ढिंग टांग : चंद्रावरले पाणी!

Dhing-Tang
Dhing-Tang

चंद्रावरल्या पाण्यामध्ये
डोकावुनि ते कोण पाहते?
जळात तेथिल ओठंगुनिया
कोण आपुली घागर भरते?

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

चंद्रावरल्या तळ्यात रात्री
टिपुर चांदणे कधी सांडते?
चमचमणारी मनमासोळी
टपकन केव्हा उसळून जाते?

चंद्रावरल्या जळात केव्हा
निळेसावळे तरते गूढ?
आणि तेथल्या कृष्णतटावर
कोण राहते तिष्ठत मूढ?
चंद्रावरल्या तळ्यात गहिऱ्या
काय उमलती कमळदळे?
काय तेथले भुंगेदेखिल
गुंजन करिती उगा खुळे?
 
चंद्रावरल्या कृष्णतटावर
कोण घेतसे आणाभाका?

आणि तेथल्या रानामध्ये
कोण घालते कुणास हांका?

चंद्रावरल्या निंबोणीच्या
झाडामागे दडते कोण?
आणि तेथल्या अंगणात अन
उगाच मग धडपडते कोण?

चंद्रावरल्या जळात असते
खरेच काही मंतरलेले?
खरेच का अन तिथे भेटती
दोन जिवात्मे अंतरलेले?

चंद्रावरले ते जलसागर
कधि येतसे त्यांस उधाण?
कोण हाकारि तिथे गलबते,
कोण घालते त्यास पलाण?

चंद्रावरल्या पाण्यामध्ये
अणूरेणूंचे होते मंथन?
प्राणवायुच्या सुट्या अणूला
जोड भेटते तिथे चिरंतन?

चंद्रावरच्या पाण्यामध्ये
विज्ञानाची बसली म्हैस?
काय मुरारि, ब्रह्मांडाचा
चांद्रभूमिवर गेला पैस?

चंद्रावरल्या पाण्याशीही
काय आपुले असेल नाते?
स्वार्थावाचुनि गाइ न कोकिळ,
कोण निरर्थक गाणी गाते?

चंद्रावरल्या पाण्याला मग
अखेर झाली मनुष्यबाधा
विज्ञानाची लगबग  मोठी,
आधी रात न चंद्रम आधा!

चंद्रावरल्या पाण्यामध्ये
बिंब कुणाचे दिसते गं?
आणि स्वत:ला जळात बघुनि
कोण स्वत:शी हसते गं?

चंद्रावरल्या जळात तेव्हा
चंद्र पाहतो अपुले बिंब!
भिजऱ्या चांदाला पडले मग
भिजरे कोडे ओलेचिंब!

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com