ढिंग टांग : अगा जे घडलेचि नाही...

ढिंग टांग : अगा जे घडलेचि नाही...

एक शहाणे गाढव होते,
त्याची श्रावणात गेली दृष्टी.
हिरव्यागार काळोखात
हिरवीगार सृष्टी.
हिरवेगार वृत्तपत्र चघळत
गाढव म्हणाले दुज्याला :
तो वादग्रस्त ढाचा ना,
 कुणी पाडलाच नाही.
तो बलात्कार ना, कधी झालाच नाही.
तो खून ना, अरे कधी झालाच नाही!

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लोक ढाच्यावर चढले का? हो.
घण घातले का? हो हो.
ढाचा कोसळला का? हो हो हो.
पण तेव्हा एवढी धूळ उसळली ना,
की काही धड दिसलंच नाही.
ढाचा ना, कुणी पाडलाच नाही.

गरीबाची पोर मेली? हो.

गुंडाच्या खाली फुटली? हो हो.
तिला चूपचाप जाळली? हो हो हो.
पण तेव्हा येवढा अंधार होता ना,
की काही धड दिसलंच नाही.
बलात्कार ना, झालाच नाही.
तो सुप्रसिध्द सितारा मावळला? हो.
त्यानं गळफास आवळला? हो हो.
सगळा समाज ढवळला? हो हो हो.
पण राजकारणाचा गांजा 
येवढा कडक होता,
की धड काही कळलंच नाही.
खून ना, झालाच नाही...

हे असंच असतं.
जे दिसतं, ते कधीच नसतं.
नसतं ते ढळढळीत दिसतं.
पण नुसतं दिसून काय उपयोग?
पुरावा नको?
हाताच्या कंकणाला आरसा नको?
उंदराला मांजर साक्ष नको?
ढाचा पाडला, बलात्कार झाला,
खूनही झाला, या तर निव्वळ अफवा.

राजकारणाच्या चिखलफेकीतला
फक्त एक बिलंदर चकवा.

तपास, चौकशा, कज्जे-खटले,
दंगे, आरोप-प्रत्यारोप, आंदोलनं
लाठीमार, मीडिया ट्रायल, वितंडवाद,
मोर्चे, चकमकी, निर्दालनं.
सगळा असतो भ्रम.

आणि जे कधीच दिसत नाही,
ते तर कधी नसतंच!
जे असतं तेही थोडंसंच असतं
...वास्तव पानीकम!
म्हणून म्हटलं-
ढाचा ना, कुणी पाडलाच नाही.
बलात्कार ना, कधी झालाच नाही.
खून ना, कधी झालाच नाही!
...एवढे म्हणून गाढवाने दुसरे
हिरवेगार पान उलटले, म्हणाला :
लेका तुला झालीये कावीळ
म्हणून तुला दिसतंय पिवळं
हिरवाच असतो खरा, बाकी

थोडं लाल, थोडं निळं!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com