esakal | ढिंग टांग : परोपकाराचे अभंग!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-Tang

पुरे झाली देवा। ऐसी परवड। 
अन्न नाही धड। श्वासोच्छ्वास।। 
घुसमटे जीव। कोंडियेला श्वास । 
सारा सत्यनास। होतो आहे।। 
पंजरी कोंडिले। जणू जनावर । 
पिसे अनावर। जीवित्त्व रे ।। 
काय अचानक । आली ऐसी कळा । 
काय तुझा लळा । आटला गा ।।

ढिंग टांग : परोपकाराचे अभंग!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

पुरे झाली देवा। ऐसी परवड। 
अन्न नाही धड। श्वासोच्छ्वास।। 
घुसमटे जीव। कोंडियेला श्वास । 
सारा सत्यनास। होतो आहे।। 
पंजरी कोंडिले। जणू जनावर । 
पिसे अनावर। जीवित्त्व रे ।। 
काय अचानक । आली ऐसी कळा । 
काय तुझा लळा । आटला गा ।। 
सांग काय माझा । असा काय गुन्हा । 
शिक्षा पुन्हा पुन्हा। भोगितो म्या ।। 
किडूक मिडूक। माझ्या डोईवरी । 
हाती पोरेपोरी। चालविल्या ।। 
मागुती चालते। आमुची लुगाई । 
चाले घाई घाई । निरंतर ।। 
उचलोनि जीव। निघाले मजूर । 
गांव त्याचे दूर। दूर जाई ।। 
चांगले चालले। होते बरे दिस। 
खात चार घास। संतोषाने ।। 
तेवढ्यात आला । विषाणूचा घाला।। 
त्याने नेला नेला । प्रपंच रे ।। 
नाही गाडी घोडे। बस किंवा ट्रेन। 
खोटी लेनदेन। अव्वासव्वा।। 
ट्रकामाजी सारे। चढले मजूर।। 
गर्दी महामूर। ठेचाठेच ।। 
गड्या आपुला रे। बरा आहे गाव । 
धरोनिया भाव । चालतोचि।। 
चालता चालता । आलो नाक्‍यावर। 
तेथे भराभर । गर्दी झाली।। 
कुण्या पुढाऱ्याने। सोडिली वाहने। 
उदार मनाने। लोकांसाठी।। 
अवाढव्य बस। तीन चाकी ऑटो। 
आओ बैठो बैठो। पुकारती।। 
कृतज्ञ पायांनी। धावलो तेधवा । 
पुढारी वाहवा । आभारलो।। 
तेवढ्यात तेथे। आला दुजा नेता। 
म्हणे काय नेता?। यांसी कोठे?।। 
खोटी आश्वासने। नेदावी या जनां। 
काय लाज मनां । उरली न का?।। 
वाहन लटिके । खोटी राजनीती। 
हीच काय रीती। तुमची बा?।। 
पुढारी जुंपले । उठली गा राळ।। 
धट्ट शिवीगाळ। झाली तेव्हा।। 
 माणुसकीसाठी। किती ही तळमळ । 
 मना, उचंबळ। तुवा तरी ।। 
हेचि खरे वैष्णव। ज्यांनी परपीडा। 
जाणिली घडाघडा । आहे आहे ।। 
परोपकारासाठी। तंडणारे नेते। 
राखण्यासी मते। झगडती।। 
ऐसे म्हणोनीया । उचलिले ओझे। 
आणि पाय माझे। चालले हो।। 
धन्य ते पुढारी। धन्य पॉलिटिक्‍स। 
जिथे मोल फिक्‍स। माणुसकीचे।।