ढिंग टांग : घराघरात, मनामनात...!

Dhing-Tang
Dhing-Tang

माझ्या तमाम बंधूंनो, भगिनीन्नो, आणि मातांनो, काय बोलू? बोलण्यासारखं खूप काही आहे, किंबहुना बोललंच पाहिजे. गेले अनेक महिने आपण एका भयंकर संकटाला सामोरे जात आहोत. कधी एकदा ही पीडा नष्ट होतेय, असं काही लोकांना वाटत असेल. नक्कीच वाटत असेल. का नाही वाटणार? मी आपल्या सरकारबद्दल बोलत नाहीए, त्या जीवघेण्या विषाणूबद्दल बोलतोय!

‘आपले कुटुंब, आपली जबाबदारी’ ही मोहीम सुरु केल्यानंतर तो विषाणू महाराष्ट्राला शरण आला. या मोहिमेच्या यशानंतर देशोदेशीचे शास्त्रज्ञ च्याट पडले. जे आपल्याला जमलं नाही, ते महाराष्ट्रानं कसं जमवलं? याचं त्यांना कोडं पडलं होतं. या काळात सगळ्यांनी आपापल्या कुटुंबांची काळजी घेतली. माझं कुटुंब म्हणजे तुम्हीच सगळे आहात! म्हणूनच या मोहिमेअंतर्गत मी आपल्या कोरोनासैनिकांना घरोघरी पाठवलं होतं. हो, सैनिकच ते…त्यांना सैनिकच म्हणायला हवं. का नको म्हणू? म्हणणारच. आमच्या कडवट सैनिकांनी विषाणूरुपी बैलाला काबूत आणलं. विषाणू पळतोय, पळतोय, आपले सैनिक त्याच्या मागे धावतायत, धावतायत!! पण अचानक- उधळलेल्या बैलाप्रमाणे विषाणूने आपली दिशा बदलून मुसंडी मारली!

खरं तर हळू हळूवारपणे आपण सगळं उघडत होतो. दुकानं उघडली आहेत. शाळा, कॉलेजांचे दरवाजे थोडेसे उघडले आहेत. कार्यालयात पुन्हा उपस्थिती वाढली आहे. आपण सगळेच वाट बघत होतो, ती लसदेखील उपलब्ध झाली आहे, हे निखालस चांगलंच आहे. पण लस आली म्हणून सालस वागणं सोडायचं हे बरं नाही. निर्बंध पाळण्याबद्दल अंगात इतका आलस असणंही बरं नाही! सालस वागलं नाही तर दारात आंबुलस येते, एवढा साधा विचार कुणी केला नाही. अशा वागण्यामुळेच विषाणूचं फावलं…

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

गेले काही दिवस मी बघतोय, विषाणू पुन्हा डोकं वर काढतोय. डोकं वर काढायलाही काही हरकत नाही, पण त्यानं हातपायही पांघरुणातून बाहेर काढलेत. हल्ली लोक रस्त्यावरुन हिंडताना मास्क लावत नाहीत. माझ्याकडे आकडेवारी आहे, एकट्या मुंबईत मास्क न लावणाऱ्यांकडून तीस कोटी रुपये दंड वसूल करण्यात आला आहे. हो, तीस कोटी रुपये! एवढ्या पैशात लाखो भुकेल्यांना शिवभोजन मिळालं असतं!!

स्पेनमध्ये बुलफायटिंग नावाचा खेळ असतो. लाल फडकं दाखवलं की मस्तवाल बैल अंगावर धावून येतो. त्याला हुकवायचं असतं. लॉकडाऊनच्या बैलाला असंच आपण लाल फडकं दाखवून बोलावतो आहोत. होय, बोलावतो आहोत! तेच लाल फडकं स्वच्छ धुऊन तोंडाला बांधलं तर? विचार करा.

एकंदर परिस्थिती पाहून मी आमच्या कडवट सैनिकांना आदेश दिला आहे की, घराघरात आणि मनामनात पोहोचा! प्रत्येकाची चौकशी करुन माझ्यापर्यंत जनतेच्या अडचणी आणून पोचवा! त्यानुसार आमचे सैनिक तुमच्याकडे येतील. विचारपूस करतील. त्यांना सहकार्य करा. मुख्य म्हंजे त्यांनी दार वाजवल्यावर किमान उघडा!! ‘इतके दिवस कुठे होता?’ असं त्यांच्या अंगावर ओरडू नका. त्यांच्या अंगावर वाढीव वीजबिलेही फेकू नका! ‘बिल्डर, उद्योजक, हाटेलवाल्यांना सहकार्य केलेत, तसे आम्हाला कधी करणार?’ किंवा ‘इस्पितळाची बिलं फुगली, ती कोण भरणार?’ असे विचित्र प्रश्नही विचारु नका. ते फक्त तुमच्या तब्बेतीची चौकशी करतील, आणि दाढी खाजवत निघून जातील. तेव्हा काळजी घ्या. मास्क लावा, सॅनिटायझर वापरा आणि दोन हात अंतर राखा. बाकी काहीही विचारू नका. माझं लक्ष आहे! जय महाराष्ट्र.

Edited By - Prashant Patil

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com