esakal | ढिंग टांग : विपक्षी व्हावा ऐसा!
sakal

बोलून बातमी शोधा

Dhing-tang

प्रति मित्रवर्य श्री. मा. उधोजीसाहेब 
यांसी शतप्रतिशत प्रणाम. 
काल रोजी सभागृहात आपले फारा दिसांनी दर्शन घडले. आनंद झाला! तुम्ही माझ्याकडे पाहून हसलात का? हसला असाल, असे वाटते. मास्कमुळे कळले नाही!! तथापि, तुम्ही थोडेसे हसताय, असे पाठीमागील बाकावर बसलेल्या आमच्या मा. शेलारमामांनी सांगितले. म्हणून मी मुद्दाम मास्क किंचित खाली करुन तुमच्याकडे पाहून हस्तिदंती केली. हात हलवला, परंतु, नेमके तेव्हाच तुम्ही मागे वळून पाहिलेत. मग मी नाद सोडला.

ढिंग टांग : विपक्षी व्हावा ऐसा!

sakal_logo
By
ब्रिटिश नंदी

प्रति मित्रवर्य श्री. मा. उधोजीसाहेब 
यांसी शतप्रतिशत प्रणाम. 
काल रोजी सभागृहात आपले फारा दिसांनी दर्शन घडले. आनंद झाला! तुम्ही माझ्याकडे पाहून हसलात का? हसला असाल, असे वाटते. मास्कमुळे कळले नाही!! तथापि, तुम्ही थोडेसे हसताय, असे पाठीमागील बाकावर बसलेल्या आमच्या मा. शेलारमामांनी सांगितले. म्हणून मी मुद्दाम मास्क किंचित खाली करुन तुमच्याकडे पाहून हस्तिदंती केली. हात हलवला, परंतु, नेमके तेव्हाच तुम्ही मागे वळून पाहिलेत. मग मी नाद सोडला.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

 सभागृहातील माझे भाषण अप्रतिम झाले असे मला अनेक लोकांनी सांगितले. आमचे अध्यक्ष चंदुदादा कोल्हापूरकर यांनी तर माझी इतक्‍या जोरात पाठ थोपटली की त्यांना मी ‘जरा सोशल डिस्टन्सिंग ठेवा ना’ असे सांगितले. मा. गिरीशभाऊंनी तर ‘तुस्सी ग्रेट हो‘ अशी काँम्प्लिमेंट दिली. आमच्या पक्षातले राहू द्या, तुमच्या पक्षातल्या काही आमदारांनीही माझे भाषण टॉप झाल्याचे सांगितले. तुमचे ठाण्याचे मा. शिंदेसाहेब बाकाखालून खुणा करुन ‘आणखी बोला’ असे सांगत होते. बारामतीचे धाकले दादा तर काय अजूनही (मनाने) आमचेच आहेत! त्यांना तर मी भाषण चालू असतानाच ‘दादा, तुम्ही मास्कमधून हसलात तरी आम्हाला दिसतं!’ असे सांगून टाकले. असो.
विरोधी पक्ष नेतेपद माझ्या ‘डीएनए’मध्येच आहे. त्यामुळे माझे भाषण चांगले झाले असणार. तुम्हाला आवडले का? प्लीज कळवा! बाकी भेटीअंती बोलूच. (कधी ते कोरोनाच जाणे!) सदैव आपला. नानासाहेब फ.

प्रति नानासाहेब-
जय महाराष्ट्र. तुमचे भाषण बरे होते. मी पूर्ण ऐकले असे म्हणणार नाही. किंबहुना नाहीच म्हणणार. कारण भाषणे लाइव ऐकण्याची (आणि करण्याचीही) सवयच मोडून गेली आहे. हल्ली मी ‘फेसबुक लाइव्ह’वरच असतो! तिथे तुमचे भाषण झाले असते तर नीट ऐकले असते. तुम्ही माझ्याकडे बघून हसलात? ते कधी? माझे लक्षच नव्हते. मी तुमच्याकडे बघून हसत होतो, असे तुम्हाला कोणी सांगितले. साफ चुकीचे आहे. मी स्वत:शीच हसत होतो! मला सवय आहे. असो.

तुमचे भाषण थोडे थोडे ऐकले. जितके काही ऐकले त्यावरुन असे म्हणता येईल की भाषण बरेच बरे झाले! त्यातले ‘अहंकाराने काम करणे योग्य नाही’ हे तुमचे वाक्‍य ऐकून मी (फिक्कन) हसलो. आमच्या पक्षातल्या काही लोकांनी तुम्हाला ‘आणखी बोला‘ अशा खुणा केल्या? खरेच का? मी चौकशी करतो.
नानासाहेब, तुमच्यासारखा विरोधी पक्ष नेता महाराष्ट्राला हवा आहे. किंबहुना नक्कीच हवा आहे, असे मी म्हणेन! म्हणेन कशाला, म्हणतोच!! मी पहिल्यापासून हेच तर सांगत आलो. पण तुम्ही उगीचच ‘मी पुन्हा येईन, मी पुन्हा येईन’चा जप सुरु केला होता. तुम्ही पुन्हा यावे असे साऱ्या महाराष्ट्राला वाटते, मलाही वाटते! पण ते विरोधी पक्ष नेता म्हणूनच!!

महाराष्ट्राचा कारभारी या नात्याने मी हे सांगतो आहे की, सर्वोत्तम विरोधी पक्ष नेता म्हणून आपल्याला पुरस्कार द्यायला हवा. किंबहुना देऊच!! तुम्ही वर्षानुवर्षे महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते राहावे, आणि महाराष्ट्रभर दौरे काढून आम्हाला मार्गदर्शन करीत राहावे! आम्ही वर्षानुवर्षे महाराष्ट्रात सुखनैव कारभार करावा, हीच आमची मनोमन इच्छा आहे. एक छोटीशी विनंती एवढीच की ही महाराष्ट्राचा विरोधी पक्षनेता म्हणून आपण हाती घेतलेली सर्व कामे दिवसाढवळ्या करावीत- रात्री नव्हेत! 
कळावे. आपला. उ. ठा. (मा. मु. म. रा.)

Edited By - Prashant Patil