताटकळत होतं! मी मुळीच दार उघडलं नाही! ते अहमद अंकल होते, हे उशिरा समजलं!!

ढिंग टांग : सावकारी पाश!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

बेटा : (नेहमीप्रमाणे उत्साहात एण्ट्री घेत) ढॅण टढॅऽऽण! मम्मा, आयम बॅक!!
मम्मामॅडम : (दचकून) तुम कौन हो?
बेटा : (आश्‍चर्याने) तुमने मुझे पहचाना नही...माँऽ?
मम्मामॅडम : (सुस्कारा सोडत) तू होय! हुश्‍श! केवढी दचकल्ये मी!! अरे, हल्ली त्या मास्कमुळे माणसं ओळखायलाच येत नाहीत! परवा बंगल्याच्या गेटपाशी बराच वेळ कुणीतरी ताटकळत होतं! मी मुळीच दार उघडलं नाही! ते अहमद अंकल होते, हे उशिरा समजलं!!

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप 

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे  क्लिक करा 

बेटा : (खांदे उडवत) पण मला कुणी अडवलं नाही!
मम्मामॅडम : (विषय बदलत)...पण आलास ते बरं झालं हो! आता हात सॅनिटायझरने स्वच्छ निर्जंतूक करुन पास्ता खाऊन घे बरं!! दमला असशील! कित्ती मेहनत करतो आहेस! असाच वागत राहिलास, तर पुढच्या इलेक्‍शननंतर तुझा राज्याभिषेक नक्की!!
बेटा : (हरखून) प्रॉमिस?
मम्मामॅडम : (जावळ कुर्वाळत) एकदम प्रॉमिस!!
बेटा : (निर्धाराने) थॅंक्‍यू! पण मला पास्ता नकोय...पैसे हवेत!!
मम्मामॅडम : (धक्का बसून) प...प...पैसे?
बेटा : (गंभीर चेहऱ्याने) यू हर्ड राइट! पैसेच!! क्‍याश!! मनी!! तेसुद्धा कर्ज म्हणून!
मम्मामॅडम : (वैतागून) हे काय भलतंच! असलं काही विचित्र बोलू नकोस! मी कशाला कर्ज देऊ? सावकारीचा व्यवसाय नाही आपला!
बेटा : (हाताची घडी घालत) तरीसुध्दा पैसे हवेतच...मदत म्हणून!
मम्मामॅडम : (कोरडेपणाने) मदत कसली? मम्माकडे मुलानं पैसे मागितले, तर त्याला मदत म्हणत नाहीत आणि कर्ज तर मुळीच म्हणत नाहीत! ये नहीं हो सकता! अपने देशमें माँ का कर्ज बेटा हमेशा संस्कारोसे फेडता है! बेटा जब अच्छा इन्सान बनता है, तो माँ का कर्ज फिट जाता है!!
बेटा : (आश्‍चर्याने हरखून जात) हो ना? मग ‘भारतमातेने सावकारी न करता आपल्या मुलांना उचलून थोडे पैसे द्यावेत,’ असं मी म्हटलं तर माझं काय चुकलं?
मम्मामॅडम : (मायाळूपणाने) काहीच चुकलं नाही बेटा! काहीही नाही चुकलं!
बेटा : (सात्विक संतापाने) आई आपल्या मुलाला कर्ज देईल का? हे शोभेल का तिला?
मम्मामॅडम : (ठामपणाने) बिलकुल नहीं!
बेटा : (विजयी मुद्रेने) कालच्या पत्रकार परिषदेत मी नेमकं हेच सांगितलं! की बुवा, लोकांना कर्जबिर्ज नकोय! जगायला थोडे पैसे हवे आहेत! मोदीजी हे भारतमातेला सावकारी करायला लावत आहेत! धिस इज नॉट डन!! आपण सगळ्यांनी मिळून सरकारवर दबाव आणायला हवा! हे पॅकेज बदला म्हणून सांगायला हवं!!
मम्मामॅडम : (नाक मुरडत) पॅकेज कसलं? मोदीजींचा लोनमेळा आहे तो, भारतमातेचा नव्हे!!
बेटा : (सपशेल दुर्लक्ष करत) काल मी काही पायी चालत गावाकडे निघालेल्या मजुरांना भेटलो! ते महाराष्ट्रातून निघाले होते! मी त्यांनाही म्हणालो की तुम्ही सरकारवर दबाव आणायला हवा होता! सरकारला ठणकावून जाब विचारायला हवा होता!
मम्मामॅडम : (कुतूहलाने) मग?
बेटा : (नापसंतीने) ते म्हणाले की मग तुम्हीच आणा की दबाव! मी म्हटलं, महाराष्ट्रात आघाडीचं सरकार असल्याने तिथे दबाव आणणं शक्‍य नाही! प्रॉब्लेम येतो!!
मम्मामॅडम : (घाईघाईने पर्स उघडत) बरं, तुला किती देऊ पैसे?
बेटा : (डोळे मिचकावत) छे! मी उगीच गंमत केली तुझी! पैसा नहीं मंगता है!! पास्ता भी नहीं मंगता है...भारतातल्या जनतेप्रमाणेच मीसुद्धा तुझ्या प्रॉमिसवर खुश आहे, मम्मा!