ढिंग टांग : नमन नटवरा!

ढिंग टांग : नमन नटवरा!

माझ्या तमाम बंधूंनो, भगिनीन्नो, मातांन्नो, बोलण्यासारखं बरंच काही आहे. बोलणारच आहे. निश्‍चितच बोलणार आहे. का नको बोलू? बोलणारच. गेले आठ-दहा महिने बोलतोच आहे. आणखी पाच नव्हे, पंचवीस वर्षे बोलेन! थोडीशी आनंदाची बातमी द्यायची आहे. आपली नाटकं पुन्हा सुरु होतायत, हो...नाटकं सुरु होतायत! म्हणजे इतके दिवस राजकारणातली नाटकं सुरु होती, आता खरीखुरी नाटकं सुरु करायची आहेत. चित्रपटगृहं सुरु करायची आहेत. सगळं आता हळू हळूवारपणे आपण उघडतो आहोत. माझ्या मनासारखंच! मीसुद्धा गेले आठ महिने हळू हळूवारपणे माझं मन तुमच्यासमोर उघडं करतो आहे.

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

नाट्यगृहं सुरु करा अशी मागणी गेले काही दिवस सुरु होती. मी त्या रंगकर्मींना सांगितलं, की मला एक्‍शन प्लान द्या. लग्गेच सुरु करतो. त्याच काळात नेमके ते व्यायामशाळावाले तशीच मागणी घेऊन आले. म्हणाले, व्यायामशाळा सुरु करा. माझा थोडा गैरसमज झाला.

मला वाटलं की नाट्यकलावंतच व्यायामशाळा सुरु करण्याची मागणी करतायत, आणि व्यायामवाल्यांना नाटकं करायची हौस आली आहे!! मी दोन्ही बंदच ठेवले!! आता हळू हळूवार उघडतो आहे. काळजी नसावी!
रसिक हो, प्रतीक्षेची वेळ आता संपली आहे. तिसरी घंटा झाली आहे. मी घंटा वाजवू नका, असं सांगितलं होतं. का? तर लोकांचा गैरसमज होईल की मंदिरं सुरु झाली म्हणून! आपण नाट्यमंदिरं आणि चित्रमंदिरं सुरु करतोय, नुसती मंदिरं नव्हे, हे लक्षात घेतलं पाहिजे!!

नाट्यगृहं सुरु करतोय, पण ती पन्नास टक्के क्षमतेनंच हेही लक्षात घ्यायला हवं! काही रंगकर्मी मला म्हणाले, की आम्ही एरवीही पंचवीस नि पंधरा टक्के प्रेक्षकांसमोर नाटकाचे प्रयोग करतो. त्यात पन्नास टक्‍क्‍यांची अट कशाला? मराठी नाटकांना हल्ली प्रेक्षक येतायत कुठे? सिनेमावाल्यांनी तर गळाच काढला. होय, गळाच काढला. म्हणाले, ‘‘ लौकर सिनेमागृहे सुरु झाली नाहीत तर सिनेमातल्या नट-नट्या तुमच्या राजकारणात येतील! तो
ट्रेंड ऑलरेडी सुरु झाला आहे!!’’

माझं अभिनेत्यांना आणि विशेषत: अभिनेत्रींना आवाहन आहे, की कृपा करुन राजकारणात येण्याचा विचार तूर्त करु नका! इथेही तुम्हाला वाटते तितकी चांगली परिस्थिती नाही. राजकारणाच्या एकमेव क्षेत्राला लॉकडाऊनचे नियम लागू नाहीत, असा काही तरी या लोकांचा गैरसमज झाला आहे. ते जाऊ दे. रसिकहो, इतक्‍या महिन्यांनंतर अखेर थिएटरांचे दरवाजे तुमच्यासाठी उघडत आहोत. नाटकं करण्याची जबाबदारी इतके दिवस राजकारण्यांवर होती. त्यांचे खेळ बघून तुम्ही कंटाळला असणार! म्हणून आता खरीखुरी रंगकला तुमच्यासमोर पेश होण्यासाठी सज्ज झाली आहे. तुम्ही येणार म्हणून कालच रंगगृहातल्या खुर्च्यांवरची धूळ झटकली. साबणाच्या पाण्याने नाट्यगृह धुऊन घेतलं. सॅनिटायझरने खुर्च्या स्वच्छ पुसून घेतल्या. एक आड एक खुर्च्यांवर फुल्या मारुन ठेवल्या. फुल्या मारलेल्या खुर्च्यांवर कुणी बसू नये बरं का!

खबरदारीचा उपाय म्हणून ‘फुल्यांकित खुर्च्या निर्जंतुक केलेल्या नाहीत’ अशी सूचनावजा धमकी लिहून ठेवण्याची सूचना (अर्थात पुण्यातून) आली होती. पण निश्‍चिंत रहा! एक आडएक बसा, मास्क काढू नका! ...नांदी झाली आहे. इष्टदेवता श्रीनटेश्वराचे नमन पार पडले आहे. चांगले पस्तीस रुपयेवाले श्रीफळ वाढवण्यात आले आहे, धूपाचा गंध दर्वळतो आहे. तिसरी घंटाही घणघणली आहे.

आता मंडळी, विलंब कशाला? जय महाराष्ट्र. जय नटेश्वर.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com