ढिंग टांग : कभी तो पधारो हमारे येरवडा में...!

Dhing-Tang
Dhing-Tang

‘अवघ्या एकशेऐंशी रुपयात चार धाम यात्रा... दोन वेळच्या भोजनासहित... नो हिडन कॉस्ट’ अशी ‘मातोश्री ट्रावल आणि टूरिजम’ची जाहिरात वाचून चमकलो. येरवडा, भायखळा, ठाणे आणि नाशिक अशा चार धामांची ही यात्रा होती. (सुदैवाने) या चारही ठिकाणची मोक्षधामे ‘आतून’ बघण्याची वेळ अद्याप आलेली नाही, तरीही ‘आतमधले’ जीवन कसे असते, याबद्दल उत्सुकता होतीच. आमच्या शेजारील गृहस्थ सरकारी नोकरीत आहेत. तेथे नको ते खाल्ल्याने मध्यंतरी ते भायखळ्याच्या जेलमध्ये जाऊन आले. शेजारी शिमल्याला जाऊन आला की, ‘आपण किमान महाबळेश्वरी तरी जाऊ’ असा सूर घरोघरी निघतोच. तसलाच हा प्रकार. ताबडतोब नाव नोंदवले! सहलीसाठी नाव नोंदवतानाच ट्रावल कंपनीमधल्या ‘आपल्या माणसा’ने हातात ‘जेल (यात्रा) मॅन्युअल’ ठेवले. त्यांतील कलमे पुढीलप्रमाणे -
१. नोंदणीकृत पर्यटकांस ठराविक दिवशी ‘उचलण्या‘त येईल. या कार्यक्रमासाठी तोंडावर झांकण्याचे काळे कापड पर्यटकानेच आणावयाचे आहे.
२. प्रति जेल प्रति इसम रुपये पन्नास फक्त इतक्‍या अल्पदरात जेल यात्रा घडवली जाणार आहे. सहलीच्या शुल्क आकारणीत कोणतीही सवलत मिळणार नाही, ज्यांना विनाशुल्क सहभागी व्हावयाचे असेल, त्यांनी अन्य मार्गांचा अवलंब करावा. उदा. पाकिटमारी, चोरी, दरोडा वगैरे.
३. सहलकाळात एक टिनपॉट व कांबळ सहल आयोजकांतर्फे उपलब्ध करुन देणेत येईल. घरगुती टावेल, टूथब्रश, चादर आणणेस सक्त मनाई आहे.
४. सहलीत नांव नोंदणी झाल्यानंतर हरेक पर्यटकास क्रमांक देणेत येईल व त्या क्रमांकानेच संबोधले जाईल. उदाहरणार्थ, प्रवाशाचे नांव काहीही असले तरी त्यास बंदी क्र.८४२   किंवा तसल्याच काही नंबराने पुकारणेत येईल, व त्याने त्यास ‘ओ’ देणे अनिवार्य आहे.
५. सहलीतील पर्यटकांस दिवसातून तीन वेळा मोजून काढणेत येईल. मोजणीचे वेळी सर्वांनी उपस्थित राहणे अनिवार्य आहे. याखातर कोठलीही सबब चालणार नाही.
६. सहलकाळात प्रवाशांस दोन वेळेस भोजन दिले जाईल. भोजनासंबंधी कुठलीही तक्रार स्वीकारली जाणार नाही, याची संबंधितांनी नोंद घ्यावी.
७. पर्यटकांचे दोन ढोबळ वर्ग करणेत आले आहेत. कच्चे पर्यटक आणि पक्के पर्यटक! पक्‍क्‍या पर्यटकांना अधिकचे शुल्क भरणा करुन सक्तमजुरीचा आनंद लुटता येईल. बुरुडकाम, सुतारकाम, टोप्या शिवणे आदी कलांचे प्रदर्शन करण्याची अभिनव संधी पर्यटकांना प्राप्त होईल.
८. रक्तदान केल्यास महाराष्ट्रातील आणखी चार जेलची यात्रा सवलतीचे दरात घडवण्याची योजना तयार करणेत येत आहे. तरी रक्तदान करावे!
९. भायखळा अथवा येरवडा अशा अधिक गर्दीचे कारागृहात पर्यटन करतेवेळी तेथील मूळ रहिवाशांना ओळख दाखवू नये! तसे आढळल्यास सहलीचे रुपांतर तात्काळ कच्च्या कैदेत करणेत येईल. ओळख दाट निघाल्याचे निष्पन्न झाल्यास कच्च्या कैदेचे रुपांतर पक्‍क्‍या कैदेतदेखील होऊ शकते. त्यासाठी कोणतेही शुल्क आकारले जाणार नाही, याची पर्यटकांनी नोंद घेणेची आहे.
१०. सदरील पर्यटनसेवा ही सर्वसामान्य जनांस जेलयात्रेचा आनंद लुटता यावा यासाठीची आहे. सदरील व्यवस्था व्हीआयपी लोकांसाठी उपलब्ध नाही. त्यांच्यासाठी इडी, एनसीबी, सीबीआयतर्फे स्वतंत्र जेल पर्यटन वेळोवेळी आयोजित करणेत येते.
११. फर्लो किंवा पॅरोलवरील अधिकृत बंदींना सदर जेलपर्यटनात सहभागी होता येणार नाही!
१२. येरवडा, भायखळा, ठाणे व नाशिक या चारही स्थळांची यात्रा करणाऱ्या पर्यटकांस ‘नामचीन पर्यटक’ असल्याचा दाखला दिला जाईल.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com