ढिंग टांग : निरलस राष्ट्रसेवा!

Dhing-Tang
Dhing-Tang

थोर्थोर नेत्यांच्या आदेशाबरहुकूम आम्ही वारंवार (साबणाने) हात धुतो आहो. मास्क लावतो आहो, आणि जनलोकांपासून दोन गज की दूरी पाळतो आहो. गेले दहा महिने आम्ही वेळोवेळी, जाणत्यांच्या सूचनांचे पालन करुन एकप्रकारे राष्ट्रसेवाच बजावली आहे. (त्यादृष्टीने पाहू गेल्यास आम्हीही कोविडयोद्धेच आहो.) ‘दवाई नहीं तब तक ढिलाई नहीं’ हे सुभाषित आम्ही पाठ करून ठेवले आहे. भेटणाऱ्या प्रत्येकाला आम्ही ते ऐकवीत असतो.

दवाई येऊ घातली आहे, अशी बातमी पुण्याकडून आली आहे! पुण्याकडून आलेली असल्याने ती राष्ट्रीय दर्जाची आणि सत्य असणार, यात शंका ती काय? लौकरच लस येणार, आणि आम्ही बिनधास्त टाळ्या देऊ घेऊ लागणार, यात आता काही संदेहच नाही. तथापि, ही लस आमच्या (आडमाप ) देहात कधी टोचली जाणार, हे अजून ठरलेले नाही. ‘सर्वांना लस मिळेल’ असे सरकारतर्फे सांगण्यात येत असले तरी लसीबाबत (सुजाण) नागरिक म्हणून आपणही काही पथ्ये पाळणे अपेक्षित आहे. तीच खरी राष्ट्रसेवा आहे! पथ्ये येणेप्रमाणे : 

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

लस लौकरच येणार आहे, खरे असले तरी ती नेमकी कधी येणार हे अज्ञात आहे. त्यामुळे भेटेल त्याच्यासमोर वेगवेगळ्या तारखा फेकू नये! आम्ही स्वत: ‘रुपाली’ त मार्च, ‘वैशाली’त जानेवारी आणि ‘वाडेश्वर’च्या नाक्‍यावर  डिसेंबर अशा तारखा ऐकून घरी आलो आहो!

लस नेमकी कशी देणार याबद्दल काही कयास आहेत; परंतु, माहिती नाही! कुणाच्या मते पोलिओची लस देतात तसे तोंडात दोन थेंब जिंदगी के सोडण्यात येतील, तर काहींच्या नालेजनुसार दंडावर देवी काढतात, तशी लस दिली जाईल! एका तथाकथित माहीतगाराने स्वत:चेच पटाशीचे दात (स्वत:च्याच) खालच्या ओठांवर रोवून साधारणत: फूटभर लांबीच्या दाभणीसारखा आकार हाताने दाखवत ‘हुं:’ असा दणकट हुंकार दिला. आम्ही घाबरुन घरी परत आलो!

लसीकरणाच्या मोहिमेत काही अग्रक्रम ठरवण्यात आले आहेत. कोविडयोद्‌ध्यांना सर्वात आधी लस टोचली जाईल, असे जाहीर करण्यात आले आहे. त्यानंतर इतर! यात वशिलेबाजीचा प्रयत्न करु नये! नेतेपुढाऱ्यांच्या शिफारसचिठ्ठ्यांची मात्रा चालणार नाही!

(टिप : वशिलेबाजी करणाऱ्यास खोटी लस जोरात टोचली जाईल!)
सामूहिक रक्तदान, नेत्रशिबिरे, सामूहिक वधुवर सूचक मेळावे, अशा प्रकारच्या उपक्रमांच्या धर्तीवर कोविड लस मेळावा भरवता येणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी! विशेषत: नगरसेवकांनी या सूचनेकडे लक्ष द्यावे!!
काळ्याबाजारात उपलब्ध झालेली लस ग्यारंटीसहित नसेल, याचीही नोंद घेण्यात यावी!
'लसीकरणामुळे मानसिक आरोग्यावर परिणाम होतो का?’ याची चर्चा पुण्यात करु नये! ते धोकादायक आहे!!

‘येथे दहा रुपये टोचणावळ घेऊन माफक दरात लस टोचून मिळेल’ अशी पाटी लावण्यास सक्त मनाई आहे!
आपल्याला लशीची गरजच नाही, असा काहींचा आत्मविश्वास दिसून येतो, तो अनाठायी आहे, हे लक्षात घ्यावे. कां की, कोविड विषाणूस तुमच्या  आत्मविश्वासाशी काहीही देणेघेणे नसते!
दररोज बारा सूर्यनमस्कार घातले की लस घेतली नाही तरी चालते, असा अपप्रचार कोणीही करु नये. अंगलट येईल!!
‘मैंने वैक्‍सिन ली, क्‍या तुमने ली?’ अशा पाणचट जाहिराती जनहितार्थ प्रसिद्ध करु नयेत. राजकीय पक्षांसाठी ही विशेष सूचना आहे. कुठल्याही राजकीय पक्षातर्फे लसीकरण दौरे काढण्यास सक्त मनाई आहे.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com